मुंबई,12 मार्च- ‘चला हवा येऊ द्या’ हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो आहे. या शोमधील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. यामध्ये अभिनेता कुशल बद्रिके चादेखील समावेश आहे. कुशलचा मोठा चाहतावर्ग आहे. कुशल सोशल मीडियावरुन सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. अभिनेता नियमित आपल्याला आलेले अनुभव आणि दैनंदिन घडामोडी शेअर करत असतो. आजही अभिनेत्याने असंच काहीसं केलं आहे. ‘चला हवा येऊ द्या’ हा शो जवळजवळ प्रत्येकाचाच आवडता शो बनला आहे. या शोमध्ये प्रत्येक एपिसोडला नवनवीन सेलिब्रेटी सहभागी होत असतात. या सेलेब्रेटींसोबत मोकळेपणाने गप्पा तर होतातच शिवाय शोमधील कलाकार अफलातून कॉमेडी करतांना दिसून येतात. या कलाकारांचे ऍक्ट सर्वांनाच पोट धरुन हसायला भाग पाडतात. याशोमधील बरेच कलाकार स्त्री पात्र साकारताना दिसून येतात. यामध्ये अनेक गमतीजमती घडत असतात. (हे वाचा: Saorabh Choughule: ‘जीव माझा गुंतला’ फेम मल्हारच्या हातावर आहे खास टॅटू; अभिनेत्याने अखेर सांगितला त्याचा अर्थ ) नुकतंच या कार्यक्रमात महाराष्ट्राची लाडकी चंद्रा अर्थातच अभिनेत्री अमृता खानविलकरने हजेरी लावली होती. अमृताच्या चंद्रा या गाण्याने आणि डान्सने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं. दरम्यान शोमध्ये अभिनेता कुशल बद्रिकेने चंद्राची मजेशीर भूमिका साकारली होती. यावेळी कुशलने चंद्रा गाण्यावर डान्सचा जलवाही दाखवला. मात्र अमृताच्या डान्सची एनर्जी आणि तिच्या स्टेप्सला फॉलो करताना काय दमछाक होते, हे सर्व कुशलने आपल्या मजेशीर अंदाजात सांगितलं आहे.
कुशल बद्रिकेने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहलंय, ‘‘अमृता खानविलकर ने केलेला चंद्रा चा डान्स वाटतो तितका सोपा नाही बरं, आमच्या @snehalshidam चा जवळ जवळ “जीव गेला “, मला शिकवता शिकवता. शेवटी माझा नृत्याविष्कार बघून अमृताचाही जीव जाता जाता राहिला . एकदा अजय-अतुल यांना प्रत्यक्ष करुन दाखवेनच म्हणतोय माझा डान्स’’.
कुशलने या एपिसोडमध्ये अगदी धम्माल केली आहे. या शोचा नवा प्रोमो सध्या जोरदार चर्चेत आला आहे. शिवाय आपल्याला स्नेहल शिदमने हा डान्स शिकवल्याचं कुशलने म्हटलं आहे. मात्र अभिनेत्याचा डान्स पाहून सर्वच लोक कुशलच्या नव्याने प्रेमात पडले आहेत.