मुंबई,14 मे- बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचा पती रोहनप्रीत सिंहसोबत चोरीची घटना घडल्याचं प्रकरण समोर आलं आहे. रिपोर्टनुसार, कुलू-मनालीला भेट देण्यासाठी आलेला रोहनप्रीत सिंह हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये थांबला होता. तेथून त्याची अॅपल वॉच, आयफोन आणि हिऱ्याची अंगठी चोरीला गेली आहे. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नेहा कक्करचा पती आणि गायक रोहनप्रीत सिंह चंदिगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावर मंडी शहराजवळील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये थांबला होता. त्याला झोप लागेपर्यंत त्याच्या हातातील घड्याळ, अॅपल आयफोन, हिऱ्याची अंगठी आणि इतर वस्तू त्याच्याजवळ होत्या. झोपताना त्याने या सर्व वस्तू जवळच ठेवलेल्या टेबलावर काढून ठेवल्या होत्या. पण सकाळी उठल्यानंतर टेबलावरुन या सर्व वस्तू गायब झाल्या होत्या. रोहनने आपल्या खोलीत बराच वेळ शोधाशोध केली परंतु त्याला कुठेच आपल्या वस्तू सापडल्या नाहीत. त्यामुळे त्याने हॉटेल मॅनेजमेंटला याबद्दल सांगितलं आणि लगेचच पोलिस तक्रारदेखील केली. पोलिसांनीसुद्धा गांभीर्य लक्षात घेत लगेचच तपासकार्य सुरु केलं.
मंडीच्या एसपी शालिनी अग्निहोत्री यांनी या संपूर्ण प्रकरणाला दुजोरा दिला आहे. या चोरीचा लवकरात लवकर थांगपत्ता लावण्यासाठी पोलीस हॉटेल कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच हॉटेलमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरेही तपासण्यात येत असून, त्यामुळे चोरीच्या घटनेचा छडा लवकर लावता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.परंतु अजूनपर्यंत नेहा कक्कर किंवा रोहनप्रीतकडून या घटनेबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाहीय.