मुंबई,4 मे- बॉलिवूडमध्ये देओल कुटुंबाची प्रचंड चर्चा असते. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. आजही धर्मेंद्र पडद्यावर सक्रिय आहेत. त्यांच्या पाठोपाठ त्यांची मुले सनी देओल आणि बॉबी देओल यांनीसुद्धा इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. अशातच सनी देओल चा मुलगा करण देओलनेसुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. मात्र आजोबा आणि वडिलांप्रमाणे त्याला यश मिळू शकलं नाही. सध्या करण आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. करण लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती समोर आली आहे. मनोरंजनसृष्टीत देओल कुटुंबाशी संबंधित बातम्या सतत कानावर येत असतात. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी नुकतंच आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. सध्या सनी देओल आपल्या आगामी ‘गदर 2’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.अशातच आता देओल कुटुंबाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सनीने आपला मुलगा करण देओलचा गुपचूप साखरपुडा उरकला आहे. परंतु ही गोष्ट त्यांनी अत्यंत खाजगी ठेवली आहे. रिपोर्ट्सनुसार, या कार्यक्रमात फक्त देओल कुटुंबातील जवळचे लोक उपस्थित होते. करणच्या साखरपुड्याची बातमी समोर येताच सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे. (हे वाचा: Tejasswi Prakash Surname: मराठमोळ्या तेजस्वी प्रकाशचं आडनाव माहितेय का? ऐकून रोहित शेट्टीही चकित ) वडील आणि आजोबांप्रमाणे करण देओलसुद्धा एक अभिनेता आहे. करण देओलने ‘पल पल दिल के पास’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. धर्मेंद्र यांचा नातू करणही कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तो एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला होता. तेव्हापासून त्याच्या लव्ह लाईफच्या चर्चा सुरु झाली होती. आता म्हटलं जात आहे की, करणने आपल्या याच लॉन्ग टाईम गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
करणच्या साखरपुड्याची बातमी समोर येताच प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे की देओल कुटुंबाची होणारी सून नेमकी कोण आहे? मीडिया रिपोर्ट्सनुसार, करणची गर्लफ्रेंड सिनेसृष्टीशी निगडित नसल्याचं सांगितलं जात आहे. यामुळेच देओल कुटुंबीय तिच्याबद्दल फारशी माहिती देऊ इच्छित नाहीयेत. रिपोर्ट्समध्ये असंही सांगितलं जात आहे की, दोन महिन्यनापूर्वी देओल कुटुंबाने आपल्या गावी करणच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र याबाबत अद्याप देओल कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीय. करण देओल सध्या बॉलिवूडमध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या पहिल्या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. मात्र सिनेमाला हवं तितकं यश मिळू शकलं नव्हतं. दरम्यान करण देओल लवकरच ‘अपने’चा सिक्वेल ‘अपने २’ मध्ये आजोबा धर्मेंद्र आणि काका बॉबी देओलसोबत झळकणार आहे.