मुंबई, 16 फेब्रुवारी : लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आपल्या जबरदस्त विनोदी शैलीच्या जोरावर तब्बल तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत आता त्यांची मुलगी स्वानंदी बेर्डे अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे. स्वानंदीचं एक नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
स्वानंदीनं आई-वडिलांप्रमाणेच रंगभूमीवरुन अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड चर्चेत असते. तिने आपल्या पहिल्या नाटकाच्या स्क्रिप्टचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ असं या आगामी नाटकाचं नाव आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या नाटकात स्वानंदी ‘सौ. माने’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
“धनंजय माने इथेच राहतात’ हे नवीन नाटक तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. वाट बघा आमच्या येण्याची” असं कॅप्शन देत स्वानंदीने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.
‘अशी ही बनवाबनवी’ या सुपरहिट चित्रपटातील ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ हा संवाद खुपच लोकप्रिय झाला. अनेक विनोदांमध्ये हा डायलॉग व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. याच नावाचं नाटक मार्च महिन्यात रंगमंचावर नाट्यरसिकांच्या भेटीला येणार आहे. स्वानंदीसोबत तिची आई प्रिया बेर्डे यांचीदेखील नाटकात मुख्य आहे भूमिका आहे. राजेश देशपांडे यांनी नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे.