मुंबई, 24 जून : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सध्या बॉलिवूडमध्ये नेपोटिझमवरून वाद सुरू आहे. बॉलिवूडमध्ये असलेली घराणेशाहीच सुशांतच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. यावर आता दिवंगत अभिनेता इरफान खानचा मोठा मुलगा बाबिल खाननं स्वतःचं मत मांडलं आहे. ज्यात त्यानं नेपोटिझमवरुन वाद घालणाऱ्या सर्वांना एक महत्त्वाचा संदेश सुद्धा दिला आहे.
बाबिलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यानं नेपोटिझमचा बदला घ्यायचा असेल तर नक्की घ्या पण सुशांतच्या नावाचा वापर करू नका असं म्हटलं आहे. बाबिलनं लिहिलं, अद्याप काही ठीक झालेलं नाही. आपणं दोन महान कलाकारांना गमावलं, पण त्यांना शांती मिळालेली नाही तर त्यांच्यावर झालेले घाव पुन्हा उकरून काढले जात आहेत.
बाबिल पुढे लिहितो, 'माझी सर्वांना विनंती आहे, कोणाला जास्त दुःखी करू नका. तुम्ही ती प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा ज्यामुळे सुशांतचा अपमान झाला. पण त्याच्या नावाने ब्लेम गेम खेळू नका. त्याचा आता पर्यंतचा प्रवास पाहा तो किती दमदार व्यक्ती होता. त्याला हे सर्व नको होतं. जर तुम्हाला खरंच नेपोटिझम विरोधात लढायचं असेल तर नक्की लढा. बदला घ्या. पण सुशांतला त्याचं कारण बनवू नका. सत्यासाठी लढा पण कोणाच्याही खांद्यावर बंदूक ठेवून नाही.'
सुशांत सिंह राजपूतनं 14 जूनला मुंबईतल्या त्याच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक मोठ्या बॅनर्सनी त्याला आपल्या सिनेमातून काढून टाकल्याची चर्चा सुरू होती. ज्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला आणि त्यानं आत्महत्या केली. यानंतर करण जोहर, सलमान खान, यशराज बॅनर यांच्यावर वेगवेगळ्या राज्यात FIR दाखल करण्यात आली. याशिवाय सीबीआयनं या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी सुद्धा करण्यात येत आहे.