मुंबई,12 एप्रिल- अमिताभ बच्चन यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच लोक त्यांच्या सिनेमांचे चाहते आहेत.अमिताभ बच्चन यांना मेगास्टार म्हटलं जातं. 70 च्या दशकापासून आजतागायत ते पडद्यावर कार्यरत आहेत. आजसुद्धा अमिताभ बच्चन दमदार भूमिका साकारत आहेत. या वयातसुद्धा त्यांचा फिटनेस तरुणांना लाजवेल असा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण अमिताभ यांना यशाच्या शिखरावर असलेलं पाहात आहे. परंतु एक वेळ अशी होती जेव्हा त्यांच्याकडे काम नव्हतं आणि इंडस्ट्रीतील अनेक कलाकार त्यांच्यासोबत काम करण्यास नकार देत होते. अमिताभ यांनी करिअरच्या एका टप्प्यावर अतिशय कठीण काळ पाहिला आहे. व्यावसायिकच नव्हे तर त्यांचं खाजगी आयुष्यसुद्धा अडचणीत सापडलं होतं. बिग बी बोफार्स घोटाळ्यात अडकले होते. त्यांच्यावर अनेक आरोप लागले होते.
त्यावेळी लोक त्यांना गुन्हेगार समजून त्यांच्यापासून अंतर ठेवायला लागले होते. अमिताभ यांचे चित्रपट विकत घेण्यास वितरकांनी नकार देण्यास सुरुवात केली होती. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक-निर्मात्यापासून अनेक कलाकारांनत्यांच्यासोबत काम करणं टाळलं होतं. परंतु या कठीण काळात एक व्यक्ती अशी होती ज्यांनी अमिताभ यांना कधीही एकटं पडू दिलं नाही. या व्यक्तीने अमिताभ यांची साथ तर सोडली नाहीच शिवाय वेळोवेळी त्यांनी लोकांना स्मरण करुन दिलं की, अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीचे सुपरस्टार आहेत. (हे वाचा: ‘जिहाल ए मिस्की मकुन बरंजिश’; 90 टक्के लोकांना आजही माहिती नाही लतादीदींच्या या गाण्याचा अर्थ ) जवळपास 33 वर्षांपूर्वी म्हणजेच 1990 मध्ये ‘आज का अर्जुन’ हा चित्रपट आला होता. हा चित्रपट एक क्राइम ड्रामा होता. यामधील ‘गोरी है कलाईयां, ‘पान की दुकांन पर’ ही गाणी तुफान लोकप्रिय ठरली होती. या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत जया प्रदा, राधिका, सुरेश ओबेरॉय, किरण कुमार, अमरीश पुरी, ऋषभ शुक्ला अशी स्टारकास्ट होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन केसी बोकाडिया यांनी केलं होतं. तर अमिताभ यांना कठीण काळात पाठिंबा देणारे इतर कुणी नसून दिग्दर्शक केसी बोकाडियाच होते. केसी बोकाडिया यांनी 1972 मध्ये ‘रिवाज’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर ‘आज का अर्जुन’ चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका होती.या चित्रपटाचं शूटिंग सुरु होणार होतं तत्पूर्वी अमिताभ यांचं नाव बोफोर्स घोटाळ्यात आलं होतं. त्या दिवसात जवळपास सगळेच अभिनेत्याला सोडून गेले होते. दिग्दर्शकांना त्याच्यासोबत चित्रपट करण्यात रस राहिला नव्हता तर अनेकांनी त्यांना गुन्हेगार म्हणून पाहण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान लोकांनी अमिताभ यांना विरोध करायला सुरुवात केली होती. लोकांनी त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याच्या धमक्या दयायला सुरुवात केली होती. इतकंच नव्हे तर सेटवर जाऊन सेटची तोडफोड करण्यापर्यंत प्रकरण पोहोचलं होतं. परंतु केसी बोकाडिया यांनी अमिताभ यांची साथ सोडली नाही. त्यांनी हा सिनेमा पूर्ण केला. हा सिनेमा चालणार नाही अमिताभ यांचं करिअर आता जवळपास संपलं आहे वाटत असताना, या सिनेमाने सगळ्यांनाच चकित करत बॉक्स ऑफिसवर लोकांची प्रशंसा मिळवली होती. अशा प्रकारे अमिताभ यांनी पुन्हा एकदा यशाची चव चाखली होती.