"या आत्महत्या नव्हेत, दुर्लक्षाचे बळी"

आपल्या समाजात कधी नैसर्गिक आपत्तीमुळे तर कधी शेतमालाला बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी आत्महत्या करतात. परीक्षेत अपयश आल्याने विद्यार्थी आत्महत्या करतात, कौटुंबिक तणावामुळे लेकी-सुना आत्महत्या करतात. हल्ली एकाकी पडलेले वडीलधारे लोकही आता आत्महत्या करून जीवन संपवताना दिसतात.

  • Share this:

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, IBNलोकमत

मानसिक तणाव आणि आत्महत्या या दोन गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. मानसिक तणावाखाली गेलेल्या व्यक्तीची अखेरची पायरी आत्महत्येच्या दिशेनेच जाते, दररोजचे वर्तमानपत्र उघडा किंवा वृत्तवाहिन्यांवरील बातम्या पहा, तुम्हाला आत्महत्येची एक तरी बातमी वाचायला, ऐकायला मिळेल. आपल्या समाजात कधी नैसर्गिक आपत्तीमुळे तर कधी शेतमालाला बाजारभाव न मिळाल्याने  शेतकरी आत्महत्या करतात. परीक्षेत अपयश आल्याने विद्यार्थी आत्महत्या करतात, कौटुंबिक तणावामुळे लेकी-सुना आत्महत्या करतात. हल्ली एकाकी पडलेले वडीलधारे लोकही आता आत्महत्या करून जीवन संपवताना दिसतात. आपल्याकडे ज्यांना वेडे म्हंटले जाते, ते अन्य कोणत्याही आजाराप्रमाणे मानसिक आजार असणारे लोक असतात, याविषयी शासनाला हळूहळू जाग येत आहे.

मनोरुग्णांनाही अन्य रोग्यांप्रमाणे जगण्याचा, उत्तम उपचारांचा घटनादत्त अधिकार आहे. त्याविषयी जागृती झाली पाहिजे. डॉ. भारत वाटवानी, स्मिता वाटवाणी, डॉ. हरीश  शेट्टी, डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ.राजेंद्र बर्वे असे मोजके डॉक्टर याविषयावर मोठ्या प्रमाणावर काम करताना दिसतात, संशोधन करताना दिसतात, पण त्याला व्यापक चळवळ बनविण्यासाठी लोकांची आणि शासनाची मानसिकता बदलण्यासाठी समाजाच्या सर्वस्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे.

कारण आजवर दूर असणारा हा जीवघेणा आजार, तुमच्या -आमच्या दारात पोहचलाय, डेंग्यू किंवा मलेरिया विरोधात आम्ही व्यापक मोहीम उठवतो. पोलिओ दूर करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होतात, मग या कोणत्याही आजारापेक्षा जास्त जीव घेणाऱ्या मनोविकारांविरोधात आम्ही गप्प का ? या मानसिक ताण-तणावातून होणाऱ्या आत्महत्या नव्हेत , तर ते आहेत सामाजिक दुर्लक्षाचे बळी. याला फक्त सरकारच नव्हे तर तुम्ही-आम्ही सारे जबाबदार आहोत.

२०१४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक तणावासंबंधी प्रसिद्ध  केलेल्या अहवालात, जगात दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्मत्या करून जीवन संपवते असे दिसले होते. त्याच्या जोडीला जगातील सर्वाधिक आत्महत्याग्रस्त देश म्हणजे भारत आहे, असेही स्पष्ट झाले होते. आणि अवघ्या सहा महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरोच्या ताज्या आकडेवारीतून एरवी सहकार, उद्योग, गुंतवणूक आदी क्षेत्रात पुढे असणारा महाराष्ट्र  शेतकरी आत्महत्यांचं आगार बनलाय हे भीषण वास्तव समोर आलं आहे.

देशातील २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये तब्बल ४२ टक्क्यांनी वाढ झाली असून यातील सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. लक्षणीय बाब म्हणजे विशेष म्हणजे बिहार, पश्चिम बंगाल, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, मिझोराम, नागालँड आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये दोन वर्षांत एकही शेतकरी आत्महत्या झालेली नाही. वास्तविक पाहता बिहार आणि पश्चिम बंगाल येथील शेती-शेतकऱ्यांची स्थिती फार काही चांगली नाही, तरीही तेथील लोक आत्महत्येचा मार्ग स्वीकारत नाहीत. एकवेळ ते आपले गाव सोडतात, पण धीर सोडत नाही. आपले शेतकरी आधी आर्थिक स्थैर्य गमावतात, मग धीर आणि त्यापाठोपाठ प्राण गमावून बसतात. ही वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे, संबंधितांना समजावून सांगितली पाहिजे.

