महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत यांची लेखमालिका - भाग १
बालपणी 'ह' हत्तीतला शिकताना पुस्तकातील हत्तीचे चित्र डोळ्यासमोरून जात नव्हते, तेव्हा खूप मनापासून वाटे की आपलं आयुष्य हत्तीसारखं बलवान व्हावं आणि हत्तीचे बळ प्राप्त झाल्यावर किड्या - मुंग्यांनीही आपल्या खांद्यावर खेळावं तेव्हा या विचारांच्या स्वप्नात असतानाच घरातील कुणाचा तरी पाठीवर धपाटा बसायचा तसा लागोलाग हत्तीतला 'ह' गिरवावा लागायचा. मग डोळ्यातलं पाणी पुस्तकातल्या हत्तीवर टप-टप पडताना घरातल्या त्या वडीलधाऱ्या माणसांएवढाच राग यायचा हत्तीचाही...
तेव्हा आता
'हत्ती इलो...!'
'हत्ती इलो...!'
असा कुणाचाही आवाज आला कानी किंवा अशा प्रकारची बातमी वृत्तपत्रात वाचली की काळीज धस्स होत राहतं !
प्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या 'हत्ती इलो'ची बदलत्या सामाजिक राजकीय स्थित्यंतरावर रुपकात्मक पद्धतीने भाष्य करणाऱ्या कवितेची सध्या रत्नागिरी, सिंधुदुर्गातील सेना, भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
2014च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांचा पराभव करण्याची यशस्वी कामगिरी करणाऱ्या सेना -भाजपच्या कार्यकर्त्यांना गेल्या काही महिन्यांपासून 'दादा इलो...दादा इलो...' चा गजर ऐकू येऊ येत होता. आणि आता तर भाजपचे 'दादा' चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्रिपदाची राणे दादांना 'सार्वजनिकरित्या' ऑफर दिल्याने राणेंचा भाजपप्रवेशाचा मुहूर्त जवळ आल्याचे सिद्ध झाले आहे. नाही म्हणायला याआधीसुद्धा नारायण राणे आणि अमित शहा यांच्यातील 'गुप्तगू'च्या बातम्या 'कळतंय-समजतंय' च्या पडद्याआडून बरंच काही सांगत होत्या.
त्यातही महापालिका निवडणुकीच्या गदारोळात राणेंची अनुपस्थिती खूप काही सांगून गेली होती. नितेश राणेंच्या अटकेने मिळालेला सूचक इशारा जरी अस्वस्थ करणारा होता तरी राणे गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांच्या उद्योगविश्वातील मित्रांचे दरवाजे ते ठोठावत राहिले. त्यामुळे भाजपशी त्यांची प्रवेश चर्चा 'खुली' राहिली. त्यातून अमित शहांशी बोलणी सुरु झाली. तिनेक महिन्यांपूर्वी तर अहमदाबादेतील राणे-शहा भेटीला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. त्या 'गुप्त' या बैठकीला कुण्यातरी कुटनितीज्ञाने 'उघड' केली. परिणामी तिला माध्यमांच्या काकदृष्टीची 'नजर' लागली आणि राणे परिवाराच्या भाजप प्रवेशाला मोडता घातला गेला. राणेंचा आजवरचा पक्षांतराचा आणि पक्षश्रेष्ठींशी आक्रमकपणे वागण्याच्या पद्धतीचा 'धसका' घेतलेल्या काही भाजप नेत्यांनी भविष्यातील संकटाचा अंदाज घेऊन बातम्या 'लीक' केल्या . परिणामी भाजपच्या दिशेने निघालेली राणेंची सुसाट 'कोकण एक्स्प्रेस' पद्धतशीरपणे 'साईडिंग'ला लावली गेली.
