मुंबई, 24 डिसेंबर : एअरपोर्ट, बस स्थानक अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी सामान चोरीला जाणं, गहाळ होण्याच्या बातम्या समोर येत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी विमानतळावरून त्यांचे सामान हरवल्याची तक्रार करताना दिसत आहेत. या यादित आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ‘कहानी घर घर की’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेत पल्लवीची भूमिका करणारी श्वेता कवात्राचं सामान एअरपोर्टवर गहाळ झाल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत तिला प्रवासादरम्यान झालेल्या त्रासाचा अनुभव सांगितला आहे. अभिनेत्रीने एअरलाइन्सवर जोरदार टीका केली आणि तिचे हरवलेले सामान परत करण्याची मागणी केली. एवढेच नाही तर फ्लाइट रद्द झाल्यामुळे अभिनेत्रीला आपल्या मुलीसोबत 30 तास विमानतळावर थांबावे लागल्याचंही तिनं सांगितलं.
श्वेता कवात्रा हिने व्हिडिओ शेअर करत सांगितले की, मुंबई ते न्यूयॉर्कला जाण्यासाठी तिला खूप अडचणींचा सामना करावा लागला. अभिनेत्रीची जर्मनीतील म्युनिकला कनेक्टिंग फ्लाइट होती, परंतु ती रद्द झाली, ज्यामुळे तिला तिच्या मुलीसह विमानतळावर एक दिवस घालवावा लागला. अभिनेत्री न्यूयॉर्कला पोहोचली, पण आठवडा उलटूनही तिचं सामान मिळालेलं नाही. व्हिडिओमध्ये अभिनेत्री म्हणाली, ‘आम्ही मुंबईहून प्रवास केला होता आणि आमची म्युनिकहून दुसरी फ्लाइट होती जी रद्द झाली. अशा स्थितीत मी माझ्या मुलीसह 26 ते 30 तास विमानतळावर अडकले होते.’ श्वेता पुढे म्हणाली, काही प्रश्न विचारायचे असतील तर पाच ते सहा किलोमीटरच्या लाईनमध्ये उभे रहावे अशी त्यांची इच्छा होती. मी तिथे गेल्यावर त्यांनी मला माझ्या मुलीसह हाकलून दिले. अभिनेत्रीने व्हिडीओच्या माध्यमातून मदत मागितली आहे. अभिनेत्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, अभिनेत्री श्वेता कवात्राने ‘कहानी घर घर की’ मधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. याशिवाय तिने ‘कुसुम’, ‘जस्सी जैसी कोई नहीं’, ‘ये मेरी लाइफ है’सह अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे.

)







