नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर: ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये (Kaun Banega Crorepati) सर्वसामान्यांबरोबर अनेक सेलेब्रिटींनाही गेम खेळण्याची संधी मिळते. आतापर्यंत अनेक सेलेब्रिटी यामध्ये सहभागी झाले आहेत. आता बॉलिवूडमधलं एक लोकप्रिय क्यूट कपल ‘कौन बनेगा करोडपती 13’च्या आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारचा (8 ऑक्टोबर) एपिसोड खास ठरणार आहे. केबीसीच्या आगामी एपिसोडमध्ये रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसूझा (Genelia D’Souza) हे लोकप्रिय कपल दिसणार आहे. शोचा एक प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ‘पत्नीची स्मरणशक्ती चांगली असली तर काय नुकसान होतं,’ याबद्दल सांगताना दिसत आहेत. सोनी टीव्हीच्या सोशल मीडिया अकाउंटवर निर्मात्यांनी त्या भागाचा प्रोमो शेअर केला आहे. ज्यात रितेश देशमुख आपल्या पत्नीसाठी एक डायलॉग मारताना दिसून येत आहे. हा येणारा भाग प्रेक्षकांसाठी प्रेम, आनंद, मनोरंजनाचा धमाका घेऊन येणार आहे. प्रोमोमध्ये रितेश अमिताभ बच्चनचा फेमस डायलॉग मारताना दिसत आहे. प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन या जोडप्याला शोच्या तयारीबद्दल विचारतात. याचं उत्तर देताना जेनेलिया म्हणते, ‘आम्ही तुमचा शो पाहतो आणि मला वाटतं, की माझं सामान्य ज्ञान चांगलं आहे.’ रितेश म्हणाला, की ‘माझी तयारी सोपी आहे. मी माझी लाइफलाइन म्हणजे माझ्या पत्नीला शोमध्ये माझ्याबरोबर आणलं आहे. तिची स्मरणशक्ती अद्भुत आहे. आजही जेनेलियाला ‘तुझे मेरी कसम’ या आमच्या पहिल्या चित्रपटाचे डिटेल्स माहीत आहेत. हा चित्रपट 20 वर्षांपूर्वी आला होता.’
यानंतर अमिताभ बच्चन म्हणाले, ‘तुम्ही म्हणालात, जेनेलियाची स्मरणशक्ती तीक्ष्ण आहे. याचे अनेक फायदे आहेत; पण तोटेदेखील आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला वाटतं तुमच्या पत्नीनं लक्षात ठेवायला नकोत.’ अमिताभ बच्चन यांच्या या मुद्द्याशी रितेश सहमत असल्याचं दिसतं. अमिताभ बच्चन सेटवर उपस्थित असलेल्या सर्व पुरुषांना विचारतात, की ते या गोष्टीशी सहमत आहेत का? याआधी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुखने ‘केबीसी’च्या मंचावर पत्नी जेनेलियाबद्दलचं प्रेम व्यक्त केलं होतं. रितेश गुडघ्यावर बसून अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय डायलॉग बोलला होता. त्या वेळी जेनेलिया लाजताना दिसली. ‘कौन बनेगा करोडपती’च्या प्रत्येक शुक्रवारच्या एपिसोडमध्ये सेलेब्रिटी सहभागी होतात. त्यामुळे शुक्रवारच्या एपिसोडला अधिक चांगली पसंती मिळते. येत्या एपिसोडमध्ये जेनेलिया आणि रितेशला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

)







