Love Story : ...आणि विवाहित अनुपम खेर यांना स्वप्नातली राजकुमारी अखेर सापडली!

Love Story : ...आणि विवाहित अनुपम खेर यांना स्वप्नातली राजकुमारी अखेर सापडली!

चित्रपटातील नायकाच्या मनात जशी आपल्या स्वप्नातल्या राजकुमारीची प्रतिमा असते, तशीच काहीशी एक प्रतिमा अनुपम यांच्या मनातही होती.

  • Share this:

मुंबई, 09 फेब्रुवारी : अनुपम खेर बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी अनुपम यांनी बॉलिवूड अक्षरशः गाजवलं. पण, फार कमी लोकं आहेत ज्यांना त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल माहीत आहे. चित्रपटातील नायकाच्या मनात जशी आपल्या स्वप्नातल्या राजकुमारीची प्रतिमा असते, तशीच काहीशी एक प्रतिमा अनुपम यांच्या मनातही होती. लांबसडक केस आणि मोहक हास्य असलेली एक मुलगी दिसताच जिच्या प्रेमात पडावं अशी स्वप्न ते पाहायचे. अनुपम यांच्या स्वप्नातली ती मुलगी किरण यांच्यामुळे सत्यात उतरली.

अनुपम यांनी 1979 मध्ये घरच्यांनी ठरवून दिलेल्या मुलीशी लग्न केलं. त्यानंतर 1980 मध्ये चंदीगढमध्ये त्यांची ओळख किरण खेर यांच्याशी झाली. ते दोघंही एका नाटकाच्या ग्रुपमध्ये होते. या काळात अनुपम आपल्या खासगी आयुष्यात कठीण परिस्थितीतून जात होते. यावेळी किरण यांच्या रुपात अनुपम यांना एक चांगली मैत्रीण भेटली. अनुपम आणि किरण नाटकासाठी अनेकदा एकत्रच प्रवास करायचे. यादरम्यान त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली आणि हीच मैत्री पुढे जाऊन प्रेमात बदलेल याची या दोघांनाही कल्पना नव्हती.

किरण खेर यांनी त्यांच्या आणि अनुपम यांच्या नात्याविषयी एका मुलाखतीमध्ये दिलखुलास गप्पा मारल्या. किरण एकदा कामानिमित्त मुंबईला आल्या होत्या. यावेळी त्यांची ओळख गौतम बेरी यांच्याशी झाली. काही दिवसांच्या ओळखीनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण काही दिवसांत हे नातं फार काळ टिकू शकणार नाही याची जाणीव त्यांना झाली.

एकीकडे अनुपम विवाहीत होते आणि त्यांच्या आयुष्यातही बऱ्याच समस्या होत्या. पण तरीही आम्ही खूप चांगले मित्र होतो. नादिरा बब्बर यांच्या नाटकासाठी कोलकाताला जात असताना ते मला खूप वेगळे वाटले. त्यांनी डोक्यावरचे सर्व केस काढले होते. कदाचित कुठल्यातरी चित्रपटातील त्यांचा हा लूक होता. आपल्या मेकअप रुममधून बाहेर पडताना त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत काहीतरी आहे हे मला जाणवलं. तो क्षण आम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी पुरेसा होता, अशी कबुली किरण यांनी एका मुलाखतीत दिली होती.

किरण म्हणाल्या, ‘काही वेळाने त्यांनी माझ्या रुमचा दरवाजा ठोठावला आणि म्हणाले मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला वाटतं मी तुझ्या प्रेमात पडलोय असं म्हणत अनुपम यांनी प्रेमाची कबुली दिली.’ त्यानंतर किरण आणि अनुपम यांनी आपापल्या पार्टनरशी घटस्फोट घेतला आणि 1985 मध्ये त्यांनी गुडगावमध्ये जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केलं.

First published: February 9, 2020, 7:45 AM IST

ताज्या बातम्या