मुंबई, 2 मार्च : बॉलिवूड मध्ये असे खूप कमी कलाकार आहेत, जे सामाजिक प्रश्नांवर स्पष्टपणे आपले विचार मांडतात. किंवा सामजिक मुद्द्यांवर सोशल मीडियाद्वारे आपलं मत व्यक्त करतात त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री 'तापसी पन्नू' होय. तापसी ही सतत सामाजिक विषयांवर सोशल मीडियाद्वारे आपलं मत व्यक्त करत असते. 'थप्पड'सारख्या विषयांवर चित्रपट केल्यानंतर तर तापसीची स्त्रीवादी भूमिका चित्रपटांमधूनही सातत्याने व्यक्त झाली आहे. नुकत्याच एका बलात्कार प्रकरणात कोर्टाने घेतलेल्या भूमिकेवर तापसीने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एस. एम. बोबडे यांच्या वक्तव्यावर तापासीने आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक प्रोडक्शन कंपनीच्या' टेक्निशियन वर एका शालेय विद्यार्थिनीने बलात्काराचा आरोप करत गुन्हा नोंदवला होता. त्या केसच्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश एस. एम. बोबडे यांनी एक वक्तव्य केलं. "आरोपीशी लग्न करायची बलात्कार पीडितेची इच्छा आहे का?' असं त्या मुलीला विचारण्यात आलं. त्यावर बातम्याही प्रसिद्ध झाल्या. याच वक्तव्यावर तापसी भडकली आहे. तापसीने आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत हे किळसवाणं (Disgusting) असल्याचं म्हटल आहे. "त्या मुलीला असा प्रश्न कोणी कसा विचारला? ती बलात्काऱ्याशी लग्नाला तयार आहे का? हा काय प्रश्न आहे? ही शिक्षा आहे की यातून काढलेला मार्ग? डिस्गस्टिंग!" अशा शब्दांत तापसीने आपला रोष व्यक्त केला आहे .
तापसी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका समजली जात असे. आता ती हिंदी चित्रपटसृष्टीत रुळली आहे. आपल्या सर्वगुणसंपन्न अभिनयच्या जोरावर तापसीने खूप कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपली एक विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. तसेच विविध प्रकारच्या भूमिका साकारून आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे.
बलात्कारपीडिता आरोपीबरोबर लग्नाला तयार आहे का असा प्रश्न विचारण्यात आल्यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनीसुद्धा न्यायाधीशांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे,'हा कोणता न्याय आहे? न्यायाधीशांच्या या वक्तव्याच मला कोणी लॉजिक सांगू शकतं का ?
तापसी पन्नूने 'पिंक', 'मनमार्जीया', 'थप्पड', 'शबाना' अशा विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांत अभिनय केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.