मुंबई, 19 जानेवारी- झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ (Lagir Jhala Ji) या मालिकेतील अभिनेते डॉ. ज्ञानेश माने (Dr.Dnyanesh Mane) यांचे 14 जानेवारी रोजी अपघाती निधन झाले आहे. मात्र त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर याच मालिकेतीच आज्याच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्याचा फोटो व्हायरल होत आहे. अभिनेता नितीश चव्हाण याच्या फोटो असलेल्या आरआयपीच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. हा प्रकार खरं तर गंभीर आहे. अभिनेता नितीश चव्हाण या मालिकेत आज्याची भूमिका साकारली होती. अभिनेते डॉ. ज्ञानेश माने यांनी देखील या मालिकेच महत्त्वाची भूमिका साकारली होती. या दोघांचे एकत्र फोटो देखील आहेत. आता डॉ. ज्ञानेश माने यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी काहींनी अभिनेता नितीश चव्हाण याचा फोटो लावून निधनाच्या बातम्या दिल्या आहेत. तशाच पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभिनेते डॉ. ज्ञानेश माने यांचा काही दिवसापूर्वी कार अपघातामध्ये (Car Accident) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्याजवळील रोटी घाटातून जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. अपघातानंतर ते बेशुद्धावस्थेत होते. त्यानंतर त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र 14 जानेवारी रोजी सकाळी त्यांचे निधन झाले. डॉ. ज्ञानेश माने हे पेशाने डॉक्टर होते. मुळचे ते बारामतीतील झारगडवाडी या गावचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, भावजया आणि पुतणे असा परिवार आहे.