मुंबई, 18 डिसेंबर : ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी दिलेलं योगदान अतिशय मोठं होतं. रंगभूमीवरही त्यांनी केलेली अनेक नाटकं प्रचंड गाजली होती. श्रीराम लागू यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 या दिवशी झाला होता. त्यांचं शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झालं होतं. देवाला रिटायर करा या त्यांच्या वक्तव्याने काही दशकांपूर्वी महाराष्ट्रात प्रचंड खळबळ माजली होती. चित्रपटांशिवाय त्यांचं अंधश्रद्धा निर्मुलन क्षेत्रातही मोठं योगदान होतं. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत त्यांनी अनेक कार्यक्रम केले आणि पुरोगामी विचारांची पेरणी केली. रंगभूमीवरच्या प्रेमापोटीच त्यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सोडून नाट्यक्षेत्रात प्रवेश केला होता. व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ या सिनेमाने 44 वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीतला नवा अध्याय घडवला होता. डॉ. लागू यांच्यासह संध्या आणि निळू फुले यांच्या भूमिका या सिनेमात होत्या. जगदीश खेबुडकरांची गीते, राम कदम यांचे संगीत आणि शांतारामबापूंचे अजोड दिग्दर्शन यामुळे ‘पिंजरा’ने इतिहास घडवला होता. या सिनेमाचे डिजिटायझेशनकरण्यात आले आणि 18 मार्च 2016 ला तो सिनेमा पुन्हा प्रदर्शित केला गेला. त्यावेळी डॉ. लागू यांनी आठवणींचा पट उलगडला होता. डॉ. लागू म्हणाले होते की, व्ही. शांताराम यांच्यासारख्या ताकदीच्या व्यक्तीसोबत मला चित्रपटातले पहिले काम करण्याचा योग आला आणि मी अक्षरश: शांताराममय होऊन गेलो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कामाचा प्रभाव इतका विलक्षण होता की, पहिल्याच भेटीत मी कधीही न केलेली गोष्ट माझ्याकडून झाली आणि ती म्हणजे मी चक्क त्यांच्या पायांवर डोके ठेवले. मी आतापर्यंतच्या आयुष्यात अत्यंत कमी व्यक्तींना असे वंदन केले. त्यामध्ये व्ही. शांताराम होते. त्यांच्यात अफाट प्रतिभा आणि कर्तृत्व होते, त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याचं मला दु:ख होत नाही नट बापूंनी जागा केला या कार्यक्रमात श्रीराम लागूंनी व्ही शांताराम यांची आणखी एक आठवण सांगितली होती. ते म्हणाले, मी नट होतो, अभिनेता होतो, रंगभूमीचा अनुभव होता. त्यामुळे चित्रपटात काम मिळावे, ही अपेक्षा होतीच. पण बापूंनी पहिल्याच वाक्यात माझी विकेट घेतली होती. पण त्या गप्पांमधूनच त्यांनी माझ्यातला नट जागा केला.. माझ्यासारख्या अत्यंत नवख्या नटावरचा त्यांचा विश्वास पाहून मी भारावून गेलो होतो. मी स्वत: जोवर मराठी चित्रपटांत काम करत नव्हतो, तोवर मराठी चित्रपटांविषयी माझी मते फारशी चांगली नव्हती; पण बापूंसारखी माणसे आहेत, तोवर मराठी सिनेमा टिकून राहील, असा विश्वास असल्याचे लागू म्हणाले होते. ‘पिंजरा’ नावालाच केला होता विरोध सिनेमा ‘पिंजरा’ या नावालाच माझा विरोध होता. आम्ही कलाकार काय जनावरे आहोत का, पिंजऱ्यात काम करायला, असे मी विचारत असे. पण चित्रीकरण होत गेले, तसा माझा विचार मूर्खपणाचा होता, हे मला उमगत गेले. हा पिंजरा लोखंडाचा वा लाकडाचा नाही, तर माणसाच्या जाणिवांचा आहे. त्यात माणूस कसा अलगद अडकतो, हे त्यात दाखवण्यात आल्याचे डॉ. लागू म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.