मुंबई, 23 मार्च- साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट यंदाच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मोजक्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाला मिळालेल्या अफाट यशानंतर त्याचा दुसरा भाग म्हणजेच 'पुष्पा द रुल पार्ट 2' (Pushpa The Rule Part 2) लवकरच फ्लोअरवर येणार आहे. मात्र, या चित्रपटापूर्वी या चित्रपटाशी संबंधित एक खास बातमी समोर आली आहे. चर्चांवर विश्वास ठेवला तर, 'पुष्पा 2' च्या आयटम साँगमध्ये समंथा रुथ प्रभूऐवजी (Samantha Ruth Prabhu) आता बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. म्हणजेच दिशाने या चित्रपटात सामंथाची जागा घेतली आहे.
दिग्दर्शक सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटाला हिंदी प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला. 'पुष्पा'ची गाणी आणि संवाद डायलॉग प्रचंड गाजले होते. या चित्रपटाची क्रेझ अजूनही लोकांमध्ये दिसून येते.
समंथाचं 'ओ अंटावा' गाणं-
'पुष्पा: द राइज' हा चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने एकट्या हिंदी पट्ट्यात 100 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंधाना (Rashmika Mandanna) होती. या चित्रपटात दोघांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. तर, समंथा रुथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu) चित्रपटातील 'ओ अंटावा' (Oo Antava) हे आयटम साँग केलं होतं. या गाण्याने देश-विदेशात धुमाकूळ घातला. या गाण्याची लोकांमध्ये खूप चर्चा झाली. किंबहुना हे गाणं अजूनही लोकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे. समंथाने तिच्या किलर डान्स स्टेप्स आणि एक्सप्रेशनने सर्वांना वेड लावलं. मात्र, आता या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये समंथाच्या जागी दिशा पटानी दिसणार असल्याची माहिती मिळत आहे.
दिशाने समंथाला केलं रिप्लेस!
'पुष्पा 2'मध्ये दिशाच्या एंट्रीबाबत कोईमोई डॉटकॉमच्या रिपोर्टनुसार, दिशा पटानी या चित्रपटात समंथा रुथ प्रभूची जागा घेणार आहे. येत्या काही दिवसांत या गाण्याचं शूटिंग होईल असंही म्हटलं जातंय. रिपोर्टनुसार, दिशा पटानीला दिग्दर्शक सुकुमार यांनी पहिल्या भागात म्हणजेच 'पुष्पा: द राइज'मध्ये आयटम साँगसाठी विचारणा केली होती. म्हणजेच दिशा पटानी ‘ओ अंटावा’ गाण्यात समंथाच्या जागी दिसली असती, पण काही कारणास्तव दिशाने नकार दिला होता. त्यानंतर ते गाणं समंथाने केलं होतं. मात्र, जेव्हा मेकर्स टीमने दिशाला पुन्हा दुसऱ्या भागासाठी विचारणा केली, तेव्हा तिने होकार दिला. 'कोईमोई'मधील एका रिपोर्टनुसार, दिग्दर्शक सुकुमार यांनी स्वतः दिशाशी संपर्क साधला आहे. मात्र, अद्याप दिग्दर्शक किंवा दिशा कोणाच्याही बाजूने याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Allu arjun, Disha patani, Entertainment, South actress