मुंबई, 04 मार्च: बॉलीवूडची क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. बॉलीवूडपासून राजकारणापर्यंत अनेक विषयांवर ती रोखठोक मतं मांडताना दिसते. सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असलेली कंगना अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही (Controversial Statements) अडकली आहे. अलीकडेच तिने फाटक्या जीन्सबद्दल (ripped jeans) टिप्पणी केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून जुन्या काळातील महिलांचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने जीन्स घालणाऱ्या महिलांवर टीका केली आहे.
खरंतर कंगना रणौतने काल एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये तिने जुन्या काळातील महिलांचं कौतुक केलं होतं. यामध्ये तिने असं लिहिलं आहे की, 'या महिलांनी केवळ त्यांचं व्यक्तिमत्त्वच दर्शवलं नाही, तर संपूर्ण संस्कृतीचं आणि राष्ट्राचं प्रतिनिधित्व देखील केलं आहे. आजच्या जगात अशाप्रकारे यश मिळवणाऱ्या महिलांचे फोटो काढले जातात. ज्यामध्ये त्या फाटलेल्या अमेरिकन जीन्स आणि चिंध्याप्रमाणे ब्लाउज परिधान करतात. या महिला अमेरिकन मार्केटींगशिवाय इतर कशाचंही प्रतिनिधित्व करत नाहीत.'

कंगनाच्या या ट्विटनंतर आता अनेक नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. कंगनाने जीन्स परिधान केलेले जुने फोटो शेअर नेटकऱ्यांनी कंगनाच्या दुतोंडीपणावर चांगलेच संतापले आहेत. तर अनेकांनी मिम्स बनवून कंगनावर खोचक टीका केली आहे.
हे ही वाचा - 'चिंध्यांसारखा ब्लाऊज घालून...', कंगनाने दीपिका पादुकोणला पुन्हा केलं टार्गेट
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कंगना रणौतला मॉडर्न ड्रेस आणि फाटलेल्या जीन्स परिधान केल्यामुळे चांगलचं झापलं आहे. कंगनाने या ट्विटच्या माध्यमातून दीपिका पादुकोणला लक्ष्य केलं होतं. कारण दीपिकाने नुकतचं एका अमेरिकन कंपनीच्या जीन्सची जाहिरात केली होती. दीपिकाने संबंधित जीन्सच्या जाहिरातीचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला होता. त्यामुळे कंगनाने दीपिकाचं नाव न घेता टीका केली होती. आता हे प्रकरण कंगना राणौतच्याच अंगलट येताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.