मुंबई, 25 मे : सध्या कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. या व्हायरसचं वाढतं संक्रमण लक्षात घेता केंद्र सरकारनं पुन्हा एकदा 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण या लॉकडाऊनमध्ये अनेकांची गैरसोय झालेली पाहायला मिळत आहे. अशाच एक प्रसिद्ध मराठी लोककलावंत माया जाधव. ज्या सध्या त्यांच्या पनवेलच्या घरी लॉकडाऊन आहेत आणि सध्याच्या सोशल डिस्टंसिंगच्या कारणानं त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळणं कठीण झालं आहे.
माया जाधव यांनी आजच 71 वा वाढदिवस साजरा केला. ज्यावेळी महाराष्ट्रातील सर्व लोककलाकारांनी त्यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी माया जाधव यांचा 71 वा वाढदिवस व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून एकत्र येत साजरा केला.
माया जाधव सध्या त्यांच्या पनवेलच्या घरी नवऱ्यासोबत लॉकडाऊन आहेत. विशेष म्हणजे या दोघांसोबत त्यांच्या 15 मांजरी सुद्धा आहेत. मात्र अशा परिस्थितीत माया जाधव यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. सोशल डिस्टंसिंगमुळे त्यांना मदत मिळणं कठीण झालं आहे. याशिवाय माया ताईंना सोशल मीडियाचा वापर कसा करावा याची फारशी काही माहिती नसल्यानं कोणाकडे मदत मागणे किंवा इतर कोणत्याही गोष्टी त्यांना करता येत नाही आहेत.माया जाधव यांनी पिंजरा, चांडाळ चौकडी, लक्ष्मीची पाऊलं, बंदीवान मी या संसारी यांसारख्या सिनेमातही काम केलं आहे.