अमृता खानविलकर ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयासोबतच ती आपल्या खासगी आयुष्यामुळं देखील चर्चेत असते.
ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून चर्चेत राहणाऱ्या अमृतानं यावेळी योग साधना करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंद्वारे तिनं आपल्या चाहत्यांना व्यायाम करण्यासाठी प्रेरणा दिली आहे.
फिट राहण्यासाठी अनेक कलाकार, सेलिब्रिटी वेगवेगळे फंडे वापरताना दिसतात. फिटनेस रुटीन त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो. चंदेरी दुनियेत चमकण्यासाठी आणि स्वत:चे व्यक्तिमत्त्व उजळवण्यासाठी जिम, व्यायाम, योगा यांना प्राधान्य दिलं जातं.
शरीर आणि मनाचं संतुलन हवं असेल तर व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यातही मनाच्या संतुलनासाठी योगसाधना केली तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावर होतो.
‘योग’ या शब्दाचा उगम ‘युज’ या धातूपासून झाला आहे. याचा अर्थ संयोग होणे असा होतो. भारतीय अध्यात्माच्या दृष्टीने ‘योग’ या शब्दाचा अर्थ ‘परमात्मा’ आणि ‘जीवात्मा’ यांचा एकत्र संयोग होणे, जीवात्माचे परमात्म्याशी मीलन होणे असा होतो.