मुंबई, 21 डिसेंबर : सध्या नागरिकत्व दुरूस्ती कायद्या(CAA) विरोधात देशभरात सर्वत्र आंदोलनं सुरू आहेत. काही ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळणही मिळालं ज्यामुळे देशात अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधाही खंडित करण्यात आली होती. या आंदोलनामध्ये बॉलिवूडकरही उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता फरहान अख्तरनं या कायद्याला विरोध करणारं एक ट्वीट केलं होतं. पण आता असं करणं फरहानला चांगलंच महागात पडलं आहे. फरहान अख्तरनं CAA विरोधात केलेल्या ट्वीटमुळे हैदराबाद पोलिसांनी त्याच्यावर कलम 121 (सरकार विरोधात युद्ध पुकारणं किंवा युद्धाला प्रोत्साहन देणं), 121 अ (सरकार विरेधात युद्धाचा कट रचणं), 120 ब (गुन्हेगारी कट रचणं) आणि कलम 505 (समाजात तेढ निर्माण करणं) नुसार गुन्हा दाखल केला आहे. के करुणा सागर असं फरहान विरोधात तक्रार करणाऱ्या व्यक्तीचं नाव असून करुणा सागर हे व्यवसायानं वकील आहेत. फरहाननं देशविरोधी ट्वीट केल्याचा आरोप या वकीलानं केला आहे. काही दिवसांपूर्वीच फरहान अख्तरनं CAA विरोधात ट्वीट केलं होतं. त्यानं लिहिलं, ‘या आंदोलनाची गरज का आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला गरज आहे. मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात 19 डिसेंबरला भेटूयात. सोशल मीडियावर एकट्यानं आंदोलन करण्याचा काळ आता संपला आहे.’ यासोबतच फरहाननं CAA आणि CAB बद्दल सविस्तर माहिती सुद्धा त्याच्या ट्वीटमध्ये दिली होती.
फरहान अख्तरवर आरोप आहे की, त्यानं या ट्वीटमधून समजात भीती निर्माण करण्यासोबतच देशातील मुस्लिम, तृतीयपंथी आणि दलित लोकांना देशाविरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यानं समाजातील विविध लोकांमध्ये शत्रुत्व पसरवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
Well done Mumbai on a peaceful protest today and a special shout out to the @MumbaiPolice for overseeing the safety and security of all gathered. #Respect
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) December 19, 2019
फरहान अख्तर व्यतिरिक्त बॉलिवूडमधील इतर कलाकारांनीही या कायद्याला विरोध दर्शवला आहे. यात आयुष्मान खुराना, राजकुमार राव, परिणीती चोप्रा, आलिया भट, स्वरा भास्कर आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप इत्यादी कलाकारांचा समावेश आहे.