मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'अवतार 2' तयार करण्यासाठी हजारो कोटी रुपयांचा वापर! जाणून घ्या जेम्स कॅमेरून यांचं विशेष निर्मिती तंत्र

'अवतार 2' तयार करण्यासाठी हजारो कोटी रुपयांचा वापर! जाणून घ्या जेम्स कॅमेरून यांचं विशेष निर्मिती तंत्र

अवतार 2

अवतार 2

भारतीय चलनानुसार अंदाजे दोन हजार 900 कोटी रुपये खर्च करून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटासाठी इतका खर्च कसा झाला, याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 20 डिसेंबर : 'टायटॅनिक' आणि 'द टर्मिनेटर' यांसारख्या चित्रपटांच्या निर्मितीमुळे हॉलिवूड दिग्दर्शक जेम्स कॅमेरून हे नाव जगप्रसिद्ध झालेलं आहे. 'लार्जर दॅन लाइफ' चित्रपट बनवण्यात कॅमेरून यांचा हातखंडा आहे. 16 डिसेंबर रोजी त्यांचा 'अवतार: द वे ऑफ वॉटर' हा चित्रपट जगभरात रिलीज झाला. हा चित्रपट 13 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'अवतार'चा सिक्वल आहे. 'अवतार 2' या नावानं लोकप्रिय होत असलेला हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकजण असं म्हणत आहे की, चांगला सिक्वेल कसा बनवायचा हे कॅमेरूनपेक्षा जास्त चांगलं कोणालाच माहीत नाही. पहिल्या चित्रपटापेक्षा 'अवतार 2' जास्त हिट होईल अशी अपेक्षा आहे. पण, कमाईचे उच्चांक गाठण्यात या चित्रपटाचं बजेट सर्वात मोठा अडथळा ठरू शकतं. समोर आलेल्या माहितीनुसार, 'अवतार 2' तयार करण्यासाठी 350 ते 400 मिलियन डॉलर्सदरम्यान खर्च आला आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे दोन हजार 900 कोटी रुपये खर्च करून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटासाठी इतका खर्च कसा झाला, याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  अवतारच्या दोन्ही भागांमध्ये 'पँडोरा' नावाच्या चंद्रावरील 'नावी' जमातीचं जीवन दाखवण्यात आलं आहे. जेम्स कॅमेरून हे उत्तम स्टोरीटेलर तर आहेतच शिवाय ते स्वतः एक उत्तम तंत्रज्ञदेखील आहेत. 'अवतार'साठी त्यांनी स्वतःच्या नाविन्यपूर्ण पद्धतीनं चित्रपट निर्मितीचं तंत्र विकसित केलं आहे. 'अवतार 2'च्या बाबतीत तर त्यांनी आपली पूर्ण ताकद लावलेली दिसत आहे. कॅमेरून यांच्या चित्रपट निर्मितीच्या तंत्रामध्ये विविध घटकांचा समावेश होतो.

  हेही वाचा - SRK म्हणजे शेखर राधा कृष्ण...; पठाणच्या वादात शाहरुखचा तो व्हिडीओ व्हायरल

  मोशन कॅप्चर नाही तर परफॉरर्मन्स कॅप्चर

  आपल्याला स्क्रीनवर दिसणारे पँडोरामधील नावी लोक मोशन ग्राफिक्सच्या माध्यमातून तयार केले गेले आहेत. त्या पात्रांची शारीरिक हालचाल ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. ते हातवारे कसे करतात, कसे चालतात इत्यादी गोष्टी टिपण्याचं काम मोशन कॅप्चरद्वारे केलं जातं. मोशन कॅप्चरसाठी कलाकारांना खास बॉडी सूट घातले जातात. या सूटमध्ये लहान लाल ठिपके असतात. प्रत्यक्षात हे मार्कर एक प्रकारचे मार्कर असतात जे स्थिर कॅमेर्‍यावर इन्फ्रारेड प्रकाश प्रतिबिंबित करतात. त्यांच्या मदतीनं कलाकारांची गती रेकॉर्ड होते.

