मुंबई, 23 मे : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी आलियानं तिच्या नव्या हेअरकटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोसोबतच तिनं घरीच हेअरकट केल्याचंही सांगितलं होतं. मात्र हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर तिचा हा हेअरकट कोणी केला असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. मात्र आता या गोष्टीचा खुलासा झाला आहे. आलिया भटला हा हेअरकट कोणी दिला याचा खुलासा दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरनं केला. करणनं त्याच्या चाहत्यांसाठी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक लाइव्ह सेशन घेतलं होतं. ज्यात त्यानं चाहत्यांशी गप्पा मारल्या आणि त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली. या लाइव्ह चॅटमध्ये करणला आलियाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना करण म्हणाला, आलिया मला माझ्या मुलीसारखी आहे आणि सध्या ती रणबीर कपूरनं केलेल्या हेअरकटचा आनंद घेत आहे. आलियाच्या हेअरकटचा खुलासा करणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.
करण जोहरचा हा व्हिडीओ आलिया भटच्या फॅनपेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर करण, आलिया आणि रणबीरचे चाहते कमेंट करताना दिसत आहेत. आलिया भटनं तिच्या नव्या हेअरकटचा मिरर सेल्फी शेअर केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिनं घरीच हेअरकट केल्याचा खुलासा केला होता.
आलिया भट आणि रणबीर कपूर मागच्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. सोशल मीडियावर यांच्या नात्याची चर्चा नेहमीच होताना दिसते. रणबीरचे वडील ऋषी कपूर यांच्या निधनानंतर सर्व विधींच्या वेळी आलिया कपूर कुटुंबीयांसोबत दिसली. दोघांच्या कुटुंबांचंही एकमेकांसोबत खूप चांगलं बॉन्डिंग आहे. त्यामुळे आता हे दोघं कधी लग्न करतात याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.