अर्थात फक्त शेतकरी नव्हे तर शहरात चांगल्या नोकऱ्या करणारे , छान  जीवन जगणारे लोकही आता ताण-तणावाच्या काळ्याकुट्ट छायेत आपले जीवन काळवंडून घेत असतात. बऱ्याचदा, त्यांच्या या मानसिक आजारावर उपचार होण्याआधीच त्यांचे जीवन संपते. १५ दिवसांपूर्वी  उरण मधील मोनिका माळी या ३० वर्षीय इंजीनियर विवाहितेने आपल्या ३ वर्षाच्या विहान या मुलासह केलेल्या आत्महत्येने , हा ताण-तणावाचा मुद्दा पुनः चर्चेत आला होता.

आता पोलीस तपासानंतर आत्महत्येमागील कारणे पुढे आली आहेत, केवळ मुलाच्या आणि स्वतःच्या आजारपणाला कंटाळून उच्च विद्याविभूषित  मोनिकाने आपल्या मुलासह आत्महत्या केली, हे उघड झाले आहे. त्यावरून आपल्या समाजाचे मानसिक आरोग्य किती ढासळले आहे याची कल्पना येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालात भारतातील जवळपास  ५ कोटी ६७ लाख म्हणजे,  एकूण लोकसंख्येपैकी  ५ टक्के लोकांना  मानसिक तणावातून वैफ़ल्यग्रस्तता आलेली आहे. तर जवळपास ३ कोटी ८५ लाख लोक ताण-तणावाने उद्द्भवणाऱ्या विविध आजाराने ग्रासलेले आहेत हे सामाजिक वास्तव पुढे आले आहे.

मानसिक तणाव आणि आत्महत्या या दोन गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. मानसिक तणावाखाली गेलेल्या व्यक्तीची अखेरची पायरी आत्महत्येच्या दिशेनेच जाते, हे आजवर आमचे प्रशासन-शासन मानत नव्हते. मात्र गतवर्षी, जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक तणावासंबंधी विशेष प्रचार मोहीम हाती घेतल्यानंतर आमचे सरकार पण कामाला लागले. विशेषतः गतवर्षी संसदेत या अत्यंत महत्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या विषयावर चर्चा झाली.

आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा ठरवण्याची तरतूद वगळणारे "मानसिक आरोग्य विधेयक 2016" लोकसभेत मंजूर करण्यात आले. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना योग्य उपचार व सेवा पुरविण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. हे विधेयक राज्यसभेने ऑगस्ट २०१५ मध्ये संमत केले होते. हे विधेयक संमत झाल्याने भारतीय दंड संहितेतील कलम 309 अन्वये आत्महत्या हा गुन्हा ठरवण्याची तरतूद आता रद्दबातलझाली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीने प्रचंड मानसिक तणावाखाली असे कृत्य केल्याचे गृहीत धरण्यात यावे. त्या व्यक्तीवर भादंवि कलम 309 खाली गुन्हा दाखल करता येणार नाही आणि शिक्षा ठोठावता येणार नाही, अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे मानसिक आजार असलेल्या व्यक्तीचा संपत्तीवरील अधिकार जतन करण्याची आणि पुनर्स्थापित करण्याची तरतूदही मानसिक आरोग्य विधेयकात करण्यात आली आहे, असे आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले. या विधेयकावरील चर्चेत बोलताना नड्डा यांनी हे विधेयक रुग्णकेंद्रित असल्याचे सांगितले.

सरकारी किंवा शासकीय अनुदान असलेल्या मानसिक आरोग्य सेवा केंद्रांमधून मनोरुग्णांना योग्य उपचार मिळण्याचा हक्क देण्याची तरतूद या विधेयकात आहे. त्याचबरोबर बीपीएल कार्ड नसूनही निराधार आणि गरीब असलेल्या रुग्णांना मोफत उपचार मिळण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. या विधेकातील तरतुदीनुसार आत्महत्या करणे किंवा तसा प्रयत्न करणे आता यापुढे गुन्हा ठरणार नाही. प्रचंड तणावाखाली आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या रुग्णांवर मोफत उपचार करणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे, हे सरकारचे कर्तव्य असल्याचे या विधेयकात म्हटले आहे. परंतु अजूनही मानसिक आरोग्य या विषयावर समाजात मोकळेपणी बोलले जात नाही. त्याच्या मागील कारणांची सखोल चिकित्सा करण्यासाठी   हा आजार अन्य कोणत्याही आजाराप्रमाणेच आहे, हे ठाऊक असणारे डॉक्टर्स किंवा समुपदेशक यांची रुग्णांच्या तुलनेत असणारी अत्यल्प संख्या हे सुद्धा चिंताजनक आहे.

बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीने ताण -तणाव वाढतो, मनोरुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. या विषयावर आता बोलले पाहिजे, त्यावरील उपाय त्वरित योजले पाहिजेत. अन्यथा निव्वळ आजाराच्या भीतीने , तणावाने  उच्च विद्याविभूषित  मोनिकाने आपल्या मुलासह जशी आत्महत्या केली किंवा आई सोबत झालेल्या वादातून वैफल्यग्रस्त झालेल्या मुलाने आईचीच हत्या केली. अशा मनाला चटका लावणाऱ्या  घटना घडताच राहतील आणि निर्ढावलेला समाज निव्वळ बघ्याची भूमिका घेईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2017 08:36 PM IST

ताज्या बातम्या