मुंबई, 21 नोव्हेंबर: अमृता फडणवीस (Amruta Fadnvis) यांच्या गाण्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतानाच आता दुसऱ्या वादाला तोंड फुटलं आहे. अमृता फडणवीस यांच्या गाण्यावरुन दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) आणि अभिनेता आरोह वेलणकर (Aroh Welankar) यांच्यात वाद रंगायला लागला आहे. अमृता फडणवीस यांच्या 'तिला जगू द्या' या गाण्यावर महेश टिळेकर यांनी फेसबुक पोस्ट करत भरभरुन टीका केली होती. आता त्यावर अभिनेता आरोह वेलणकरने उत्तर देत टिळेकरांवर टीकेची तोफ डागली आहे.
नक्की काय घडला प्रकार?
काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांचं 'तिला जगू द्या' हे गाणं प्रदर्शित झालं होतं. त्या गाण्यावरुन दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून टीका केली होती. त्या टीकेला आता अभिनेता आरोह वेलणकर याने उत्तर दिलं आहे. फेसबुकवरुन या दोघांमध्ये चांगलीच झुंपली आहे.
काय म्हणाला आरोह वेलणकर?
“महेश टिळेकर तुमची टीका ऐकून लाज वाटली. मराठी तारका नावाचा कार्यक्रम करता, स्त्री शक्ती, सन्मानाच्या गोष्टी करता आणि ही कसली भाषा तुमची? नसेल आवडत तर नका ऐकू, टीका करायची तर तमा बाळगून करा, कोण समजता तुम्ही स्वत:ला?
या आधी व्हाया व्हाया माझ्यावरही आणि इतर नटांवरही टीका केलीत. तेव्हा दुर्लक्ष केलं. तुम्ही तुमच्या पोस्ट काय विचार करुन, ओढून, पिऊन, समजून करता ते कळणं कठीण आहे. फुटेजसाठी करत असाल तर अधिकच हीन आहे तुमचं सगळं ! सुधारा
राहिला प्रश्न मराठी तारकांचा तर ह्या तुमच्या स्टंटमुळे कोण काम करतंय ते बघू” अशा तिखट शब्दात आरोह वेलगणकरने टिळेकरांवर टीका केली.
महेश टिळेकरांनी काय प्रत्युत्तर दिलं?
"बेसूर ,गाणारी स्वयंघोषित गायिका, जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश देतोय,तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथं, कोण माझ्याकडे कार्यक्रम करणार म्हणून तू धमकी देऊन मला सांगतोय. कलाकार तुझ्या दावणीला बांधले आहेत की त्यांचं पालकत्व घेतलं आहेस म्हणून तुझ्या सांगण्यावरून कलाकार ऐकणार?" अशा आशयाची भली मोठी पोस्ट महेश टिळेकरांनी लिहीली आहे. आता पुढे हा वाद अजून रंगणार की त्याला पूर्णविराम मिळणार हे लवकरच सिद्ध होईल.