  अवतारमधील पात्र आभासी आहेत. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव-भावना या पूर्णपणे मानवी असाव्यात, अशी कॅमेरून यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी मोशन कॅप्चर हेड गिअरच्या समोर एक छोटा एचडी कॅमेरा बसवला. हा कॅमेरा कलाकारांचे एक्सप्रेशन रेकॉर्ड करतो. हेडगिअरवर कॅमेरा बसवल्यामुळे अवतारमधील पात्रांच्या चेहऱ्यावर अगदी मानवाप्रमाणे वास्तविक भावना दाखवण्यात यश आलं. या एका गोष्टीनं प्रेक्षकांना सर्वांत जास्त आश्चर्यचकित केलं आहे.

  व्हॉल्युम कॅप्चर

  आतापर्यंत बर्‍याच चित्रपटांमध्ये नॉर्मल मोशन कॅप्चरचा वापर झाल्याचं आपण बघितलं आहे. पण, कॅमेरून यांनी वापरलेल्या तंत्रात 'द व्हॉल्युम' नावाचा एक वेगळा घटक आहे. काही फ्रेममध्ये शेकडो स्थिर कॅमेऱ्यांच्या मदतीनं बॉडी सूटवरील मार्कर रीड करण्यात आले. यामुळे, कोणत्याही ठिकाणी कॅरेक्टर किंवा वस्तूचा अचूकपणा अधिक चांगल्या पद्धतीनं टिपता येतो.

  फिजिकल फुटेज

  शूटिंग करताना एचडी कॅमेर्‍यांसह फिजिकल फुटेज देखील शूट केलं जातं. त्यामुळे मोशन कॅप्चरसह स्क्रीनवर ग्राफिक वर्ल्ड आणण्यासाठी अधिक सर्जनशील पर्याय उपलब्ध होतात. कॅमेरून यांनी यासाठी एक विशेष व्हर्च्युअल कॅमेरादेखील वापरला आहे. जो सेटवरील मोशन कॅप्चरमध्ये दिसणाऱ्या कलाकारांना समान अॅनिमेशन सेटमध्ये जसाच्या तसा दाखवतो.

  फ्युजन 3डी आणि स्विंग कॅमेरा

  या विशेष कॅमेरा रिंगमध्ये दोन सोनी एफ 90 कॅमेरे बसवले गेले होते. यातील एक कॅमेरा उभा तर दुसरा आडवा होता. दोन वेगवेगळ्या कॅमेर्‍यांच्या या संयोजनातून, माणसाच्या दोन्ही डोळ्यांच्या वेगवेगळ्या दृष्टीप्रमाणे फुटेज रेकॉर्ड करणं शक्य होतं. त्यामुळेच या विशेष कॅमेऱ्यानं घेतलेलं फुटेज अधिक वास्तव वाटतं. हीच बाब लाइव्ह अॅक्शनसह कॅमेरा मोशन कॅप्चर एकत्रित करण्यासाठीदेखील कार्य करते. अशा प्रकारे कॅरेक्टर्स आणि त्यांचं जग लेयर्समध्ये विकसित होतं जातं.

  कॅमेरून यांनी तयार केलेल्या तंत्रामुळे कॉम्प्युटर जनरेटेड सीनसह थेट अॅक्शन सीन दिग्दर्शित करण्यास मदत झाली. म्हणजे प्रत्यक्षात वावरणारा कलाकार, या कॅमेऱ्याच्या पडद्यामध्ये आभासी जगात वावरत असल्याचं कॅमेरून यांना दिसलं. परिणामी कलाकारानुसार ते त्यांचा कॅमेरा अॅडजस्ट करू शकले.

  संपूर्ण शूटमधील सर्वात मोठी गोम हीच होती. पारंपारिक कॉम्प्युटर-जनरेटेड इमेजरीमध्ये (सीजीआय), कलाकाराचं फुटेज हिरव्या स्क्रीनसमोर रेकॉर्ड केलं जातं आणि डिजिटली तयार केलेल्या जगात बसवलं जातं. मात्र, कॅमेरूनच्या तंत्रामध्ये कलाकाराच्या दृष्टीकोनातून तुम्हाला आभासी जग दिसतं. म्हणूनच अवतरामध्ये तुम्हाला इतर 3डी चित्रपटांपेक्षा अधिक वास्तविक अनुभव मिळत आहे.

