आठवण गझलकार दुष्यंत कुमारांची...

आठवण गझलकार दुष्यंत कुमारांची...

महान गझलकार दुष्यंत कुमार यांची आज जयंती... यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांनी लिहिलेला हा विशेष ब्लॉग...

  • Share this:

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

तेजी से एक दर्द मन में जागा मैंने पी लिया,

छोटी सी एक खुशी अधरों में आई मैंने उसको फैला दिया,

मुझको संतोष हुआ और लगा

हर छोटे को बड़ा करना धर्म है...'

आपल्या आसपास पसरलेल्या दुःखाचे आत्मस्पर्शी चित्रण करताना अवचित हाती आलेल्या सुखाचा सगळीकडे सुकाळ करण्याची मनिषा मनी बाळगणारे सुप्रसिद्ध हिंदी कवी, गझलकार दुष्यंत कुमार यांची आज जयंती आहे. कवितेच्या खडतर साधनेस धर्म मानणारा आणि जगण्याच्या निरंतर प्रक्रियेला शुभंकर करणं हे आपलं जीवनध्येय आहे, असे आचरणातून सांगणारा हा कवी म्हणजे तुकारामाचा आधूनिक वारसदार.

मला हा हिंदी साहित्यातील लखलखता हिरा वाचायला, ऐकायला मिळाला तो माझ्या काही कवी मित्रांमुळे. चर्चगेटला, आमच्या विद्यापीठ वसतिगृहात दररोज कोणी तरी कवी किंवा लेखक येत असे. कवीवर्य श्रीधर तिळवे यांची पुस्तकांनी खच्चून भरलेली सहाव्या मजल्यावरील खोली हा तमाम साहित्यप्रेमींचा अड्डा होता. तिथे त्या साहित्य मैफिलीतच मला पहिल्यांदा दुष्यंत कुमार भेटले, आवडले आणि माझ्या नकळत ते माझे होवून गेले. मराठीतील संत तुकाराम ते केशवसूत, मर्ढेकर, ढसाळ, विंदा, कुसुमाग्रज, पु.शि. रेगे असे एकाहून एक सरस मराठी कवी वाचले. त्यांचे शब्द जमेल तसे वेचले पण हिदी दुष्यंत कुमार मात्र माझ्या मना जीवनाच्या कणाकणात भरून राहिला, कारण तो माझ्या भावना माझ्याच शब्दात मांडतो. एखादा शूर शिपाई अन्याय करणाऱ्या व्यवस्थेशी जसा जीवाच्या कराराने भांडतो, अगदी त्याच आवेशाने दुष्यंत कुमार लिहितात. कदाचित पत्रकार म्हणून काही काळ काम केलेलं असल्यामुळे ते वास्तवाशी थेट भिडायला अजिबात मागेपुढे पहात नाही. माझी त्यांच्याशी नाळ जुळायला पत्रकारितेचा नाद सुध्दा कारणीभूत असू शकतो. कारण त्यांच्या दोन ओळी सबंध अग्रलेखा एवढं स्पष्ट आणि परखड भाष्य करतात.

भूक नही तो सब्र कर रोटी नही तो क्या हुआ

आजकल दिल्ली में है, जेरे बहस ए मुद्दा

अशा शब्दात जेव्हा दुष्यंत कुमार जेव्हा बोलू लागतात तेव्हा प्रचलित व्यवस्थेचा भेसूर चेहरा लख्खपणे डोळ्यासमोर उभा राहतो. आणि त्यांच्या कवितेतून उडालेले अस्वस्थ पक्षी आपल्या डोक्यात घर करू लागतात. तसं पाहायला गेलं तर ते अल्पायुषी ठरले. 1975 मध्ये वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी मरण पावलेल्या दुष्यंत कुमारांच्या शब्दात एवढी ताकद आहे की त्यांच्या कविता काळालाही जुमानत नाहीत. अगदी आजही त्या समर्पक वाटतात जितक्या वेळ्या वाचल्या ऐकल्या तितक्या वेळ्या त्या जास्त भावतात आणि भिडतात.

