अभिनेता अक्षय कुमारचं मन जिंकणारं 'हे' आहे झोपडीत राहणारं श्रीमंत कुटुंब

अभिनेता अक्षय कुमारचं मन जिंकणारं 'हे' आहे झोपडीत राहणारं श्रीमंत कुटुंब

कायम पैशांची श्रीमंती अनुभवणाऱ्या बॉलिवूड स्टार अक्षय कुमारने ग्रामीण भागतल्या सामान्य कुटुंबाची मनाची श्रीमंती अनुभवली आणि तो भारावून गेला.

  • Share this:

चंद्रकांत फुंदे, पुणे 1 नोव्हेंबर : अभिनेता अक्षय कुमारने ट्विटरवर टाकलेला एक फोटो गुरूवारी चांगलाच व्हायरल झाला. झोपडीत राहणाऱ्या एका श्रीमंत कुटुंबाचा पाहुणचार मिळाल्याने अक्षय जाम खूश झाला होता. त्याची माहिती फोटोसह त्याने ट्विटरवर टाकली होती. अक्षयला पाहुणाचार करणाऱ्या त्या कुटुंबाची ओळख आता पटली असून त्यांच्या दिलदार वृत्तीचं सगळ्यांनीच कौतुक केलंय. त्याचं असं झालं की, अक्षय कुमार कुटुंबासह पवना डॅम परिसरात सुटीसाठी आला होता. सकाळी आपल्या नितारा या मुलीसोबत मॉर्निंग वॉकला जाताना मुलीला तहान लागल्याने तो एका झोपडीत गेला. तिथे त्या वृद्ध दाम्पत्याने त्याला जो पाहुणचार दिला त्याने तो भारावला.

पाणी मागण्यासाठी तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झोपडीत गेला. त्यावेळी त्याने घरातल्या वृद्ध आजी आणि आजोबांना प्यायला पाणी मागितलं. त्यांनी पाणी तर दिलंच पण त्याचबरोबर त्यांना गुळ आणि भाकरीही खायला दिली. अक्षय आणि त्याच्या मुलीचा पाहुणचार करणारं ते कुटुंब हे पवना डॅम परिसरातल्या शिंदेवाडीतलं ढमाले दाम्पत्य होतं.

त्यांनी अक्षय कुमार आणि त्याच्या मुलीला गुळ भाकरी दिल्यानंतरही त्यांना तो अभिनेता अक्षय कुमार आहे हे माहितच नव्हतं. शेवटी अक्षयनेच त्याची ओळख करून दिली आणि पाहता पाहता बातमी सर्व गावात पोहोचली. नंतर गावातले सर्वच लोक ढमाले आजोबांच्या झोपडीजवळ जमा झाले. अक्षयनेही सर्वांसोबत फोटो काढले आणि गावकऱ्यांना शुभेच्छा देत पुन्हा येण्याचं आश्वासन दिलं. या अनोख्या प्रेमाने अक्षय भारावून गेला.

या अनुभवाने मी भारावून गेलोय. मला आणि मुलीला आयुष्यभराचा अनुभव दिला आणि खूप शिकायलाही मिळालं असंही अक्षयकुमारने म्हटलं आहे. अक्षय कुमार हा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतीसाठी धावून जातो. कोल्हापूरमध्ये आलेला महापूर असो की बिहारमधला पूर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा प्रत्येक वेळी त्याने भरघोस आर्थिक मदत केलीय.

First Published: Nov 1, 2019 07:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading