मुंबई, 9 मे : ‘अंधाधुन’, ‘बधाई हो’, ‘विकी डोनर’ सारख्या हिट सिनेमांनंतर आयुष्यमान खुराना एका नव्या धाटणीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2017मध्ये आलेल्या त्याचा सुपरहिट सिनेमा ‘शुभ मंगल सावधान’चा सिक्वेल येणार असून आयुष्यमान खुराना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. नपुंसकतेवर (Erectile Dysfunction)आधारित असलेल्या ‘शुभ मंगल सावधान’ या कॉमेडी सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना यांनी केलं होतं. त्यानंतर आता याच सिनेमाचा पुढचा भाग येत असून याची कथा समलैंगिकतेवर आधारित आहे. ‘शुभ मंगल सावधान’मध्ये भूमि पेडणेकर आणि आयुष्यमान खुराना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्याचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या सिनेमात आयुष्यमान अभिनेत्री नाही तर अभिनेत्यासोबत रोमांस करताना दिसणार असल्याची चर्चा आहे. समीक्षक तरण आदर्श यांनी याविषयीची माहिती त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली. या सिक्वेलचं नावं ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ असं असून सिनेमाचं दिग्दर्शन हितेश कैवल्या करणार आहे. तर निर्मिती आनंद एल राय यांची असणार आहे.
IT'S OFFICIAL... Ayushmann Khurrana and producer Aanand L Rai reunite... After #ShubhMangalSaavdhan comes the second installment in the franchise: #ShubhMangalZyadaSaavdhan... Will be directed by Hitesh Kewalya... The new film will focus on homosexuality... Early 2020 release.
— taran adarsh (@taran_adarsh) May 9, 2019
‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ 2020 पर्यंत रिलीज होणार असून या सिनेमाची कथा समलैंगिकतेच्या मुद्द्यावर आधारित आहे. त्यामुळे यात आयुष्यमान सोबत एखादा अभिनेता दिसणार असल्याची शक्यता आहे. 2018 मध्ये आलेल्या ‘बधाई हो’ या सिनेमानं आयुष्यमानला चांगली लोकप्रियता मिळवून दिली. ‘विकी डोनर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा आयुष्यमान नेहमीच त्याच्या हटके भूमिकासाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याच्या या सिनेमातील भूमिकेविषय सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र आयुष्यमानकडून या सिनेमाबाबत कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.