मराठी बातम्या /बातम्या /संपादकीय... /

"अवघे गर्जे पंढरपूर"

"अवघे गर्जे पंढरपूर"

मुंबई-पुण्यात अंमली पदार्थ घेणाऱ्या लोकांवर कडक कारवाई होते, पण दिंडयांमध्ये अफू-गांजा घेणाऱ्या लोकांच्या टोळ्या आपले वेगळे अस्तित्व घेऊन फिरताना दिसतात. त्यांच्या रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या एकतारीवरील भजनांनी दिंडीच्या तळांवरील रात्रीसुद्धा जाग्या असतात, हे मी जवळजवळ दरदिवशी अनुभवलंय.

मुंबई-पुण्यात अंमली पदार्थ घेणाऱ्या लोकांवर कडक कारवाई होते, पण दिंडयांमध्ये अफू-गांजा घेणाऱ्या लोकांच्या टोळ्या आपले वेगळे अस्तित्व घेऊन फिरताना दिसतात. त्यांच्या रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या एकतारीवरील भजनांनी दिंडीच्या तळांवरील रात्रीसुद्धा जाग्या असतात, हे मी जवळजवळ दरदिवशी अनुभवलंय.

मुंबई-पुण्यात अंमली पदार्थ घेणाऱ्या लोकांवर कडक कारवाई होते, पण दिंडयांमध्ये अफू-गांजा घेणाऱ्या लोकांच्या टोळ्या आपले वेगळे अस्तित्व घेऊन फिरताना दिसतात. त्यांच्या रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या एकतारीवरील भजनांनी दिंडीच्या तळांवरील रात्रीसुद्धा जाग्या असतात, हे मी जवळजवळ दरदिवशी अनुभवलंय.

पुढे वाचा ...

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक,IBNलोकमत

पंढरपूरची वारी, हा महाराष्ट्राचा लोकधर्म आहे, तर पंढरपूरचा पांडुरंग हा तमाम वैष्णवांचा प्राणविसावा आहे. आषाढी-कार्तिकी एकादशी म्हणजे आमचे लोकउत्सव आणि "ग्यानबा-तुकाराम" हा मराठी मनाचा मूलमंत्र. निवृत्तिप्रवण  वारकऱ्यांच्या भगव्या पताकेने अनेक शतके मऱ्हाटी धारकर्यांना लढायला बळ दिले होते.  संत  नामदेवाने दिलेला नामसंकीर्तनाचा, ज्ञानोबाने दिलेला ज्ञानवर्धनाचा आणि तुकोबाने दिलेला जीवन दर्शनाचा मार्ग पत्करून वारकरी संप्रदायाने गेली आठशे वर्षे महाराष्ट्र भूमीवर आनंदाची पेरणी - लावणी केली. वारकरी संतांनी लोकसाहित्याच्या साह्याने, लोककलांच्या माध्यमातून शक्ती, ज्ञान आणि भक्ती प्रवाहाच्या या त्रिवेणी संगमावर वैभव, त्याग आणि संयमाचे मराठमोळे जीवनउद्यान फुलविले. त्यामुळेच परकीय आक्रमणात आणि  नैसर्गिक संकटात सुद्धा मराठी समाज तुटला-फुटला नाही, त्याउलट तो प्रत्येकवेळी पेटून उठला.

छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुले, महात्मा गांधी यांच्यापर्यंत जितक्या लोकांनी या जीवनलक्षी प्रयागतीर्थाचे पाणी चाखले, त्या सगळ्यांनी देश-समाज प्रगतीपथावर नेला, हे वास्तव आहे. म्हणूनच आजही उपयुक्त असणाऱ्या या वारकरी तत्वज्ञानाची ओळख नव्या पिढीला नव्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. जसे ज्ञानोबा माउलींनी संस्कृत मधील कठीण धर्मज्ञान प्राकृत-मराठमोळ्या भाषेत सहजपणे मांडले, अगदी तशाच पद्धतीने आम्ही आमच्या तरुणाईला हा सांस्कृतिक संचिताचा ठेवा साध्या-सोप्या पद्धतीने सोपवण्याची गरज आहे. पण त्यासाठी होणारे प्रयत्न फारच मर्यादित आहेत. आळंदीमध्ये जोग महाराजांनी विसाव्या शतकाच्या आरंभी जशी रोखठोक भूमिका घेतली आणि वेदान्ताच्या जंजाळात गुंतत चाललेला वारकरी पंथ लोकसन्मुख केला, तसा पुढाकार कोणीतरी घेणे जरुरीचे आहे.

संतवाङ्मय नव्या पिढीला समजेल अशा सोप्या  मराठीत मांडणे जेव्हढे गरजेचे आहे , तेव्हडेच ते अन्य प्रांतीयांसाठी हिंदी-इंग्रजी मधून जोरकसपणे पुढे आले पाहिजे.  मराठी समाजात इंग्रजी भाषेत शिकणाऱ्या मुलांचे प्रमाण रोजच वाढत आहे, त्यांचा सध्याच्या काळात या दृष्टीने कोणीच विचार करताना दिसत नाही. त्यांना, या नव्या पिढीतील मुलांना जर आम्ही वारकरी संप्रदायांने आजवर दिलेल्या योगदानाची  माहिती दिली तर त्यांना या तत्वज्ञानाबद्दल जाणून घ्यावेसे वाटेल, अन्यथा ते या सांस्कृतिक वारशाशी जोडले जाणार नाहीत. एक प्रदीर्घ लोकपरंपरा खंडित होण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्याआधी आपण  सार्यांनी सावध व्हावे.

गेल्या आठशे वर्षांचा इतिहास जर आपण पहिला तर लक्षात येते की, सर्व प्रकारच्या अस्मानी-सुलतानी संकटाना तोंड देताना वारकरी संतांनी मराठी समाज सतत जागृत ठेवला. अध्यात्मिक जागृतीचा गजर करीत असताना सामाजिक, वैचारिक आणि राजकीय जागृतीदेखील संतांनी केली.

 लेकुराचे हित । वाहे माऊलीचें चित्त ।। ऐसी कळवळ्याची जाती ।  करी लाभाविण प्रीति ।। पोटी भार वाहे । त्याचें सर्वस्‍वही साहे ।। तुका म्हणे माझें । तुम्हा संतावरी ओझे ।। या शब्दांमधून संतांना

समाजाविषयी वाटणारा कळवळा आईप्रमाणे कोणत्याही अपेक्षेशिवाय आहे असे तुकाराम महाराज सांगतात. ते पुढे असेही म्हणतात की, "बुडती हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणोनिया" असे संतांचे प्रेम अलौकिक असते.

महाराष्ट्राने या प्रेमाची परंपरा पहिली, अनुभवली, म्हणूनच ज्ञानदेवांना माउली म्हटले जाते. गेल्या आठ शतकात विविध संत माउलींच्या प्रेमळ, आश्वासक शब्दांनी उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी या भेदांनी विखुरलेल्या मराठी लोकांना भागवत धर्माच्या झेंडय़ाखाली एकत्र आणले. विशेष म्हणजे ज्ञानदेव-नामदेवांच्या नेतृत्वाखाली अठरापगड जातीत विभागलेला समाज प्रबोधन पर्वाच्या वारीत सामील होण्याच्या काळातच धर्म आणि राज्यसत्तेतील अधिकारी मंडळी अंधश्रद्धा, जाचक प्रथा-परंपरांचे जोखड मजबूत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र संतांनी ते जोखड सर्वशक्तीनिशी तोडून टाकले. तेराव्या शतकातील  देवगिरीचा शक्तिवान राजा रामदेवरायाचा महाकर्णाधिप म्हणजे अर्थमंत्री असणा-या हेमाद्री पंडिताने चार्तुवण्र्य चिंतामणी हा सर्व जातींना कर्मकांडाच्या बंधनात अडकविणारा ग्रंथ त्याच काळात लिहिला होता. याच हेमाडपंताने अमानवी जातीभेद ,जाचक रूढी-परंपरा नाकारणाऱ्या 'महानुभाव संप्रदाय' वाढू नये यासाठी खूप आततायी प्रयत्न केले होते.

अशा सनातनी राजवटीत अंधश्रद्धांच्या अनाचाराने आणि तंत्रमार्गाच्या वामाचाराने सर्वत्र थैमान घातले होते; त्यामुळे समाजाच्या सर्व थरातील लोक मूळ धर्मापासून, माणुसकी आणि सद्वर्तनापासून दूर गेले होते. त्यांना प्रेम-शांती-बंधुभाव आणि सद्भावाचे शिक्षण देण्याचे काम नामदेवरायांच्या पुढाकाराने सुरू झाले होते. ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृतच्या अगम्य शब्दांमध्ये दडलेला धर्माचा अर्थ सर्वसामान्य लोकांना त्यांच्या भाषेत ऐकविण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्या काळात धर्मज्ञान फक्त संस्कृतमध्येच सांगण्याचा दंडक होता, पण आपल्या अमृताशी पैजा जिंकणा-या मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या ज्ञानोबारायांनी मोठ्या प्रेमाने धर्म संकीर्तनाची परंपरा सुरू केली.

या प्रबोधनकारक धर्मकार्याचा ''ज्ञानदेवे रचिला पाया.. तुका झालासे कळस'' असे म्हटले जाते. कारण तत्कालीन समाजस्थितीला अनुकूल होईल, असे बदल घडविताना ज्ञानेश्वरांनी सर्वसमावेशक वृत्ती धारण केली होती. नामदेव महाराजांनी आपल्या जोडीला चोखामेळा, सावता माळी, जनाबाई, गोरा कुंभारादी दुर्लक्षित समाजघटकातील लोकांना लिहिते केले; त्यामुळे बहुजन समाजाला आत्मभानासोबत जगण्याची दिशा सापडत गेली. वारकऱ्यांचे जीवनलक्षी तत्त्वज्ञान सहज सोपे करून सांगताना ज्ञानेश्वरांनी सगळे कर्मकांड नाकारले होते. "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या" , सहज मार्ग दाखवताना ते आम लोकांना,  "हरी मुखे म्हणा, हरि मुखें म्हणा, पुण्याची गणना कोण करी " असा विश्वासही देतात. सहयज्ञा : प्रजा : सृष्टा : या श्लोकाचे निरूपण करताना ज्ञानोबा माऊली म्हणतात, तुम्ही स्वधर्माचे आचरण करा, तुमच्या साऱ्या इच्छा पूर्ण होतील, त्यासाठी वेगळी व्रत-वैकल्ये करायची गरज नाही.  तप करून शरीराला पीडा देणेही नको. कामनायुक्त आराधना नवस-सिद्धी साधनांच्या मागेही जाऊ नका. इतर देवतांची उपासना सोडा आणि स्वधर्माचे पालन करा, की पुरे. ज्ञानोबारायांचा हाच विचार अगदी सोपा करून सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,

नाम संकीर्तन साध पै सोपे। जळतिल पापे जन्मांतरिची ॥ १॥

नलगे सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥ २॥

ठायीच बैसोनी करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा॥ ३॥

रामकृष्ण हरी विठ्ठला केशवा। मंत्र हा जपावा सर्व काळ ॥ ४ ॥

याविण आणिक्क नाही पै साधन । वाहतसे आण विठोबाची ॥ ५॥

तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनि । शाहाणा तो धणी घेतो येथे ॥ ६॥.

