कलकत्ता, 9 ऑगस्ट : 'एक चतुर नार'सारखं धमाल-मस्तीचं गाणं असो किंवा 'मेरा जीवन कोरा कागज'सारखं सॅड साँग असो... 'आनेवाला पल जानेवाला है'सारखं वास्तवाची जाणीव करून देणारं गीत असो किंवा 'छूकर मेरे मन को'सारखं तरल भावना व्यक्त करणारं सदाबहार गाणं असो... किशोर कुमार (Kishore Kumar) यांनी आपल्या खास आवाजाने अशी कित्येक गाणी अजरामर करून ठेवलेली आहेत. प्रत्येक जॉनरच्या गाण्यात किशोर कुमार यांनी स्वतःची जादू ओतली आणि त्या गाण्यांना जणू स्वर्गीय स्वरांत पेश केलं. म्हणूनच आजही त्यांच्या गाण्यांची गोडी किंचितही कमी झालेली नाही. त्यांची अभिनयकलाही तशीच वैशिष्ट्यपूर्ण होती. त्यांच्या हजारो चाहत्यांनाही त्यांची गाणी ऐकल्याशिवाय-गुणगुणल्याशिवाय चैन पडत नाही. असाच त्यांचा एक चाहता कोलकात्यात (Kalkata) राहतो. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो चहावाला आहे आणि त्याच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना तो किशोर कुमार यांची गाणी गाऊन रिझवतो. नुकतीच चार ऑगस्ट रोजी किशोर कुमार यांची जयंती होऊन गेली. त्या वेळी या चाहत्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. 'एएनआय' या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने 'इंडिया डॉट कॉम'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
उत्तर कोलकात्यातल्या बेनियाटोला लेनमध्ये 56 वर्षांच्या पलटण नाग (Paltan Nag) यांचं चहाचं दुकान (Tea Shop) आहे. त्यांच्याकडच्या चहाची चव तर ग्राहकांना आवडतेच; पण त्यांच्याकडे ग्राहक पुन्हा येण्याचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे ते किशोरदांची गाणी चांगल्या प्रकारे गाऊन करत असलेलं मनोरंजन. किशोर कुमार यांना ते आपला आयडॉल मानतात. ते स्वतः दहा वर्षांचे असल्यापासून किशोर कुमार यांचे चाहते आहेत आणि त्यांची गाणी ऐकत आहेत. त्यांना स्वतःलाही गायक व्हायचं होतं; मात्र परिस्थितीमुळे त्यांना स्वतःच्या वडिलांचा चहाविक्रीचा व्यवसायच पुढे चालवावा लागला. त्यातूनच पुढे त्यांनी आपली आवड जोपासली.
हे ही वाचा-...म्हणून गोल्डन बॉय नीरजला ऑलिम्पिकसाठी कापावे लागले केस
#WATCH | West Bengal: A tea shop owner in Kolkata goes viral for entertaining customers by singing Kishore Kumar's songs.
"I have followed Kishore Kumar since I was 10 years old. I practiced his songs on Karaoke. He is my idol," says Paltan Nag, tea shop owner in Kolkata. pic.twitter.com/ng8CRZi8lU — ANI (@ANI) August 8, 2021
किशोर कुमार यांच्या गाण्यांचा त्यांनी कराओकेवर (Karaoke) रियाझ केला. त्यामुळेच ते आपल्या चहाच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना मेलडीसह गाणी गाऊन दाखवतात. अरिजित मजुमदार नावाच्या त्यांच्या एका नियमित ग्राहकाने सांगितलं, की ते या दुकानात केवळ चहा पिण्यासाठी येत नाहीत, तर नाग यांच्या गाण्यांचा आनंद लुटण्यासाठीही येतात. पलटण नाग काही स्टेज प्रोग्राम्स करूनही आपली हौस पूर्ण करतात
'आपल्या देशात अनेकांकडे वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य आहे; मात्र त्यांना कोणाचं साह्य किंवा पाठिंबा मिळत नसल्याने त्यांचं टॅलेंट वाया जातं. एखाद्या गरजू व्यक्तीला कोणाची मदत मिळाली नाही, तर तू अंगभूत गुणांचा विकास करणार कसा?,' अशी खंत पलटण नाग यांनी इंडिया टुडेशी बोलताना व्यक्त केली होती.
'नुकताच चार ऑगस्टला मी किशोरदांचा जन्मदिन साजरा केला. लोकांना मी गात असलेली त्यांची गाणी आवडतात, त्यामुळे मला बरं वाटतं. गायन हे माझं पॅशन आहे. किशोरदा माझ्या हृदयात आहेत. ते माझे देव आहेत,' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना एएनआयकडे व्यक्त केल्या.
केंद्र सरकारने किशोर कुमार यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान द्यायला हवा, अशी मागणीही पलटण नाग यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolkata, Singer, Song, Viral video.