'...तर देशात हुकूमशाही लागू करा', महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पोंक्षे संतापले

'...तर देशात हुकूमशाही लागू करा', महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पोंक्षे संतापले

महाराष्ट्रात झालेली राजकीय उलथापालथ सर्वांचीच झोप उडवणारी ठरली. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण सर्व बाजूंनी तापलेलं आहे.

  • Share this:

मुंबई, 24 नोव्हेंबर : सध्या महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण सर्व बाजूंनी तापलेलं आहे. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला होता. दरम्यान राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी एक मोठा गट फोडून भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सध्या महाराष्ट्रात परस्पर विरोधी विचारसारणी असलेले पक्ष एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा करताना दिसत आहेत. पण ही गोष्ट देशाच्या लोकशाहीला खूप घातक आहे असं मत अभिनेता शरद पोंक्षे व्यक्त केलं. महाराष्ट्रातील राजकारणावर देशभरातून प्रतिक्रिया येत असताना शरद पोंक्षे यांनी फेसबुकवर थर्ड क्लास राजकारण अशी पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.

लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार शरद पोंक्षे म्हणाले, ‘लोकशाहीनं नागरिकांना मतदानाचा अमूल्य अधिकार दिला आहे. आपल्याला ज्या पक्षाची विचारसारणी पटते किंवा ज्या पक्षानं सत्तेत यावं असं आपल्याला वाटतं त्या पक्षाला आपण मतदान करतो. पण जर निवडणुकीनंतर जर परस्पर विरोधी विचारसारणी असलेले पक्ष जर सत्ता स्थापनेचा विचार करत असतील तर हा लोकशाहीचा सर्वात मोठा अपमान आहे. लोकांच्या हक्काचा आणि त्यांच्या मतांचा हा अनादर ठरतो. त्यामुळे लोकशाही पूर्णपणे अपयशी ठरली असं म्हणावं लागेल.’

शरद पोंक्षे पुढे म्हणाले, ‘भाजपनं जे केलं ते खूप वाईट आहे. अशाप्रकारे गुपचूप शपथविधी पार पडण्याची त्यांना काय गरज पडली? जर आम्ही जाहिरपणे मतदान केलं आहे तर मग सत्ता स्थापनासुद्धा पारदर्शी असावी किंवा मग या सर्व राजकीय खेळापेक्षा देशात हुकूमशाहीच लागू करा. या सगळ्यामुळे सामान्य जनतेची निराशा झाली आहे. ’

महाराष्ट्रात झालेली राजकीय उलथापालथ सर्वांचीच झोप उडवणारी ठरली. सत्तासंघर्ष सोडवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीकडून सातत्याने बैठकांचा सिलसिला सुरू होता. आज चर्चा अंतिम टप्प्यात येणार असल्याची चर्चाही होती. अखेरच्या टप्प्यात सगळे ठरत असताना मात्र अचानक राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली. राजभवनात थेट मुख्ममंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. राजभवनात शनिवारी सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

===========================================================================

Published by: Megha Jethe
First published: November 24, 2019, 1:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading