मुंबई, 28 फेब्रुवारी : एखाद्या सेलिब्रिटीने रिॲलिटी शोच्या माध्यमातून स्वयंवर किंवा लग्न करणं तसं नवं नाही. यापूर्वी राखी सावंत (Rakhi Sawant) , मल्लिका शेरावत (Mallika Sherawat), रतन राजपूत (Ratan Rajput) , राहुल महाजन (Rahul Mahajan) यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचे टेलिव्हिजनवर स्वयंवर झाले आहे. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडणार असून ते नाव म्हणजे लोकप्रिय गायक मिकासिंग (Mika Singh) . रिॲलिटी शोच्या माध्यमातून आपला जीवनसाथी शोधण्याच्या तयारीत मिका आहे. तो लोकप्रिय गायक असून त्याची अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. मिकाला विशेषतः तरुणाईची पसंती आहे. त्याचे नाव अनेकदा वादातही आले आहे. असं असेल स्वरूप हा शो रंजक असेल, यात शंका नाही. टाइम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या शोबाबत सर्व नियोजन पूर्ण झाले आहे. हा एक रिॲलिटी शो असेल जो स्वयंवरासारखाच असेल. शोच्या स्वरूपाबाबत सुद्धा संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. हा शो काही महिन्यांनी प्रसारित होईल. यात फक्त मिकासिंग साखरपुडा करणार आहे. यानंतर संबंधित नातं पुढे न्यायचं का नाही, याबाबत तो वैयक्तिक आयुष्यात निर्णय घेईल. मिकासिंग स्वतः या शोमध्ये सहभागी होण्यासाठी खूप उत्सुक आहे. राखी सावंत सहभागी होणार का? या शोमध्ये कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतदेखील सहभागी होऊ शकते, असं बोललं जातंय. राखी व मिका या दोघांमध्ये दीर्घकाळ भांडण सुरू होतं. एका पार्टीत मिकाने राखीचं जबरदस्तीने चुंबन घेतलं होतं, त्यानंतर दोघांमध्ये बराच वेळ भांडण सुरू होतं. मात्र, नंतर दोघांनी परस्पर वाद मिटवला. आता राखी सावंतदेखील मिकाच्या शोचा भाग असू शकते, असा अंदाज लावला जातोय. यात किती तथ्य आहे, हे शो सुरू झाल्यानंतर कळेल. विविध सुपरहिट गाण्यांना दिला आवाज मिकासिंगने अनेक ब्लॉकबस्टर गाणी गायली आहेत. यामध्ये ‘सिंग इज किंग’, ‘आपका क्या होगा’, ‘गंदी बात’, ‘जुम्मे की रात’, ‘आज की पार्टी’, ‘सावन में लग गई आग’ यासह अनेक हिट गाण्यांचा समावेश आहे. मिकाचं स्वयंवर पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. 44 वर्षांचा मिका लग्नाबाबत नॅशनल टेलिव्हिजनवर काय निर्णय घेणार हे पाहणं रंजक ठरेल. मिकासिंगचं स्वयंवर नेमकं केव्हा सुरू होतंय, आणि ते कोणत्या चॅनलेवर दाखवलं जाणार, याबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.