मुंबई, 17 जुलै- छोट्या पडद्यावर सध्या रिमेकची प्रचंड चलती आहे. 'आई कुठे काय करते-अनुपम', 'कुल्की कुमार बाजेवाला-तुझेच मी गीत गात आहे', 'गुम है किसी कके प्यार में-लग्नाची बेडी' अशा अनेक मालिकांचा रिमेक आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. यायादीमध्ये आता आणखी एका मालिकेची भर पडली आहे. कलर्स मराठीवरील 'जीव माझा गुंतला' या प्रसिद्ध मालिकेचा आता हिंदी रिमेक पाहायला मिळणार आहे.
स्टार प्रवाहवर 'जीव माझा गुंतला' ही मालिका प्रसारित होते. अगदी अल्पवधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद आणि प्रेम मिळत आहे. वास्तविक कन्नड मालिका 'मिथुनराशी जी'चा हा मराठी रिमेक आहे. एकीकडे गर्भश्रीमंत, रुबाबदार, हट्टी पण तितकाच हळवा मल्हार तर दुसरीकडे कष्टकरू, स्वाभिमानी घर चालवण्यासाठी रिक्षा चालवणारी अंतरा यांच्यावर आधारित ही मालिका आहे. प्रेक्षकांना आणि खासकरुन तरुणाईला अंतरा-मल्हारची हटके केमिस्ट्री प्रचंड पसंत पडत आहे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीत ही मालिका शूट केली जात आहे.
दरम्यान आता या मालिकेचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कलर्स टीव्हीवर 'सावी की सवारी' या नावाने ही मालिका प्रेक्षेपित होणार आहे. या मालिकेमध्ये अंतरा आणि मल्हार कोण साकारणार याची सर्वांना उत्सुकता आहे. या मालिकेत अभिनेत्री आणि व्हाईस आर्टिस्ट समृद्धी शुक्ला ही सावी म्हणजेच अंतराच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये अभिनेता कोण असणार याचा खुलासा अजून करण्यात आला नाहीय. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे अंतराची 'हमसफर'(रिक्षा) या मालिकेत 'छत्रीप्रसाद'च्या रुपात दिसणार आहे. त्यामुळे या मालिकेचा रिमेक आता कितपत प्रेक्षकांना भुरळ पाडण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
(हे वाचा: सचिन पिळगांवकरांच्या लेकीचा ग्लॅमरस अंदाज; स्पेनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय श्रिया )
'जीव माझा गुंतला' बाबत सांगायचं झालं तर या मालिकेत अंतरा ही दमदार भूमिका अभिनेत्री योगिता चव्हाण साकारत आहे. याआधी तिने काही मराठी चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. तसेच मल्हार ही भूमिका अभिनेता सौरभ चौगुलेने साकारली आहे. सौरभ एक उत्तम अभिनेता तर आहेच शिवाय तो एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. त्याने अनेक हिंदी-मराठी कलाकरांसोबत काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.