  पाण्याखाली शूटिंग

  सीजीआयमधील पाण्याखालील बहुतेक दृश्यांमध्ये कलाकारांना हार्नेसद्वारे हवेत लटकवलं जातं. ते पाण्यात पोहत असल्यासारखे हवेत फिरतात. पण, प्रत्येक गोष्ट अतिशय अस्सल दिसली पाहिजे, असा जेम्स कॅमेरून यांचा आग्रह होता. म्हणून त्यांनी एक मोठी टाकी तयार करून घेतली आणि त्यात पाणी भरून शूटिंग केलं. या शूटिंगसाठी त्यांनी पुन्हा वेगळ्या प्रकारचा कॅमेरा वापरला. आत्तापर्यंत अंडरवॉटर शूट्समध्ये वापरण्यात येणारे कॅमेरे बॉक्ससारख्या रचनेत होते. म्हणजेच कॅमेरा लिंकच्या समोर आणखी एक काच असायची. पण, कॅमेरून यांच्या कॅमेऱ्यात फक्त एक सरळ लेन्स बाहेरच्या बाजूला होती. त्यामुळे सीनमधील आवाज कमी होण्यास मदत झाली.

  स्कुबा गिअरचा वापर नाही

  पाण्यात जाऊन शूटिंग करण्यासाठी सामान्यपणे कलाकारांना स्कुबा गिअर्सचा वापर करावा लागतो. जेव्हा स्कुबा गिअर्स वापरले जातात तेव्हा पाण्यात बुडबडे येतात. पण, कॅमेरून यांना दृश्यांमध्ये कोणताही गोंधळ किंवा आवाज नको होता. यावर उपाय म्हणून सर्व कलाकारांना श्वास रोखून पाण्यात उतरवलं गेलं. त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आलं. त्यानंतर त्यांनी पाण्यात श्वास रोखून धरून सीन शूट केले.

  केट विन्सलेटचा अनोखा विक्रम

  जगातील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या केट विन्सलेटनं अवतारच्या शूटिंगदरम्यान श्वास रोखून धरण्याचा विक्रम केला आहे. केटनं सात मिनिटं 14 सेकंद श्वास रोखून धरला. त्या पूर्वी हा विक्रम टॉम क्रूझच्या नावावर होता. 'मिशन इम्पॉसिबल - रोग नेशन' या चित्रपटासाठी त्यानं सहा मिनिटं श्वास रोखून धरला होता.

  अनोख्या समस्येवर नाविन्यपूर्ण उपाय

  पाण्याच्या टाकीमध्ये मोशन कॅप्चर करण्यात अडचण येत होती. पाण्याच्या पृष्ठभागावर प्रकाशाचं परावर्तन होत असल्यामुळे अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे कलाकारांच्या बॉडी सूटचे मार्कर चुकीच्या पद्धतीनं रेकॉर्ड होऊ लागले. कॅमेरून यांच्या टीमनं यावर अनोखा मार्ग शोधला. त्यांनी पाण्यावर प्लॅस्टिकचे पांढरे छोटे-छोटे गोळे पसरवले. त्यामुळे, प्रकाश पाण्याच्या आत जात होता पण प्रतिबिंब दिसेनासं झालं.

  13 वर्षांपूर्वी आलेला जेम्स कॅमेरून यांचा 'अवतार' हा चित्रपट आजपर्यंत जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटानं जवळपास तीन अब्ज डॉलर्सची कमाई केली होती. स्पेशल इफेक्ट्सचा विचार केला तर इतके प्रेक्षणीय चित्रपट प्रेक्षकांनी बघितले नव्हते. त्यामुळे 'अवतार'मध्ये कॅमेरून यांनी पडद्यावर निर्माण केलेलं पँडोराचं अद्भुत विश्व पाहून प्रेक्षक भारावून गेले होते. त्यामुळेच संपूर्ण जग या चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होतं.

  First published:

  Tags: Hollywood