मुंबई, 03 जून: बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Amitabh And Jaya Bachchan) यांच्या आज लग्नाचा 48 वा (48th wedding anniversary) वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. 1971 साली हृषिकेश मुखर्जी यांच्या गुड्डी या सिनेमात दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम करण्यास सुरुवात केली. या सिनेमाचं शूटिंग दरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. 1972 च्या ‘एक नजर’ (Ek Nazar) या सिनेमाच्या सेटवर त्यांच्यामधलं प्रेम आणखीन वाढलेलं दिसलं. अखेर 3 जून 1973 रोजी अमिताभ आणि जया बच्चन यांनी लग्न केलं आणि ते लंडनला निघून गेले. आज अमिताभ आणि जया बच्चन आपल्या लग्नाचा 48 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत. या निमित्तानं बिग बींनी चाहत्यांसाठी त्यांच्या लग्नातला खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हा फोटो शेअर करताना बिग बींनी कॅप्शन दिलं की, “3 जून 1973 .. आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छाबद्दल सर्वांचे आभार” बिग बींनी हा फोटो शेअर केल्यानंतर बिपाशा बासू, सोनल चौहान, दिया मिर्झा, नेहा धुपिया यासारख्या सेलिब्रेटींनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. अमिताभ बच्चन बऱ्याचंदा जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. तसंच फोटो मागचा किस्सा ही चाहत्यांना सांगतात. जया बच्चन यांचा एप्रिलमध्ये वाढदिवस होता. त्यावेळीी त्यांनी त्यांचा एक जुना फोटो शेअर केला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी बिग बींनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 52 वर्ष पूर्ण केली.