एकूणच काय तर सर्वच वारकरी संतांनी बहकलेल्या माणसांची आणि अस्वस्थ समाजाची मानसिक आणि वैचारिक चौकट एकसंध राहावी यासाठी शांततामय मार्गाने क्रांती घडवली. तिचा आजवर महाराष्ट्राला फायदा झाला, पण तो यापुढे होईलच, असे सांगता येत नाही. याचे पहिले कारण म्हणजे बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले या न्यायाने वारक-यांमध्ये कृतिनिष्ठ नेतृत्व मानण्याची पद्धत आहे, तेथे आज निर्नायकी अवस्थेमुळे वैचारिक गोंधळ माजलेला दिसतोय; त्यामुळे राज्य सरकारने पुढे आणलेल्या अंधश्रद्धा विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी जसे काही वारकरी पुढे येताना दिसतात, तद्वत विठ्ठलाचा गाभारा सोन्याचा करावा, यासाठीही काही स्वयंघोषित प्रवक्ते तावातावाने बोलताना दिसतात.

स्वत:ची शेती, छोटे-मोठे व्यवसाय आणि घर-प्रपंच सांभाळून परमार्थाची वारी करणा-या वारकऱ्यांना या वाद-विवादामागील हेतूच ठाऊक नसतात; परंतु त्यांचे पुढारपण करणाऱ्या शास्त्री-बुवा-महाराजांचा थाट मात्र आम्हीच वारकऱ्यांचे प्रतिनिधी आहोत, असा असतो. त्यामुळे बनेल कर्मठ  संघटनांना अशा एखाद्या वारकरी बुवाला हाताशी घेऊन तमाम वारकरी आमच्या बाजूने आहेत, असा आभास निर्माण करणे सोपे जाते. ज्ञानोबा-तुकोबांनी ज्या अंधश्रद्धांचा परखड शब्दांत समाचार घेतला होता, त्या संताचाच वारसा सांगणारे काही लोक जेव्हा अंधश्रद्धेला कायदेशीर आळा घालणाऱ्या प्रक्रियेस आजही  विरोध करतात, त्या वेळी आश्चर्य वाटते. तेराव्या शतकात गोंधळलेल्या समाजाला ज्ञानेश्वर महाराज अंधश्रद्धा कशी अयोग्य आहे  हे परखडपणे सांगतात, "मंत्रेंची वैरी मरे ,मग का बांधावी कटारे", मंत्र-तंत्राने जर माणूस मरत असेल तर कमरेला कट्यार का खोवून ठेवावी , हा 'प्रॅक्टिकल' प्रश्न विचारून माऊली लोकांना डोळस होण्याचा सल्ला देतात.

जगतगुरु तुकोबांनी सेंदरी हें देवी दैवते। कोण ती पुजी भुतेंखेतें। अशा शब्दांत अंधश्रद्धांचा समाचार घेतला होता. डोई वाढवूनि केश। भुते आणिती अंगास। तरी ते नव्हति संतजन असे सांगून त्यांनी भोळ्या-भाबडया लोकांना सावध केले होते. या ढोंगी, अधर्मी लोकांचा बुरखा फाडताना तुकोबांचे शब्द वज्रासारखे कठोर होतात. तुका म्हणे मैंद। नाही त्यापासी गोविंद मईंद म्हणजे ढोंगी-परमार्थाचे सोंग घेऊन लोकांना फसवणारे जोगी. त्याच्या लांब लांब जटा, शिष्यांची बैठक, चमत्काराच्या अफवा हा सारा देवाला बाजारात विकण्याचा प्रकार. तुकोबा या सगळ्याचा निषेध करणारे; परंतु त्याच पाऊलवाटेवर जाणा-या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला जेव्हा वारकऱ्यांच्या  स्वयंघोषित प्रवक्त्यांचा विरोध दिसतो, तेंव्हा हसावे की रडावे असा प्रश्न पडतो.

केवळ अंधश्रद्धा-जादूटोणा विरोधी चळवळीला काही वारक-यांचा विरोध हेच वारकरी संप्रदायाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उमटविणारे एक कारण नाही. या संतांच्या विचार वारशावर उभ्या असलेल्या इमारतीला खिळखिळे करणाऱ्या इतर कारणांचीही आपण वेळीच  चिकित्सा केली पाहिजे. अवघे वारकरी तत्त्वज्ञान दयेवर, करुणेवर आणि प्रेमावर आधारलेले आहे. त्यात वर्तनातील साधेपणा, आचरणातील सच्चेपणाला महत्त्व आहे. मठ-मंदिरांच्या स्थापनेचा, स्वत:चे स्तोम माजविण्याचा वारकरी संप्रदायात निषेध केला जातो, पण आज संतांनी त्यांच्या आचरणातून शिकविलेल्या या सगळ्या गोष्टींच्या अगदी उलट व्यवहार सुरू असलेला दिसतोय.

साधुसंतांच्या नावाने नित्यनवी संस्थाने उभी राहत आहेत. पूर्वी राजांची, नवाबांची संस्थाने असत, आता " बुवांची " महाराजांची संस्थाने पाहायला मिळतात. कीर्तनात काही न मागे कोणासी। तोचि आवडे देवासी। हा तुकोबांचा अभंग घेणारे महाराज कुणा तरी भक्ताची गाडी घेऊन आलेले पाहायला मिळतात. तीच गोष्ट बिदागीची. एकीकडे श्रोत्यांना भक्त ऐसे जाणा जे देही उदास। गेले आशापाश निवासनी। म्हणणाऱ्या कीर्तनकार वा प्रवचनकारांना संसारी लोकांपेक्षा जास्त आशा असतात, मग या अशा लोकांकडून मिळणा-या उपदेशाचा लोकांवर काय परिणाम होणार?

मध्यंतरी एका कीर्तनास जाण्याचा योग आला. बुवांचे नाव मोठे प्रसिद्ध असल्यामुळे बरीच गर्दी जमली होती. कीर्तनाच्या अर्धा तास आधी बुवा आले. हसतमुख चेहरा, कानात मोत्याची भिकबाळी, खांद्यावर करवत काठी उपरणे आणि हातात लक्षवेधी नक्षीदार सोटा, असे भारदस्त रूप. बुवांची हातातील सोटा जमिनीवर टेकविण्याची पद्धत अगदीच स्टायलिश, त्यावरून तो सोटा गरज म्हणून हाती घेतलेला नाही, हे स्पष्ट होत होते. बुवांचे तरुण वय पाहता, तो आधारासाठी कृत्रिमपणे वापरला जाणारा सोटा खटकत होता. म्हणून मी त्यांच्या जवळच्या शिष्याला त्याबद्दल विचारले. त्यावर तो उत्तरला, ते अमके महाराज कसे सोटा घेऊन कीर्तनाला उभे राहतात, म्हणून आमचे महाराजही सोटा वापरतात, मी म्हणालो, अहो, ते महाराज आता म्हातारे झालेत.. तो उत्तरला, मग काय झाले, आमचे महाराजही ज्ञानवृद्ध आहेत. त्यांच्या या बोलण्यावरून वारकरी संप्रदायातील कीर्तनकार-प्रवचनकारांच्यात होत असलेला बदल प्रकर्षाने जाणवला.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कीर्तन-प्रवचनाची बदललेली पद्धत. गेल्या काही वर्षापासून निरूपणात संस्कृत आणि इंग्रजीचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढतोय. ज्या संप्रदायाची स्थापनाच मुळी संस्कृतमधील ज्ञान मराठीतून देण्याच्या हेतूने ज्ञानदेव-नामदेवादी संतांनी केली होती, त्या मूळ हेतूला बाधा पोहोचवून स्वत:चे महत्त्व वाढवण्याचे काम अनेक नामवंत भरभक्कम बिदागी घेऊन करताना दिसतात, परवा एका महाराजांच्या व्हाॅट्सअँप ग्रुपवर संस्कृतमधील पसायदान वाचायला मिळाला, गम्मत वाटली, चिडसुद्धा आली.  ही झाली "सुसंस्कृत" महाराजांचं वागणं. तिकडे इंग्रजाळलेले बाबांची "स्टाईल" मोठी मजेदार.  थोडं फार इंग्रजी जाणणारे कीर्तनकार बाबा अगदी बाळबोध इंग्लिश उपमा-अलंकारांचा वापर करून आपण स्मार्ट बुवा आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. वरून हे सारे करताना ग्यानबा-तुकाराम हा गजरही करतात. सगळाच भोंदूपणा. गावखेड्यातील बायाबापड्याना "इंप्रेस" करण्यात ते काही प्रमाणात यशस्वी होतात, पण शिकलेल्या-शहरी लोकांसाठी त्यांचे हे वागणे हास्यास्पद ठरू शकते हे त्यांना कोण सांगणार?  ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेत, या खळांची व्यंकटी सांडो म्हणजे त्यांना आलेले हे वाकडेपण किंवा लागलेले वाईट वळण जावो एवढीच प्रार्थना आपण करू शकतो.

