न्यूयॉर्क, 06 जानेवारी: इंग्रजी विनोदी टीव्ही मालिका पाहणाऱ्या आबालवृद्धांना मिस्टर बीन (Mr. Bean) हे नाव माहीत नाही असं होणारच नाही. अत्यंत सहज आणि प्रचंड बोलके हावभाव, चेहऱ्याच्या विचित्र मुद्रा आणि नि:शब्द अभिनय ही ताकद असलेल्या मिस्टर बीनने अनेक पिढ्यांना पोटधरून हसवलं आहे. अगदी गडाबडा लोळायला लावलं आहे. ही भूमिका इतकी वर्षं त्याच उमेदीने साकारणारे अभिनेते रोवान अॅटकिन्सन (Rowan Atkinson) यांचं संपूर्ण जगात कौतुक होत असतं. पण भूमिका साकारताना त्यांच्या मनात काय भावना असतात ? हे कुणाला माहीत नाही. जगाला हसवायचं असेल तर आपली दु:ख बाजूला ठेवावी लागतात असं सूत्र अनेक विनोदवीरांनी सांगितलं आहे.
रोवान यांनी मात्र एक अजब खुलासा केला आहे. डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘ माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी फक्त ब्लॅकलॅडरमधील भूमिकेचा आनंद लुटू शकलो. कारण त्यात लोकांना सतत हसत ठेवण्याचं ओझं डोक्यावर नसायचं. ब्लॅकलॅडर पुन्हा सुरू होणार नाही.’ ब्रिटिश टेलिव्हिजनवर 1990 ते 1995 दरम्यान मिस्टर बीन ही मालिका प्रसारित झाली होती आणि तो कार्यक्रम ब्रिटनमधील सर्वाधिक विनोदी टीव्ही कार्यक्रम ठरला. मिस्टर बीनवर अॅनिमेशन स्पिन-ऑफही तयार झालं आणि दोन मोठे चित्रपटही येऊन गेले तेही गाजले.
एक प्रौढ व्यक्ती बालिशपणे वागताना निर्माण होणारा विनोद मिस्टर बीनमध्ये होता त्यामुळे त्याला मिळालेल्या यशाचा मला फारसं कौतुक वाटलं नाही कारण ते मुळातच विनोदी होतं. मिस्टर बीनमधला विनोद हा बहुतांश दृश्य स्वरूपातला होता त्यात संवाद खूपत कमी होते. त्यामुळे जगभरातील प्रेक्षक बीनशी जोडले गेले.अॅटकिन्सन यांच्या मते दृश्य स्वरूपात यापेक्षा अधिक विनोद करण्याचा प्रयत्न केला तर अतिसंवेदनशील लोकांना तो पचला नसता त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असत्या.
मिस्टर बिन या जगविख्यात भूमिकेबद्दल अॅटकिन्सन म्हणाले,‘ती भूमिका करताना माझ्या मनावर खूप दडपण असायचं. सतत लोकांना हसत ठेवायचं ओझं मनावर असल्यामुळे लवकर मी थकून जायचो आणि कधी त्या भूमिकेतून बाहेर पडतोय याची वाट पाहत रहायचो.’
सोशल मीडियाच्या माध्यमातून उदयाला आलेल्या ‘कॅन्सल कल्चर’ बाबतही अॅटकिन्सन यांनी मत व्यक्त केलं. ते म्हणाले, ‘सोशल मीडियावर असलेल्या डिजिटल मॉबमध्ये सहिष्णुता दिसत नाही. इथं एकतर तुम्ही एखाद्या गोष्टीचा बाजूनी असू शकता किंवा विरोधात. त्या पलीकडे काही नसतंच असं मत हे करून घेतात. त्यामुळे सोशल मीडियात मतं मांडताना खूप सावध रहावं लागतं. कॅन्सल कल्चरमुळे भविष्यात कसं होईल याची भीती वाटते. तुम्ही जर या डिजिटल मॉबचे बळी ठरलात तर ते भयावह असू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.