मुंबई,8 नोव्हेंबर : प्राइम व्हिडिओवरील कॅम्पस ड्रामा ‘हॉस्टेल डेज’ वेब सिरिज लवकरच एका नवीन सीझनसह धमाल करणार आहे. या वेब सिरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. नुकताच **’**हॉस्टेल डेज’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनचा टीझर रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे या वेब सिरिजमध्ये दिवगंत कॉमेडियन राजू श्रीवास्तवदेखील आहेत. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांना शेवटचे पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुकही आहेत आणि भावुकही. समोर आलेल्या टीझरमध्ये सुरूवातीला, एक रीकॅप आहे, जो वर्षानुवर्षे विद्यार्थ्यांचे आयुष्य कसे वेगळे होत जाते हे सांगत आहे. यानंतर तिसऱ्या वर्षाचा सीन दाखवला आहे. पार्श्वभूमीत म्हटलं होतं, “जसा दिवा विझण्याआधी फडफडतो, तसा इंजिनियर तिसऱ्या वर्षात बडबडतो". राजू श्रीवास्तव चहाच्या दुकानातील विक्रेता किंवा पानवालाच्या भूमिकेत दिसणार आहे. ते खांद्यावर टॉवेल घेऊन जाताना टीझरमध्ये दिसत आहेत. राजू श्रीवास्तवला पाहून त्यांचे चाहते उत्साही झाले आहेत सोबत त्यांना शेवटचं कॉमेडी करताना पाहून भावुकही झालेत. टीझरवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
‘हॉस्टेल डेज’ वेब सिरीजमध्ये एहसास चन्ना, लव विसपुते, शुभम गौर, निखिल विजय, आयुषी गुप्ता आणि उत्सव सरकार आपल्या महाविद्यालयीन मैत्रीने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. याशिवाय राजू श्रीवास्तवही प्रेक्षकांच्या ओठांवर शेवटचं हसू आणणार आहेत. 16 नोव्हेंबरला ही सिरीज प्राइम व्हिडिओवर पहायला मिळणार आहे.
दरम्यान, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे यावर्षी 21 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली होती. राजू श्रीवास्तव यांनी आपल्या विनोदी शैलीने चाहत्यांना खळखळून हसवलं. मात्र जाताना सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी होतं. राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतरची ही त्यांची शेवटची वेब सिरीज आहे. ‘हॉस्टेल डेज’च्या तिसऱ्या सीझनमध्ये राजू श्रीवास्तवची भूमिका कोणती आणि किती मोठी आहे, हे अद्याप समोर आलेले नाही, मात्र त्यांची झलक पाहताच प्रेक्षक आनंदी आहेत.