मुंबई, 29 एप्रिल : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता इरफान खानचं वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं आहे. अचानक तब्येत खालावल्यानं इरफानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याची प्रकृती चितांजनक होती आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. इरफान खान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. आज मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यानं अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच त्याचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा रिलीज झाला होता. हा त्याचा शेवटचा सिनेमा ठरला.
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडलेल्या इरफान खानला भारतात कोणी ओळखत नाही असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. इरफानचा जन्म 1967 मध्ये जयपुरमधील एका मुस्लिम पठाण कुटुंबात झाला. त्याचं पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान असं आहे. त्याचे वडील टायरचा व्यवसाय करायचे. इरफानचा जन्म पठाण कुटुंबात झालेला असूनही तो लहानपणापासून शाकाहारी होता. यामुळेच इरफानचे वडील त्याला नेहमी पठाणाच्या घरी ब्राह्मण जन्मला आला असे मस्करीत म्हणायचे.
इरफान खानचं स्ट्रगल फार मोठं होतं. जेव्हा इरफानला एनएसडीमध्ये प्रवेश मिळाला त्याच काळात त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर त्याला घरुन पैसे मिळणं पूर्ण बंद झालं. एनएसडीकडून मिळणाऱ्या फेलोशिपमधून त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं. इरफानने त्याची वर्ग मेत्रिण सुतपा सिकंदरशी 23 फेब्रुवारी 1995 मध्ये लग्न केलं. इरफानच्या कठीण काळात सुतपाने नेहमीच त्याला साथ दिली.
सुतपासाठी इरफान धर्म बदलायलाही तयार होता. मात्र सुतपाच्या घरातल्यांनी दोघांचं लग्न लावून दिलं. यामुळे इरफानला धर्म बदलायची गरज पडली नाही. इरफानने एकाहून एक सरस सिनेमांत काम केलं आहे. 2005 मध्ये आलेल्या ‘रोग’ सिनेमात इरफानची महत्त्वपूर्ण भूमिका होती. ‘हासिल’ सिनेमासाठी इरफानला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. यानंतर इरफानने ‘लंचबॉक्स’, ‘गुंडे’, ‘हैदर’, ‘पीकू’, ‘हिंदी मीडियम’, ‘करीब करीब सिंगल’सारखे अफलातून सिनेमे केले.
‘पान सिंग तोमर’ सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. 2011 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्याचा सन्मान केला. गेल्यावर्षीपासून तो न्यूरो एंडोक्राइन या आजाराने त्रस्त आहे. 2 वर्षांपूर्वी त्यानं अमेरिकेत या आजारावर उपचार घेतले होते. आजारपणामुळे तो बॉलिवूडपासून दूर होता. मात्र प्रकृती सुधारल्यावर त्यानं 'अंग्रेजी मीडियम' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. याआधी रिलीज झालेल्या त्याच्या ‘हिंदी मीडियम’ सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. मात्र आजारपणातचं शूटिंग पूर्ण केल्यानंतर त्याच्या प्रमोशनलाही उपस्थित राहू न शकलेल्या इरफानचा हा शेवटचा सिनेमा ठरला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.