मुंबई, 16 डिसेंबर : चित्रपट चाहत्यांसाठी हे वर्ष संपताना एका ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या सिक्वेलची मेजवानी आहे. सध्या ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या हॉलिवूड चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट भारतातल्या बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग करण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. पहिल्या दिवशी देशभरात चित्रपटाच्या तब्बल 20 कोटी रुपयांच्या तिकिटांचं अॅडव्हान्स बुकिंग झालं. यंदा हा आकडा ‘KGF Chapter 2’, ‘RRR’, ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा’ आणि ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टिवर्स ऑफ मॅडनेस’ या चार चित्रपटांनी ओलांडला आहे. या संदर्भातलं वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलं आहे. चित्रपटाने गुरुवारी (15 डिसेंबर) रात्रीपर्यंत संपूर्ण भारतभर अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 20 कोटींची कमाई केली. हा आकडा भारतातल्या या वर्षीच्या पहिल्या पाच अॅडव्हान्स बुकिंग कलेक्शनपैकी एक आहे. परंतु ‘KGF चॅप्टर 2’ ने तब्बल 80 कोटी कमावले होते, त्या तुलनेत खूप कमी आहे. ‘केजीएफ’ने भारतातल्या आतापर्यंतच्या सर्वाधिक अॅडव्हान्स बुकिंगची नोंद केली आहे. ‘अवतार 2’ चित्रपट 3D आणि IMAX स्क्रीनवर मोठ्या प्रमाणात रिलीज होणार आहे. काही शहरांमध्ये काही IMAX शोजसाठी तिकिटांच्या किमती 2500-3000 पर्यंत आहेत. विशेष म्हणजे यातल्या रविवारसह अनेक शोजच्या तिकिटांची विक्री झाली आहे. हेही वाचा - Avtar Box Office Day 1 collection : अवतार 2 रिलीज होण्याआधीच हिट; ओपनिंग डेला इतके करोड कमावण्याची शक्यता जेम्स कॅमेरॉनच्या या चित्रपटाने शुक्रवारी (16 डिसेंबर) भारतीय बॉक्स ऑफिसवर 40-50 कोटी रुपयांची कमाई करणं अपेक्षित आहे. खरं तर ही कोणत्याही हॉलिवूड चित्रपटासाठी एक मजबूत ओपनिंग आहे. किंबहुना, फार कमी भारतीय चित्रपटांनी या वर्षी हा आकडा गाठलाय. जागतिक स्तरावरही अवतार 2 चित्रपटाने त्याच्या सुरुवातीच्या वीकेंडमध्ये सुमारे 600 मिलियन डॉलर्स कमावण्याची अपेक्षा आहे. वीकेंडला आणखी विक्री वाढल्यास तो आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणार्या चित्रपटांपैकी एक ठरेल.
‘अवतार 2 ‘ला मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रिव्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या अॅडव्हान्स तिकीट बुकिंगसाठी मदत होत आहे. हा चित्रपट समीक्षकांइतकाच प्रेक्षकांनाही आवडेल, असं म्हटलं जातंय.
‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ हा 2009च्या ब्लॉकबस्टर ‘अवतार’चा सिक्वेल आहे. ‘अवतार’ हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. आता त्याचा दुसरा भाग त्या चित्रपटाने जगभरात केलेल्या जवळपास 3 बिलियन डॉलर्सच्या कमाईचा विक्रम मोडू शकेल की नाही, याची उत्सुकता लागली आहे.