मुंबई, 30 जुलै : मनोरंजनसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘बालिका बधू 2’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री केतकी दवेचा नवरा अभिनेते रसिक दवे यांचं निधन झालं आहे(Rasik Davre Death). त्यांच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. अभिनेते रसिक दवे यांचे शुक्रवारी रात्री 8 वाजता निधन झालं. किडनी खराब झाल्यानं त्यांचं निधन झालं असून वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं सगळीकडे शोककळा पसरली आहे. अभिनेते रसिक दवे गेल्या दोन वर्षांपासून डायलिसिसवर होते. रसिक दवे यांची किडनी खराब झाली होती.गेल्या एक महिन्यापासून त्यांना हा त्रास सुरु झाला होता. त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यानं गेल्या 15 दिवसांपासून ते रुग्णालयातच होते. शुक्रवारी अखेर त्यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली. रसिक दवे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबासाठी हा खूपच कठिण काळ आहे. त्यांचे चाहतेही खूप दुःखी असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. हेही वाचा - Pushpa 2 मधून अल्लू अर्जुनचा डबल फायर लुक व्हायरल, इंटरनेटचंही तापमान वाढवलं रसिक दवे यांनी हिंदी आणि गुजराती मालिका आणि कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. रसिक दवेने ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्री केतकी दवेसोबत लग्न केले होते. केतकी आणि रसिकची जोडी ‘नच बलिये’ या रिअॅलिटी शोमध्येही दिसले होते. या दोघांचाही हिंदी आणि गुजरातीमध्ये मोठा चाहता वर्ग आहे.
दरम्यान, रसिक यांनी ‘82’ मध्ये गुज्जू चित्रपट ‘पुत्र वधू’ द्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली आणि गुजराती आणि हिंदी दोन्ही माध्यमात काम केले. यानंतर त्यांनी ‘मासूम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनेक वर्षे इंडस्ट्रीपासून दूर राहिल्यानंतर रसिकने ‘संस्कार: धरोहर अपना की’ या टीव्ही मालिकेद्वारे इंडस्ट्रीत पुनरागमन केले. सीआयडी, महाभारत, अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय. याशिवाय त्यांनी गुजराती मालिका, नाटकांमध्येही काम केलं आहे.