इस शहरमें वो कोई बारात हो या वारदात

अब किसीभी बात पर खुलती नही है खिडकियाँ

या दोन ओळींमध्ये दुष्यंत कुमार शहरी समाज जीवनाची बंदिस्त बांधणी डोळ्यासमोर उभी करतात. खरंतर त्या ओळी लिहिल्या तेव्हा 50-60च्या दशकात औद्योगिकरण आणि नागरिकरणाला नुकतीच सुरूवात झाली होती. अफाट कष्टाने मिळालेल्या स्वातंत्र्याने लोकांच्या अपेक्षांची बेसुमार वाढ केलेली होती. 'आपले सरकार' जुलमी इंग्रजांपेक्षा जास्त चांगले जीवनमान देईल या आशेने सगळ्या बदलांकडे पाहत होते. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनाही देशाच्या झटपट विकासाची स्वप्ने पडत होती. ज्या देशात साधी सुई बनत नव्हती त्या देशाला सर्वार्थाने समर्थ बनवण्यासाठी पंडितजी आणि त्यांचे सारे सहकारी धडपडताना दिसत होते. त्याच काळात उत्तम शिक्षण देणाऱ्या आयआयटी, आयआयएम सारख्या संस्थांपासून, औद्योगिक विकासांपर्यंत. शेती सुधारणेपासून, भाक्रा नानगल सारख्या महात्वाकांक्षी सिंचन प्रकल्पांपर्यंत अनेक नवनवीन गोष्टी होत होत्या. त्या साऱ्या विकास मंथनातून बाहेर आलेलं "शहरीकरण" म्हणजे बदलत्या भारताची बदलती खुण होती. शहरीकरण म्हणजे समुद्र मंथनातून बाहेर आलेल्या अनेक गोष्टींपैकी लक्ष्मी (संपत्ती), पारिजात (बाह्यसौंदर्य), हलाहल (दुःख) आणि ऐरावत (सुस्ती आणि मस्ती) या सगळ्याचे अफलातून मिश्रण. आजचे किडलेले समाजमन किंवा बिघडलेले राजकीय वातावरण हे या औद्योगिकरणाचे दुष्परिणाम. दुष्यंत कुमारांना शहरीकरणाचे हे दु:ष्परिणाम खूप आधी समजले होते. म्हणून ते सहजपणे लिहून जातात.

अब किसी को भी नजर आती नही कोई दरार

घर की हर दिवार पर चिपके हैं इश्तहार

गाव आणि शहरी जगण्याचा अनुभव असल्यामुळे दुष्यंत कुमारांची कविता सगळ्या प्रकारच्या प्रतिकांना आपल्या अंगाखांद्यावर घेऊन वावरत असते. आजही मोर्चांसमोर भाषण करणारे, सभासंमेलनांमध्ये निवेदन करणारे सगळे वक्ते, मग ते कोणत्याही वयोगटातले असो, त्यांना दुष्यंत कुमारांच्या ओळी टाळ्या मिळवून देण्यासाठी मदत नक्कीच करतात.

'कैसे आकाश में सूराख हो नहीं सकता,

एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो...'

'सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,

मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए...'.

'मत कहो आकाश में कोहरा घना है,

यह किसी की व्यक्तिगत आलोचना है...'.

'एक गुडिया की कई कठपुतलियों में जान है,

आज शायर ये तमाशा देख कर हैरान है...'

'राम जाने किस जगह होंगे कबूतर

इस इमारत में कोई गुम्बद नहीं है...'

या आणि अशा अनेक काव्यंपक्ती आजही तरुणाईच्या मुखी आहेत. याला एकच कारण आहे. ते म्हणजे दुष्यंत कुमारांची शब्दनिष्ठा. जीवनातील सगळ्या चढउतारांचा सामना करताना हा एका श्रींमत घरात जन्मलेला मुलगा शब्दांच्या आणि जगण्याच्या प्रेमात पडतो आणि लौकिक सुखाकडे पाठ फिरवून आपल्याच शब्दविश्वात रमतो. मुख्य म्हणजे हे करताना अन्य कवींप्रमाणे कल्पनाविश्वात भरारी मारण्यापेक्षा आपल्या अवतीभवतीच्या लोकांच्या भावविश्वाला मायेच्या उबेने कवटाळतो आणि दमनकारी व्यवस्थेच्या विरोधात शब्दास्र घेऊन धावतो. दुष्यंत कुमारांच्या कवितेच्या या वैशिष्ठ्यामुळेच आजही ते आठवतात. एकाचवेळी तेजतर्रार वार करणारी त्यांची लेखणी जेव्हा मुलायम होते तेव्हा दुष्यंत कुमारांमधला प्रेम विव्हळ तरूण मनमोहून टाकतो. कारण त्यांच्यासारखे हे मऊसूत शब्द तेच लिहू शकतात.

मै जिसे उडता बिछाता हूँ.

ओ गझल आपको सुनाता हूँ

एक जंगल है तेरी आखोंमें

मै जहाँ राह भूल जाता हूँ

तु किसी रेलसी गुजरती है

मै किसी पूलसा थरथराता हूँ.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2017 09:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading