मुंबई, 5 जुलै : मागच्या जवळपास 10 दिवसांपासून टीव्ही मालिकांचं शूटिंग सुरू झालं आहे. मात्र हे शूटिंग करताना मात्र कलाकार आणि टेक्निकल टीमला बरीच आव्हानं पेलावी लागत आहेत. अनेकांना पूर्वीसारखं सेटवर सहजपणे वावरता येत नाही आहे. सरकारच्या गाइडलाइन्स प्रमाणे काम करत असतानाही अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. याशिवाय मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घरातून बाहेर पडणाऱ्यांसाठी सरकारनं निर्बंध कडक केले आहेत त्यामुळे आता अनेक कलाकारांना रस्त्यात अडवलं जातं. अभिनेत्री जया ओझाला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी जवळपास 3 तास रस्त्यात थांबवून ठेवलं होतं. त्यानंतर तिला घरी परत पाठवण्यात आलं. तर दुसरीकडे सेटवर सर्वजण तिची वाट पाहत होते. मुंबईत कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनानं लोकांवर काही कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत निर्माते पोलिसांना अपील करत आहेत की, कलाकार आणि टेक्निशिअन्सना रोखून ठेऊ नका. शूटिंग सुरू होताच अभिनेत्री कोरोना पॉझिटीव्ह मालिकांचं शूटिंग काही दिवसांपूर्वीच सुरू झालं आहे आणि अशात तेलुगू मालिकेतील अभिनेत्री नव्या स्वामी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली. त्यामुळे आता हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतही भीतीचं वातावरण आहे. 1 जुलैला नव्या कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं. मागच्या आठवड्याभरापासून ती शूटिंग करत होती आणि या दरम्यान तिला थकवा आणि डोकेदुखीचा त्रास होत होता. पण तरीही ती काम करत राहिली. जेणेकरून प्रोड्युसरचं नुकसान होऊ नये.
अखेर तिला जास्तच त्रास होऊ लागल्यानंतर तिनं डॉक्टरांच्या सल्ल्यानं कोरोना टेस्ट केली ज्याचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. आपण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समजताच नव्याला रडू कोसळलं. मात्र तिला कोणाच्या संपर्कात आल्यानं कोरोना झाला हे मात्र अद्याप समजलेलं नाही. यानंतर तिनं मान्य केलं की, तिनं घाईघाईत सेटवर परतण्याचा निर्णय घेतला जो चुकीचा होता आणि आता तिच्यामुळे इतर कलाकार आणि टेक्निशिअन यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.