मुंबई, 14 जानेवारी : डोंबिवली फास्ट हा सिनेमा रिलीज झाला होता, तेव्हा मराठी सिनेमात क्रांती आल्याची भावना निर्माण झाली होती. खरोखर त्यानंतर हळूहळू मराठी सिनेमाचं रूपच पालटलं होतं. त्यात संदीप कुलकर्णीची मुख्य भूमिका होती. त्याला अनेक पुरस्कारही मिळाले होते. लोकलचे खडखडणारे रूळ. मुंबई महानगरातली प्रचंड गर्दी. त्याबरोबरीनं येणारे प्रश्न आणि मनातला कोलाहल. ‘डोंबिवली रिटर्न’ जे जातं…तेच परत येतं? या चित्रपटाच्या टीजरमधून हे सगळं वेगवान आणि लक्षवेधी पद्धतीनं मांडण्यात आलं आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.
कंरबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून संदीप कुलकर्णी, महेंद्र अटोले, गुरमित सिंग, कपिल झवेरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेंद्र तेरेदेसाई यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात संदीप कुलकर्णी आणि राजेश्वरी सचदेव यांच्यासह हृषिकेश जोशी, अमोल पराशर, त्रिश्निका शिंदे, सिया पाटील आदींच्या भूमिका आहेत. संदीप कुलकर्णी साकारत असलेल्या अनंत वेलणकर या व्यक्तिरेखेभोवती हा चित्रपट फिरतो. सर्वसामान्य आयुष्य जगणाऱया अनंत वेलणकरच्या आयुष्यात असं काय घडतं की त्याचं आयुष्य बदलून जातं याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. चित्रपटाचा वेगवान टीजर पाहताना मुंबईच्या लोकलमध्ये धक्के खात प्रवास करणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आपलासा वाटेल असा हा चित्रपट असल्याचं स्पष्ट जाणवतं. 22 फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होतोय. पहिल्यांदाच सिनेमाचा टीझर रिलीज झालाय.त्यावरून सिनेमाची कल्पना येते आणि डोंबिवली फास्ट सिनेमाची आठवणही येते. PHOTOS : ‘उरी’ सिनेमा पाहण्यासाठी पोहचले ‘हे’ सेलिब्रिटी, विकी कौशलचं केलं कौतुक