अभिनेत्री दिया मिर्झाने 15 फेब्रुवारी 2021 मध्ये उद्योजक वैभव रेखीसोबत लग्न केलं. हे लग्नं अनेक कारणांनी चर्चेत आलं होतं. हे लग्न त्यांनी अत्यंत साधेपणाने केलं होतं. त्यामध्ये फक्त दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या काही मित्रांचा समावेश होता.
लग्नामध्ये दियाने पारंपरिक असा लाल रंगाचा बनारसी शालू परिधान केला होता. तर वैभवने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता.
ब्रूटला दिलेल्या एका मुलाखतीत दियाने सींगितलं, मी गेल्यावेळी माझ्या सर्व कपड्यांचा लिलाव केला होता. मात्र यावेळी मी ठरवलं होतं की लग्नासाठी असे कपडे खरेदी करायचे जे मला नंतरसुद्धा वापरता येतील. वैभवनेसुद्धा असेच कपडे खरेदी केले होते. जे कधीही वापरता येतील, कपाटात पडून राहणार नाहीत.
दिया आणि वैभवने लग्नात आलेल्या सगळ्या पाहुण्यांना मेघालयातून मागवलेल्या लाकडी बास्केटमधून रोपं भेट म्हणून दिली होती. तसंच लग्नातील सजावटीसाठी स्थानिक मार्केटमधून फुलांची मागणी केली होती. विदेशी फुलांच्या वाहतुकीदरम्यान होणाऱ्या 'कार्बन फुटप्रिंट' टाळण्यासाठी दियाने हा निर्णय घेतला. या कार्बन फुटप्रिंटमुळे निसर्गाला मोठं नुकसान होतं.
दियाच्या लग्नातील सजावटीसाठी वापरलेली प्रत्येक गोष्ट स्थानिक मार्केटमधीलच होती. ज्यातील कितीतरी वस्तू या पुनर्वापर होणाऱ्या होत्या.
लग्नात थोडंसुद्धा अन्न वाया घालवण्यात आलं नाही. पाहुण्यांची संख्यासुद्धा मोजकीच होती. लग्नात आधीच शाकाहारी आणि मांसाहारी पाहुणे किती आहेत हे निश्चित करण्यात आलं होतं त्यानुसार जेवणाची तयारी करण्यात आली होती. त्यामुळे अन्न वाया जाण्याचा प्रश्नच नव्हता.
एकंदरच काय तर दियाने'ईको-फ्रेंडली' पद्धतीने लग्न केलं. पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याची पुरेपूर काळजी तिने घेतली.