मुंबई,6 एप्रिल- प्रसिद्ध साऊथ सुपरस्टार (South Superstar) यशचा (Yash) ब्लॉकबस्टर चित्रपट 'KGF Chapter 2' 14 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आणि रवीना टंडन (Raveena Tandon) यांच्यासह साऊथ अभिनेत्री श्रीनिधी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात संजय दत्त एका जबरदस्त अंदाजात दिसणार आहे. संजय जी भितीदायक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे ती काल्पनिक नसून सत्य कथेवर आधारित आहे. या सोन्याच्या खाणीची सत्य कथा ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या कथेवरच हा चित्रपट बनविण्यात आला आहे. सोन्याच्या हव्यासापोटी केजीएफच्या परिसरात रक्तपात आणि प्रगतीही पाहायला मिळाली. जाणून घ्या काय आहे सत्य.
प्रसिद्ध साऊथ चित्रपट KGF ची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली की पहिल्या भागानंतर लोक सिक्वेलची मागणी करू लागले होते. या चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे. ज्या सोन्याच्या खाणीवर चित्रपट बनला आहे त्याचा इतिहास सुमारे 121 वर्षांचा आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार, प्रत्यक्षात KGF म्हणजेच 'कोलार गोल्ड फिल्ड्स'ची कथा रक्तरंजित आहे. जिथे सोन्याचा साठा असेल तिथली कथा रक्तरंजित असेल. सोन्याने समृद्ध असलेल्या या भागात अनेक धक्कादायक गोष्टी ऐकायला मिळतात.
डीएनएच्या रिपोर्टनुसार 121 वर्षांपूर्वी केजीएफमध्ये उत्खननादरम्यान 900 टन सोने सापडले होते. कर्नाटकात हे कोलार गोल्ड फील्ड आहे. या खाणीबद्दल ब्रिटिश सरकारचे लेफ्टनंट जॉन वॉरन यांनी एक लेख लिहिला होता. त्यानुसार 1799मध्ये श्रीरंगपट्टणाच्या लढाईत टिपू सुलतानचा वध करून कोलार आणि आजूबाजूचा परिसर ब्रिटिशांनी ताब्यात घेतला होता. काही वर्षांनंतर, ब्रिटिशांनी ही जमीन म्हैसूर राज्याला दिली होती. परंतु कोलार हा सोन्याचा प्रदेश त्यांच्याकडे ठेवला होता.
वॉरनच्या या लेखानुसार चोल साम्राज्याच्या काळात लोक हाताने जमीन उकरून सोने काढायचे. एकदा वॉरनने गावकऱ्यांना आमिष दाखवून सोने बाहेर काढण्यासाठी खोदकाम करण्यास भाग पाडलं, तेव्हा मातीच्या ढिगाऱ्यातून सोन्याचे काही कणच हाती लागले. त्यामुळे नंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, तरीही त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट अनेक मजुरांना जीव गमवावा लागला. कंटाळून ब्रिटिश सरकारने उत्खननावर बंदी घातली. खरं तर सोनं मिळवणं तितकसं सोपं नव्हतं.
वॉरनचा हा लेख अनेक वर्षानंतर म्हणजेच 1871 मध्ये ब्रिटीश सैनिक मायकेल फिट्झगेराल्ड लेवेलीने वाचला आणि त्याला सोनं मिळविण्याचं अक्षरशः वेड लागलं होतं. यासाठी त्यांनी संशोधन सुरू केलं होतं. 1873 मध्ये म्हैसूरच्या महाराजांकडून उत्खननासाठी परवानगी मिळाली आणि 1875 मध्ये उत्खनन सुरू करण्यात आलं होतं. हे काम किती भयानक होतं याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.
खाणीत उजेडासाठी मशाल आणि कंदीलचा वापर करण्यात येत होता. हा प्रकाश खाणीसाठी पुरेसा नव्हता, म्हणून सर्वप्रथम लवलीने येथे विजेची व्यवस्था केली. मीडिया रिपोर्टनुसार, सोन्याचं आमिष इतकं होतं की, वीजपुरवठा सुरु झालेलं KGF हे भारतातील पहिलं क्षेत्र बनलं होतं. 1902 मध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने 95 टक्के सोनं बाहेर काढण्यात येत होतं. खाणीत 30 हजार मजूर कामाला लागले होते. लेवलीचा प्रयोग यशस्वी झाला, आणि खाणीतून अफाट सोनं मिळायला सुरुवात झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Sanjay dutt, South film, Upcoming movie