मुंबई, 6 ऑक्टोबर : भारतामध्ये कमी काळात लोकांच्या पसंतीस उतरलेला ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून नेटफ्लिक्स (Netflix)कडे पाहिलं जातं. भारतीय प्रेक्षकांना नजरेसमोर ठेऊन अनेक चित्रपट आणि वेबसीरिज नेटफ्लिक्सने आणल्या आहेत. त्यातलीच एक भन्नाट डॉक्यूमेंट्री म्हणजे ‘बॅड बॉईज बिलेनिअर्स’ (Bad Boys Billionaires). रिलीज होण्याआधीपासूनच ही डॉक्यूमेंट्री वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. बॅड बॉईज बिलेनिअर्स या डॉक्युमेंटरीचे पहिले 3 एपिसोड्स रिलीज झाले आहेत. देशातील बँकांकडून मोठी कर्ज घेऊन देशाबाहेर फरार होणाऱ्या आणि घोटाळे करुन प्रसिद्ध झालेल्या काही उद्योगपतींच्या कहाण्या यात दाखवण्यात आल्या आहेत. मेहूल चोक्सी, बी रामलिंगा यांसारख्या उद्योगपतींचा डॉक्युमेंट्रीच्या प्रदर्शनाला सुरुवातीपासूनच विरोध होता. PNB घोटाळ्यातील मेहुल चोक्सीने डॉक्युमेंटरीविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका दाखल केली होती. डॉक्यूमेंट्री आम्हाला दाखवूनच रीलिज करावी अशी मागणी मेहूलने केली होती. पण त्याची ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली. मेहुलसोबतच अनेक बड्या उद्योगपतींनी आपले ‘उद्योग’ डॉक्यूमेंट्रीच्या स्वरुपात दाखवले जाऊ नयेत म्हणून प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं दिसत नाही. डॉक्यूमेंट्रीचे पहिले 3 एपिसोड्स हिरे व्यापारी नीरव मोदी, लिकरकिंग विजय माल्ल्या आणि सहारा ग्रुपच्या सुब्रतो रॉय यांच्या घोटाळ्यांवर दाखवण्यात आले आहे. पहिल्या तीन भागांवर आधारित या डॉक्युमेंटरीचा पहिला सिझन आहे. प्रदर्शनाच्या आधीच ही डॉक्यूमेंट्री वादात सापडल्याने प्रेक्षकांचं कुतूहल वाढलं आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी या डॉक्यूमेंट्रीला चांगले व्ह्यूज मिळाले आहेत. बॅड बॉईज बिलेनिअर्सचे पहिले तीन भाग सीरिज झाले असले तरी चौथा भाग दाखवण्यास अजूनही परवानगी मिळालेली नाही. डॉक्यमेंट्रीचा चौथा भाग सत्यम घोटाळा प्रकरणातले आरोपी रामलिंगा राजू यांच्या जीवनावर आधारित आहे. हैदराबाद कोर्टाने या एपिसोडच्या प्रदर्शनाला अद्याप परवानगी दिलेली नाही. पण पहिल्या 3 भागांनंतर प्रेक्षकांचं कुतूहल मात्र अधिकच वाढलं आहे. फसवणूक, भ्रष्टाचार आणि आर्थिक फेरफार करुन देशाबाहेर पळालेल्या उद्योगपतींबाबत ‘बॅड बॉईज बिलेनिअर्स’मध्ये माहिती दाखवण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.