अभिनेता अर्जुन कपूरनं सिने इंडस्ट्रीमध्ये जवळपास 10 वर्षांत स्वताःचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. भलेही त्याचे सर्वच सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करू शकले नसले त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात वेगळ स्थान निर्माण केलं आहे. अर्जुन आज 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्तानं जाणून घेऊयात अर्जुनबद्दलच्या काही माहित नसलेल्या गोष्टी…
बॉलिवूडमध्ये येण्याआधी अर्जुननं त्याच्या हेल्थवर विशेष मेहनत घेतली आहे. या क्षेत्रात येण्याआधी तो खूप लठ्ठ होता. त्यानं याच कारणासाठी शाळेत जाणंही सोडून दिलं होतं. त्यामुळे त्याचा स्वभाव खूप चिडचिडा बनला होता. तो नेहमी एकटा राहत असे. पण अभिनय क्षेत्रात येण्यासाठी बराच घाम गाळला आणि त्यानंतर इश्कजादे सिनेमातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
एका मुलाखतीत आपल्या लठ्ठपणाचा किस्सा शेअर करताना अर्जुननं सांगितलं की, त्याचे मित्र त्याला आजही फुबु म्हणून हाक मारतात. हे त्याचं निकनेम आहे आणि नाव त्याला कसं पडलं हे त्यानं यावेळी सांगितलं.
फुबु हे एक कपड्यांच्या अमेरिकन ब्रँडचं नाव आहे. जो मोठ्या साइझचे कपडे बनवतो. अर्जुन एवढा लठ्ठ झाला होता की, त्याला कोणतेच नॉर्मल कपडे घालता येत नव्हते. फुबु ब्रँड फुटबॉल जर्सी बनवतो आणि अर्जुन त्यावेळी त्या जर्सी वापरत असे. त्यामुळे त्याला फुबु हे नाव पडलं.
अर्जुनचे वडील बोनी कपूर यांनी जेव्हा मोना कपूर यांना सोडून स्वतः पेक्षा 7 वर्षांनी लहान असलेल्या श्रीदेवीशी लग्न केलं तेव्हा या सर्व प्रकारामुळे मोना कपूर आणि त्यांची दोन्ही मुलं अर्जुन आणि अंशुला यांना खूप संघर्ष करावा लागला होता. ज्यामुळे अर्जुनला डिप्रेशनचाही सामना करावा लागला होता.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती असते तशी अर्जुनलाही सिलिंग फॅनची भीती वाटते. हे ऐकायला थोडंसं गंमतीशीर वाटतं. पण अर्जुनच्या या भीतीमुळेच त्याच्या घरात एकही सिलिंग फॅन नाही.
अर्जुननं 2012मध्ये आलेल्या इश्कजादे सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ज्यात त्याच्यासोबत परिणीति चोप्रा दिसली होती. याशिवाय त्याच्या ‘2 स्टेट्स’, ‘गुंडे’, ‘की अँड का’ या सिनेमांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या अर्जुन ‘संदीप और पिंकी फरार’ आणि ‘पानिपत’ या सिनेमांचं शूटिंग करत आहे.