मुंबई, 25 मे- हिंदी आणि साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय खलनायक म्हणून अभिनेते आशिष विद्यार्थी यांना ओळखलं जातं. या ज्येष्ठ अभिनेत्याने हिंदी,मराठी, तेलुगू, तामिळ, कन्नडा,इंग्लिश अशा जवळपास सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकतंच अभिनेत्याच्या खाजगी आयुष्याबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी लग्नगाठ बांधत सर्वानांच सुखद धक्का दिला आहे. विशेष म्हणजे वयाच्या साठीत असणाऱ्या आशिष यांनी विवाह करत सर्वांनाच चकित केलं आहे.
नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, आशिष विद्यार्थी यांनी लग्न करत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. रिपोर्ट्सनुसार, आशिष यांनी आसाममधील प्रसिद्ध फॅशन इंटरप्रिटर असणाऱ्या रुपाली बरुआ यांच्याशी लग्न करत सर्वांनां खुशखबर दिली आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी कोलकत्तामधील एका क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात लग्नगाठ बांधली आहे. आशिष आणि रुपाली यांनी आसामी पद्धतीने विवाह केला आहे. त्यांच्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत.
आशिष विद्यार्थी हे लोकप्रिय कत्थक डान्सर रेबा विद्यार्थी यांचे लेक आहेत. आशिष यांनी यापूर्वी राजोशी यांच्यासोबत लग्न केलं आहे. या लग्नामधून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. अभिनेत्याने अचानक दुसरं लग्न करत सर्वांनाच धक्का दिला आहे.
रुपालीसोबत लग्नाबाबत बोलताना आशिष विद्यार्थी यांनी म्हटलंय, ''आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न करणं ही एक विलक्षण भावना आहे. आम्ही कुटुंबाच्या उपस्थितीत सकाळी कोर्ट मॅरेज केलं. आणि संध्याकाळी एक छोटंसं गेट टुगेदरसुद्धा केलं''.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Life18, News18 Lokmat