गंमत म्हणजे त्यासाठी दिलेले कारण अगदीच भन्नाट होते, 'आम्हाला रेल्वेचे इंजिन, म्हणजे नारायण राणे हवेत, पण डब्बे म्हणजे माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे आणि अन्य 'वादग्रस्त' रेकॉर्ड असणारे राणे समर्थक नकोत.' या अटींमुळे 'राणे-शहा-फडणवीस' बैठक पुढे गेली नाही, अशा बातम्या देखील प्रसारमाध्यमांपर्यंत आणि तेथून लोकांपर्यंत पोहचल्या. पण तरीही भाजपात शिरण्याचा राणेंचा प्रयत्न काही थंडावला नाही. आपल्या स्वभावाच्या विरोधात जाऊन ते नरमाईने वागू लागले. नाही म्हणायला नितेश राणेंच्या अटकेने त्यांच्यातील 'पिता' जास्तच जागरूक झाला होता, कोकणातील एका कार्यक्रमात फडणवीस सरकारवर केलेली कडक टीका कशी अंगावर येऊ शकते याची जाणीव त्यांना झाली होती आणि त्या सगळ्यावर कडी म्हणजे काही उच्चपदस्थ मंडळींनी ज्यापद्धतीने 'अविघ्न बिल्डर्स' संदर्भातील आर्थिक उलाढालीच्या बातम्या पेरल्या होत्या त्यामुळे राणे परिवाराच्या समोर अनंत अडचणीचे पीक येणार हे निश्चित होते.
नारायण राणे यांचे परममित्र छगन भुजबळ यांच्यावर ज्या आर्थिक गैरव्यवहारांमुळे तुरुंगात जाण्याची वेळ आली होती. तशीच कारवाई राणे कुटुंबावर होऊ शकते असे संकेत राज्यशकट हाती असणाऱ्या नेतृत्वाकडून दिले जाणे, हा धोक्याचा इशारा होता. तो राणेंनी वेळीच ओळखला, त्यामुळे राणे परिवार हळूहळू सरकारविरोधी कारवाया, वक्तव्यांपासून दूर गेला, मराठा मोर्चामधील त्यांचा सक्रिय सहभाग कमी झाला. आणि मुंबईच्या मोर्चामध्ये तर नारायण राणे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने मोर्चेकरी मुलींशी बोलताना दिसले. एकूणच काय तर मुंबई मराठा मोर्चामध्ये ज्या पद्धतीने राणे परिवार 'नियोजन' करताना दिसत होते. त्यावरून त्यांच्या भाजप प्रवेशाचे 'प्रयोजन' स्पष्ट होत होते. पण राणेंच्या आजवरच्या पक्ष प्रवेशाच्या बातम्या पाहता त्यांचा निर्णय जोवर प्रत्यक्षात उतरत नाही तोवर खरा मानता येणार नाही.
भाजपचे 'मराठा' चेहरा म्हणून ओळखले जाणारे चंद्रकांत पाटील यांनी जरी राणेंच्या भाजप प्रवेशाचे सुतोवाच केले असले, स्वतः शरद पवार यांनी जरी राणेंना भाजप प्रवेशासाठी शुभेच्छा दिल्या असल्या तरी किंवा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी जरी राणेंना सत्तेशिवाय न जगू शकणारे म्हणून डिवचले असले तरी जोवर नारायण राणे स्वतः आपल्या पक्ष प्रवेशासाठी घोषणा करत नाहीत तोवर काही खरे नाही. याआधी 2013च्या दिवाळीत राणे परिवाराला भाजप प्रवेशाची सुवर्णसंधी मिळाली होती. निलेश राणेंना खासदारकी आणि केंद्रात राज्यमंत्रिपद, नितेश राणेंना आमदारकी आणि स्वतः राणेंना महत्त्वाचे खाते अशी आकर्षक 'ऑफर' आली होती, असे राणेंच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. देशात मोदीयुग येण्याआधीची ही गोष्ट आहे. राणेंनी ती ऑफर स्वीकारली असती तर कोकणातील राजकारणात भाजपची ताकद जशी वाढली असती तशीच राणे परिवाराची स्थितीही आजच्या तुलनेत कितीतरी मजबूत झाली असती.
लोकसभा निवडणुकीत झालेला निलेश राणे यांचा पराभव टाळता आला असता, आणि पुढे जिव्हारी लागलेले नारायण राणेंचे सलग दोन पराभव टाळता आले असते. पण राजकारणात जर-तरच्या भाषेला किंमत नसते. इथे फक्त हिंमत लागते, आल्या प्रसंगाशी दोन हात करण्याची किंवा थोडं झुकतं घेऊन हात मिळवणी करण्याची. ती तयारी राणे साहेब दाखवणार का यावरच पुढील राजकीय गणिते अवलंबून असतील....
{क्रमश :}
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Narayan rane, चंद्रकांत पाटील, नारायण राणे, भाजप, मुख्यमंत्री