मुंबई, 19 फेब्रुवारी : समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांनी बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांची जाहीर माफी मागितली आहे. आपण केलेल्या टीकेबद्दल ट्विटरवरून अमर सिंह यांनी माफी मागितली. खरंतर काल अमर सिंह यांच्या वडिलांचे श्राद्ध होते. त्यामुळे बच्चन यांनी अमर सिंह यांना मेसेज केला होता. तो वाचून अमर सिंह भावूक झाले आणि त्यांनी ट्वीट करत माफी मागितली. ‘मी सध्या जीवन आणि मृत्यूसाठी लढत आहे, तेव्हा मी अमिताभजी आणि त्यांच्या कुटुंबाची माफी मागतो.’ असं अमर सिंह यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहलं आहे. अमरसिंह यांनी ट्वीट करून म्हटले की, ‘आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे आणि आज मला अमिताभ बच्चनजींचा मेसेज मिळाला. माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर, जेव्हा आयुष्य आणि मृत्यूसाठी मी लढा देत आहे, तेव्हा अमिताभजी आणि कुटुंबाविरूद्ध केलेल्या टीकेबद्दल मला वाईट वाटतं. देव सर्वांना आशीर्वाद देओ. ’ खरंतर, अमिताभ बच्चन यांनी अमर सिंह यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना मेसेड पाठविला, त्यानंतर अमर सिंह यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. अमर सिंह सध्या मूत्रपिंडाच्या समस्येने ग्रस्त सिंगापूरमधील रूग्णालयात उपचार घेत आहे. अमिताभ आणि अमर सिंह यांच्यामध्ये जुना वाद आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी अनेक अमिताभ यांच्यावर टीका केली.
Today is my father’s death anniversary & I got a message for the same from @SrBachchan ji. At this stage of life when I am fighting a battle of life & death I regret for my over reaction against Amit ji & family. God bless them all.
— Amar Singh (@AmarSinghTweets) February 18, 2020
विशेष म्हणजे एकेकाळी अमर सिंह आणि अमिताभ बच्चन जवळचे मित्र होते. पण त्यांच्या नात्यात कटूपणा निर्माण झाला. हा वाद अशा पातळीवर गेला की अमर सिंह यांनी बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी जाहीरपणे भाष्य टीका केल्या. त्यांच्या कुटुंबियांवरही नाराजी दाखवली.
2017 मध्ये धक्कादायक खुलासा एकेकाळी बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचे जवळचे मित्र असलेल्या अमर सिंह यांनी अमिताभ आणि जया बच्चन यांच्याबद्दल धक्कादायक खुलासे केले होते. एका टीव्ही चॅनलच्या मुलाखती दरम्यान अमर सिंह म्हणाले होते, “जेव्हा मी अमिताभ बच्चन यांना भेटलो तेव्हा अमिताभ आणि जया वेगळे राहत होते. जनक आणि प्रतिक्षा अशा वेगळ्या बंगल्यात दोघेही स्वतंत्र राहत होते. देशातील प्रत्येक वादासाठी लोक मला जबाबदार धरत आहेत. पण जया आणि अमिताभ बच्चन यांच्यातील वादासाठी मी जबाबदार नाही. त्यावेळी समाजवादी पक्षात सुरू असलेल्या वादासाठी अमर सिंह यांना दोषी ठरविण्यात आले होते. आपल्यावरील आरोपांचे स्पष्टीकरण देताना अमर सिंह म्हणाले होते की, ‘समाजवादी पक्षाचा वाद असो, अंबानी असो की बच्चन कुटुंबातील प्रत्येक वादासाठी मीडिया मला जबाबदार धरत आहे.’