सगळ्याच वारकरी संतांनी लोकांना उपदेश करताना आपले हृदय मोकळे केले होते. अवघ्या भूतमात्रांविषयी त्यांच्या मनातील दया आणि करुणा त्यांच्या प्रेमळ वाणीतून प्रकट होत असे. त्यांचे अवघे जीवन प्रत्येक कर्म, मग ते चिंतन असो वा आत्मप्रकटीकरण सारे सारे जनहितासाठी असे. ज्ञानोबा माऊलींनी अनुभवामृत लिहिले. त्याचा शेवट करताना माऊली म्हणते, या अनुभवामृताच्या सेवनाने सगळ्या जगाने आनंदाचा सण साजरा करावा. किती उदात्त भाव आहे हा. प्रत्येक माणसाच्या जीवनातील अंध:कार विश्वसूर्याच्या प्रकाशाने दूर व्हावा, यासाठी स्वत: दु:ख भोगून संतांनी सुखाच्या राशी दीन, दुबळ्या बहुजनांच्या दारात ओतल्या. त्याच भावनेतून नामदेवराय आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा। माझिया सकळा हरीच्या दासा। असे मागणे मागतात. एरवी शब्दांची शस्त्रे करणारे तुकोबा भक्तांशी संवाद साधताना मेणाहून मऊ होताना दिसतात आणि विनवतात, सर्वभावे झालो वैष्णवांचा दास। करीन त्यांच्या आस उच्छिष्टाची। पण हल्लीचे वारकरी बुवा-महाराज ही सारी परंपरा विसरायला, खरे तर विसर्जित करायला निघालेले दिसतात. त्यांचे विचार इतके जुनाट आहेत की, त्यांनी मानवधर्माचा उद्घोष करणा-या संतांनाही जातीच्या चौकटीत ढकलेले आहे. त्यांच्या मठ-मंदिरांमध्ये हे प्रकर्षाने दिसते. मग देहू,आळंदी आणि पंढरपुर तरी त्याला कसे अपवाद राहणार? सगळीकडे दंभाचे स्तंभ उभारून प्रत्येकजण स्वतःचे, घराण्याचे, जातीचे मोठेपण सांगण्यात मश्गुल.

दैनंदिन वर्तनातील दांभिकपणाला आषाढी-कार्तिकीच्या वारीच्या दरम्यान तर अक्षरश: ऊत येतो. फडकरी, दिंडीकरी, मालक, महंत आणि मठाधीशांचा तोरा एखाद्या राजकीय नेत्याला लाजवेल असा असतो. दिंडीत लोकांच्या श्रद्धांचा महापूर आलेला असताना, सर्वत्र हरिनामाचा कल्लोळ उठलेला असताना या मान्यवर महाभागांचा मानपमानाचा खेळ रंगलेला असतो. दिंडीतील रथावर कोणी चढावे, कोणाला प्रसादाला बोलवावे इथपासून तर दिंडीच्या स्वागताच्या वेळी कोणी उपस्थित असावे इथपर्यंत वाद चालतात.

