'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेमुळे टीव्ही कलाकार मुनमुन दत्ता (Munmun Dutta) उर्फ बबिता (Babita) घराघरात पोहोचली आहे. परंतु सध्या ही अभिनेत्री अडचणीत सापडली आहे.
मुंबई, 29 जानेवारी- 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेमुळे टीव्ही कलाकार मुनमुन दत्ता (Munmun Dutta) उर्फ बबिता (Babita) घराघरात पोहोचली आहे. परंतु सध्या ही अभिनेत्री अडचणीत सापडली आहे. मुनमुनचा अटकपूर्व जामीन अर्ज हिसारच्या SC-ST कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अजय तेवतीया यांनी फेटाळून लावला आहे. त्यामुळे बबिता अर्थातच मुनमुन दत्ताला अटक होण्याची भीती निर्माण झाली आहे.
काय होतं प्रकरण-
मुनमुन दत्ता म्हणजेच 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम बबिता हिने गेल्या वर्षी 9 मे रोजी तिच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्या व्हिडीओमध्ये अनुसूचित जातीजमातीबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्याबद्दल दलित हक्क कार्यकर्ते आणि वकील रजत कलसन यांनी हांसी पोलीस स्टेशनमध्ये 13 मे रोजी एक गुन्हा दाखल केला होता. SC-ST कायद्याच्या कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हरियाणातील हांसी व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मुनमुन दत्ता विरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्या होता.
या प्रकरणांबाबत मुनमुन दत्ताने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून सर्व प्रकरणांची चौकशी हरियाणातील हांसी येथे एकाच ठिकाणी करण्याची मागणी केली होती. याशिवाय मुनमुन दत्ताने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आपल्यावर दाखल झालेले सर्व खटले रद्द करण्याची मागणी केली होती. अभिनेत्रीची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर मुनमुन दत्ताने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेत अटकेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. परंतु नंतर त्यांच्या वकिलाने उच्च न्यायालयातून याचिका मागे घेतली होती.
त्यांनतर तिनं हिसारच्या SC-ST कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यावर 25 जानेवारीला दोन्ही बाजूंची वादावादी झाली. आज न्यायालयाने मुनमुन दत्ता म्हणजेच बबिताची याचिका फेटाळून लावली आहे. याआधीही दलित हक्क कार्यकर्ते रजत कलसन यांनी माजी क्रिकेटपटू युवराज सिंह आणि अभिनेत्री युविका चौधरी यांच्यावर दलित समाजाबद्दल अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांनाही जामीन मिळवावा लागला होता.
Published by:Aiman Desai
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.