मुंबई, 30 ऑगस्ट : अनेक ठिकाणी बाप्पांचं आगमन झालं आहे. मराठी अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरीही बाप्पा आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाची स्वप्नीलच्या घरी गणेशोत्सव साजरा होतो आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणत स्वप्नील आणि त्याच्या मुलांनी बाप्पाला घरी आणलं आहे. स्वप्नीलच्या घरी फक्त दीड दिवसांचा गणपती असतो. पण या गणपतीची मूर्ती मात्र खास आहे. स्वप्नीलच्या घरी दरवर्षी गणेशोत्सवात ही एकच मूर्ती विराजमान होते. पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करून स्वप्नीलने ही गणेशमूर्ती तयार करवून घेतली आहे. ही पंचधातूची मूर्ती आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्तींचं विसर्जन तलावात, नदीत किंवा समुद्राच्या पाण्यात केल्यामुळे होणारं जलप्रदूषण हा चिंतेचा विषय आहे. अनेकांनी त्यावर उपाय म्हणून पंचधातूची गणेशमूर्ती घडवून घ्यायला सुरुवात केली आहे. अभिनेता स्वप्नील जोशी आणि त्याच्या कुटुंबियांनीही हा निर्णय घेतला होता.
पर्यावरणाला धोका पोहोचू नये म्हणून स्वप्नील आणि त्याचं कुटुंब दरवर्षी या एकाच गणेशमूर्तीची पूजा करतात. हे वाचा - Thipkyanchi Rangoli: कुक्की गँगचा पर्यावरणपूरक गणपती! कानिटकरांच्या घरात बाप्पाचं थाटात आगमन त्यानंतर दीड दिवसांनी गॅलरीमध्ये एका बादलीत गणेशमूर्तीचं विसर्जन होतं. साधारण अर्ध्या तासानं ती मूर्ती बाहेर काढून, स्वच्छ करून कपाटात ठेवली जाते आणि पुढच्या गणेशोत्सवात वापरली जाते.