मुंबई, 10 मार्च- नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित बच्चन स्टार ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट 4 मार्चला चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे. या चित्रपटात काम केलेल्या प्रत्येक कलाकाराचं कौतुक केलं जात आहे. दरम्यान अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एका अशा गोष्टीचा खुलासा केला आहे. ते ऐकून सर्वच थक्क झाले आहेत. नुकतंच अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ‘झुंड’ शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सर्वांसोबत शेअर केला आहे. हा किस्सा ऐकून सर्वच थक्क होत आहेत. स्वतः अमिताभ बच्चनसुद्धा त्यावेळी सुन्न झाले होते. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बिग बी यांनी हा किस्सा सांगितला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं, ‘या चित्रपटाचा एक इमोशनल सीन शूट केला जात होता. या सीनमध्ये सर्व मुलांच्या डोळ्यात अश्रू हवे होते. त्यावेळी एक मुलगा माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, ‘सर रडायचं कसं? त्याच्या या प्रश्नामध्ये एक वेगळंच दुःख होतं. त्याच्यात प्रचंड वेदना होत्या’. अमिताभ बच्चन पुढे म्हणाले, ‘त्या मुलाला रडणं म्हणजे काय याचादेखील विसर पडला होता. तो इतक्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये वाढला आहे, की आता त्या गोष्टींसाठी फक्त रडणं पुरेसं नाही. रडणं आता त्यांच्यासाठी फार लहान गोष्ट आहे. त्यांचं दुःख मांडण्यासाठी रडणं पुरेसं नाहीय. या सर्व विचारांनी मी आतून हादरून गेलो होतो’. आजही मला त्या मुलाचा हा प्रश्न जसाच्या तसा लक्षात असल्याचं बिग बी सांगतात. (हे वाचा: हृतिक रोशन सबा आझादसोबत बांधणार लग्नगाठ? जवळच्या मित्राचा मोठा खुलासा ) ‘झुंड’ हा चित्रपट एका सत्य कथेवर आधारित आहे. हा चित्रपट विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय बारसे यांनी स्लम सॉकरच्या माध्यमातून नागपूरमधील मुलांचं आयुष्य बदलून टाकलं आहे. त्यांना जगण्याची नवी उमेद दिली आहे. अमिताभ यांनी या चित्रपटात विजय बारसे यांची अर्थातच फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, सोमनाथ अवघडे, अरबाज शेख, तानाजी गालगुंडसोबत अनेक नवोदित मुले आहेत. नागराज मंजुळे यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. त्यांच्या या चित्रपटाची प्रचंड वाह-वाह होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.