कारण, नीचपण (लहानपण) बरवे देवा। नचले कोणाचाही हेवा हे तुकोबांचे वचन गाथेत गुंडाळून हे सारे मोठे लोक दिंडीत वावरत असतात. लहान-थोर लोकांचे नमस्कार घेत फिरत असतात. आपल्याच खांद्यावर दिंडीचा भार आहे, असे मानणा-या आणि दर्शविणा-या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय, हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. पण आठशे वर्षाहून अधिक काळापासून ही वारीची परंपरा मराठी मातीत रुजलेली आहे, ही वस्तुस्थिती सोयीस्करपणे दुर्लक्षिली जाते. परकीय आक्रमणांमुळे प्राण संकटात असताना, प्लेगसारख्या जीवघेण्या रोगांनी माणसे मरत असतानाही वारीची परंपरा सुक्या भाकर तुकडय़ांच्या शिदोरीवर सुरू होती. कारण उन्हा-पावसाची पर्वा न करता माझ्या जीविची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी या संतशब्दांनी अवघ्या वारकरी संप्रदायाला जगण्याची नवी प्रेरणा दिली होती.

आजही जेव्हा आपण दिंडीत येणाऱ्या बहुजन समाजाचे बहुआयामी रूप पाहतो, तेव्हाच आपल्याला ग्रामीण महाराष्ट्रातील समस्यांचे बहुरूपीत्व थोडय़ाफार प्रमाणात कळते. पोशाख-पेहरावावरून, वागण्या-बोलण्यावरून आणि एकंदर जगण्यावरून आपल्याला त्यांच्या मागासलेपणाचा अंदाज येतो. ते मागासलेपण फक्त आर्थिक वा सामाजिक क्षेत्रापुरते मर्यादित नाही, तर ते बौद्धिक स्तरावरही आहे. तसे पाहायला गेल्यास दिंडीतील पंधरा-वीस दिवस सत्कारणी लावता येणे सहजशक्य आहे. सूर्यास्तानंतर जेव्हा दिंडय़ा तळावर पोहोचतात त्या वेळी बहुतेक बडी मंडळी आपल्या मोबाइलला रेंज मिळेल का, याच्या विचारात असतात, तर विविध व्यसनांचे शौकिन लोक आपली नशेची चीज अरेंज करण्याच्या नादात असतात. हे मी स्वत: पाहिलेले आहे, अनुभवलेले आहे. मुंबई-पुण्यात अंमली पदार्थ घेणाऱ्या लोकांवर कडक कारवाई होते, पण दिंडयांमध्ये अफू-गांजा घेणाऱ्या लोकांच्या टोळ्या आपले वेगळे अस्तित्व घेऊन फिरताना दिसतात. त्यांच्या रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या एकतारीवरील भजनांनी दिंडीच्या तळांवरील रात्रीसुद्धा जाग्या असतात, हे मी जवळजवळ दरदिवशी अनुभवलंय.

