मुंबई, 19 एप्रिल: सौंदर्य आणि अभिनयाचा सुंदर मिलाफ म्हणजे अभिनेत्री रेखा (Rekha). सदाबहार अभिनेत्री रेखा यांचे असंख्य चाहते आहेत. या वयातही त्यांचं सौंदर्य अनेक अभिनेत्रींना लाजवेल असं आहे. ऐन तारुण्यात त्या जितक्या सुंदर दिसायच्या तितक्याच त्या आजही सुंदर दिसतात. मागच्या 6 दशकांपासून बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या रेखा यांच्या सौंदर्यासोबतच त्यांच्या अभिनयाची जादू अद्याप प्रेक्षकांवर कायम आहे. पण फिल्मी करिअरसोबतच रेखा त्यांच्या खासगी जीवनामुळे प्रचंड चर्चेत राहिल्या. मग ते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबतचं त्यांचं नातं असो वा त्यांचं बालपण. त्यांचं खासगी आयुष्य तर आजही न उलगडलेलं कोडं आहे. आज त्यांच्या जीवनातील एक किस्सा आपण जाणून घेणार आहोत.
अभिनेत्री रेखा यांना सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला. त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यासोबत चित्रपटाच्या सेटवर एक अशी घटना घडली, ज्यामुळे त्या खूप घाबरल्या होत्या. रेखा यांनी 1966 मध्ये तेलुगू चित्रपट 'रंगुला रत्नम'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यांना चित्रपटात काम करण्यात फारसा रस नव्हता, पण कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे अभिनय करावा लागला. या संदर्भात एबीपी लाईव्हनं वृत्त दिलंय.
त्यांचे वडील त्यांच्यासोबत राहत नव्हते. तर, आई तेलुगू अभिनेत्री होती. पण त्यांची आई पुष्पवल्ली यांना उतारवयात चित्रपटात काम मिळणं बंद झालं आणि घरची आर्थिक परिस्थिती ढासळली. अशा परिस्थितीत 13 वर्षांच्या रेखा यांना चित्रपटात काम करण्यास भाग पाडलं गेलं. एका मुलाखतीत रेखा यांनी सांगितलं होतं की, “मी 9वीत असताना माझं शिक्षण थांबवलं गेलं. तेव्हा माझ्या आईवर किती कर्ज आहे, हे मला खूप दिवस माहीत नव्हतं. बऱ्याचदा मी चित्रपटाच्या सेटवर जायला नकार द्यायचे तेव्हा माझा भाऊ मला मारायचा," अशी आठवण त्यांनी सांगितली होती.
तेलुगू चित्रपटांमध्ये (Telugu Movies) बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर 1969 मध्ये हिंदी चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्यासाठी रेखा आपल्या आईसोबत मुंबईत आल्या. येथे त्यांनी 'अंजाना सफर' हा पहिला चित्रपट साईन केला. या चित्रपटात अभिनेता बिस्वजीत यांची मुख्य भूमिका होती. पण हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी आलेल्या रेखांसोबत पहिल्याच चित्रपटात असं काही घडलं की मोठा वाद झाला. रेखा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना बिस्वजीत यांच्यासोबतच्या किसिंग सीनबद्दल माहिती देण्यात आली नव्हती.
दिग्दर्शकाने अॅक्शन बोलताच बिस्वजीत यांनी रेखा यांना किस (Biswajit kissed Rekha) केलं होतं. अचानक जे झालं त्यामुळे रेखा स्तब्ध झाल्या. आपल्यासोबत फसवणूक झाली हा विचार करून रेखा रडत राहिल्या. परंतु 14 वर्षांच्या रेखा यांना भीती वाटत होती की, जर त्यांनी तक्रार करत गोंधळ घातला तर त्यांची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात येईल, त्यामुळे त्यांनी याबाबत बोलणं टाळलं.
सौंदर्यवती रेखा यांच्या खासगी आयुष्याबाबत अनेक गोष्टी बाहेर आल्या आणि त्यामुळे त्या चर्चेतही राहिल्या. पण रेखा यांनी यावर कधी कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही, त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी केवळ चर्चा आणि अफवा बनून राहिल्या आहेत. हे जरी असलं तरीही सौंदर्य आणि अभिनयात आजही त्यांच्या तोडीची अभिनेत्री दृष्टिपथात नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment, Rekha