मुंबई 30 एप्रिल: ‘अशी ही बनवाबनवी’ (Ashi Hi Banwa Banwi) हा मराठी सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. 1988 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट विनोदी डायलॉग्स आणि भन्नाट अभिनय यामुळं आज 33 वर्षानंतरही पोट धरून हसायला भाग पाडतो. खरं तर या चित्रपटातील ‘आमच्या शेजारी राहते. नवऱ्याने टाकलंय तिला…’, ‘सारखं सारखं एकाच झाडावर काय?’, ‘सत्तर रुपये वारले’ अशे अनेक संवाद आजही रसिकांच्या जीभेवर रेंगाळताना दिसतात. परंतु यामधील “धनंजय माने इथंच राहतात का?” (dhananjay mane ithech rahtat ka) या संवादानं खऱ्या अर्थानं कमाल केली. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या भन्नाट टाईमिंगनं हा डॉयलॉग अजरामर केला.
पण या डॉयलॉगच्या मागेही एक भन्नाट स्टोरी आहे. लेखकांना या चित्रपटातील धनंजयला आडनाव काय द्यावं हे सूचत नव्हतं. परंतु त्यावेळी अशी एक घटना घडली की त्यामुळं हा अजरामर डायलॉग सुचला. पाहा अभिनेता किरण माने यानं सांगितलेला हा भन्नाट किस्सा...
"खरंतर यापूर्वी या पात्रासाठी आडनावाची गरज जाणवली नाही... पण परशा जेव्हा दार ठोठावतो, तेव्हा त्यानं पूर्ण नांव घ्यायची गरज आहे." त्याला कुठलं आडनांव शोभेल? याचा सचिन पिळगांवकर - वसंत सबनीस वगैरे लोक व्ही. शांताराम यांच्या ऑफीसमध्ये विचार करत बसले होते... बरीच आडनांवं सुचत होती पण कुणाचं समाधान होत नव्हतं...
दादासाहेब फाळकेंनी इतक्या हजारांत तयार केला होता पहिला चित्रपट
एवढ्यात व्ही. शांताराम दाराकडे पाहून म्हणाले, "या या माने.. काय काम काढलंत?" व्ही. शांताराम यांचे सी.ए. किसन माने आले होते. त्यांना काही कागदपत्रांवर व्ही. शांताराम यांच्या सह्या हव्या होत्या. 'त्या' हाकेनं चर्चेच्या वेळी असं टायमिंग साधलं होतं की त्यांच्या सह्या होईस्तोवर सचिनजी आणि वसंत सबनीसांनी ठरवून टाकलं की त्या पात्राचं आडनाव 'माने' हेच असेल !!!
.. मिटींग संपता-संपता व्ही. शांताराम यांनी किसन मानेंना पुन्हा त्यांच्या केबिन मध्ये बोलावून घेतले आणि हसत-हसत विचारलं की "माने तुमचं आडनाव आमच्या सिनेमातल्या 'धनंजय' या पात्राला वापरायला तुमची काही हरकत नाही ना?" केबिनमध्ये हास्यकल्लोळ उसळला...
...आणि संपूर्ण मराठी मुलखात हास्यकल्लोळ उसळवणारा तो 'अजरामर' डायलॉग जन्माला आला -
"धनंजय माने इथेच रहातात का?"
किसन माने यांचे चिरंजीव विक्रम माने माझ्या फ्रेन्डलिस्टमध्ये आहेत... त्यांनी एक दिवस इनबाॅक्स मध्ये ठकठक केलं "किरण माने इथंच रहातात का?" ...आणि मला ही घटना सांगीतली. लै भारी वाटलं... म्हन्लं, मी हा किस्सा फेसबुकवरून दोस्तलोकांना सांगू का? तुमची काही हरकत नाही ना? नाही तर पुन्हा म्हणाल,
"हा शुद्ध हलकटपणा आहे माने !"
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Laxmikant berde, Marathi cinema