दिंडीतील अंमली पदार्थाच्या स्त्रोताचा जेव्हा अधिक शोध घेतला त्या वेळी एकाहून एक धक्कादायक माहिती हाती येत गेली. मुख्य म्हणजे बहुतांश दिंडीमालकांना या सगळ्या प्रकारांची कल्पना असूनही कोणी त्याविरुद्ध बोलताना दिसत नव्हते. एकूणच काय तर आषाढी-कार्तिकीच्या वारीमध्ये संतबोधाचे, हरिनामाचे अखंड स्मरण अपेक्षित असताना नको त्या गोष्टींना महत्त्व आलेले दिसतेय. त्यावर कुणीतरी उपाय शोधणे गरजेचे आहे. दिंडय़ांमध्ये असणाऱ्या गैरसोयी आणि पंढरपुरातील अस्वच्छ वातावरण, हा सुद्धा चिंतेचा विषय आहे. गेल्या दोन वर्षांपासून आयबीएन लोकमतच्या माध्यमातून आम्ही पंढरपूर शहरातली वारीच्या काळातली अस्वच्छता शासन-प्रशासनाच्या डोळ्यासमोर नेतोय. उच्च न्यायालयानेदेखील हा विषय गांभीर्याने हाताळण्याचे निर्देश दिलेले आहेत, पण तरीही स्थिती बदलताना दिसत नाही. कारण वारकरी मंडळी यासगळ्या दुरावस्थेबद्दल बोलत नाहीत. त्यांचे नेतृत्व करणाऱ्यांच्या लेखी या जगण्या-मरण्याशी संबंधित विषयाचे विशेष महत्व नाही. हे सगळ्यात मोठे दुर्दैव.

आज जेव्हा आयबीएन लोकमतच्या सहकार्यांनी पंढरपुरातून भल्या मोठ्या दर्शन रांगेची बातमी दिली त्यावेळी मला माझा अनुभव पुन्हा आठवला. चार वर्षांपूर्वीच्या आषाढी दिंडीतून पंढरपुरात पोहोचल्यावर २३ तास दर्शनरांगेत थांबून मी तेथील चीड आणणारी दुरवस्था अनुभवलेली आहे. त्या पावसाळ्याच्या दिवसांत दर्शनरांगेसाठी साधे छप्परही उभारलेले नव्हते आणि उर्वरित ठिकाणी अक्षरश: जनावरांपेक्षाही वाईट स्थितीत माणसांना तासनतास उभे राहणे भाग पाडले होते. खेड्यापाड्यातील आया-बाया, म्हातारे-कोतारे सावळे सुंदर रूप मनोहर पाहण्यासाठी त्या तशा अवस्थेत गप्प उभे होते. ते पाहून चीड येत होती. शेवटी २३ तास झाले तरी रांग का हलत नाही, हे पाहण्यासाठी जेव्हा रांग सोडून मंदिराजवळ गेलो, तेव्हा पोलिसच आपल्या आप्त-इष्टांना रांगेत घुसवताना दिसत होते.

सगळाच चीड आणणारा प्रकार; परंतु ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान हे शब्दश: प्रमाण मानणाऱ्या वारकऱ्यांना त्याचे काहीच वाटत नव्हते. परंतु तमाम महाराष्ट्राच्या वतीने पांडुरंगाची महापूजा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तरी वारकऱ्यांच्या या गैरसोयीकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्याहून जास्त जबाबदारी आहे, वारकऱ्यांचे पुढारपण करणाऱ्या मान्यवरांची. त्यांनी अंधश्रद्धा किंवा जादूटोणाविरोधी विधेयकापेक्षा वारकऱ्यांच्या सर्वागीण उत्कर्षाचा प्रामाणिक प्रयत्न केला, तरच वेगाने बदलत चाललेल्या समाजात वारकरी संप्रदाय टिकेल. अन्यथा मानभावीपणाचा अतिरेक केला, तर सबंध संप्रदाय कसा लयास जातो, हे महाराष्ट्राने पाहिले आहे.

लोककल्याणकारी वारकरी संप्रदायाची त्यांच्याप्रमाणे गत होऊ नये आणि आधुनिक जीवनाला उपकारक असणारा मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण असा व्यवहारसिद्ध विचार इंटरनेट, मोबाइलच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचावा. ज्ञानोबा माऊलींच्या शब्दात जो जे वांछिल। तो ते लाहो अशी सर्वत्र सुखकारक स्थिती निर्माण व्हावी... नव्याने पंढरपूर मंदिर व्यवस्थापन समितीत बसलेल्या राजकीय नेत्यांनी याचा थोडाफार विचार करावा एव्हढीच अपेक्षा.

First published:

Tags: पंढरपूर, भेट, महेश म्हात्रे, वारी