दिवस आभासी वास्तवाचे...

दिवस आभासी वास्तवाचे...

टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईल यांच्या माध्यमांतून भाजपचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार सर्वसामान्य लोकांसमोर ‘उज्ज्वल भविष्याचे’ जे चित्र रंगवत आहेत, ते आभासी आणि अतिरंजित आहे. याची लोकांना जाणीव व्हायला लागली म्हणून खेड्यापाड्यातील लोक रस्त्यावर येत आहेत का ?, हा सध्याचा कळीचा मुद्दा आहे. ज्या अभिजन, मध्यमवर्गीय आणि शहरी मतदारांच्या पाठबळावर भाजप सारखा पक्ष भारतात रुजला आणि वाढला तो पांढरपेशा वर्ग आपल्या पुढे जात आहे ही भावना ग्रामीण भागातील लोकांच्या मनात निर्माण झाली आहे का, आजवर जो इंडिया विरुद्ध भारत, शहरी मानसिकता विरुद्ध ग्रामीण जनजीवन हा वादाचा मुद्दा शेतकरी नेते शरद जोशी यांच्यापासून तमाम शेतीतज्ज्ञांनी मांडला होता, तो संघर्ष खरंच रस्त्यावर आलाय का ? आधी मराठा मोर्च्याच्या मालिकेने या शेतीसमस्येला वाचा फुटली आणि आता शेतकरी संपाने हा प्रश्न खऱ्या अर्थाने ऐरणीवर आलाय... पण त्याच्या आभासी आणि वास्तवातील फरकाचे काय ?

  • Share this:

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, IBN लोकमत

राज्यात सध्या शेतकरी संप गाजतोय. अगदी पावसाच्या तोंडावर सुरू झालेल्या या संपाने राज्याच्या ग्रामीण भागातील राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण ढवळुन काढलंय. शेतकरी आंदोलन,  फक्त महाराष्ट्रातच नाही तर शेजारच्या मध्य प्रदेशातही मोठ्या प्रमाणावर पसरतेय. गुजरातेतही पटेल आंदोलनाच्या निमित्ताने सुरू झालेली धुसफूस निवळलेली नाही. आपल्या शेतीप्रधान देशातील या बड्या राज्यातील शेतकरी, पर्यायाने ग्रामीण भाग कधी नव्हे तेव्हढा अस्वस्थ झालेला दिसतोय.  गेल्या दोन-अडीच दशकात देशातील, महाराष्ट्रातील शेतीने अनेक स्थित्यंतरे पाहिली.

जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या झंझावातात शेती तुटत गेली आणि शेतकरी तोट्यात जाण्याचे प्रमाण वाढत गेले. परिणामी शेतात, बांधावर, घरे, इमारती, कारखाने, शोरूम्स, इत्यादी उगवत गेले आणि शेतकऱ्याचे दिवस, त्याच्या डोळ्यादेखत 'मावळत' गेले.  तर त्याउलट सोने, फ्लॅट आणि शेयर्स प्रमाणे शहरातील मध्यमवर्गीयांचे 'भाव'ही वाढत गेले. कधी नव्हे ते मध्यमवर्गीयांना राजकीय 'आत्मभान' आले. त्यामुळे भाजप-शिवसेनेसारखे पांढरपेशी राजकीय पक्ष सत्तेच्या सोपानावर चढून बसले. एकीकडे  केंद्र आणि राज्यातील काँग्रेस सरकारे, पक्ष आणि परंपरेच्या राजकारणाचा उदोउदो करीत असताना जागतिकीकरणाचा, खाजगीकरणाचा डांगोरा पिटत होते.

आर्थिक उदारीकरणाच्या प्रभावाने रोखीच्या पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढत असलेला ओढा जसा आपण पहिला तद्वत निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि वाढत्या तोट्याने शेती ओस पाडण्याचे वाढते प्रमाणही चिंताजनक होते, ते आज किती गंभीर झालंय हे आपण दररोज अनुभवत आहोत.

गेल्या शंभर वर्षात शेती कधीच शेतकऱ्यांसाठी फायद्याची नव्हती, आजही नाही. हे सत्य ठाऊक असताना ते मान्य न करता, शेतीवरील प्रेमापोटी, सामाजिक दबावामुळे आणि पिढ्यान् पिढ्यांच्या संस्कारांमुळे शेतकरी हा तोट्याचा व्यवहार मोठ्या निष्ठेने करीत होता, आहे. पण आता संपावर जाण्याचा निर्णय घेण्याने शेतकऱ्याचा धीर खचत चालला आहे का, असे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकरी आणि शेती यांच्यासाठी अशी आणीबाणीची परिस्थिती आजवरच्या इतिहासात कधीच निर्माण झाली नव्हती. शेतकरी संप हा फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. शेतकरी प्रश्नाच्या राजकारणाने सत्तेत एकत्र असलेल्या भाजप-सेनेला आमने-सामने उभे केले आहे. शहरी विरुद्ध ग्रामीण असा नवा वाद राज्याच्या राजकारणात निर्माण झालाय. त्याच जोडीला एकाहून एक शेती किंवा शहरी अर्थकारण जाणणारे तज्ज्ञ सोशल मीडियाच्या व्यासपीठावर, खरेतर चावडीवर मोठ्या हिरीरीने आपली मते मांडताना दिसताहेत.

अभिनेते नाना पाटेकर - मकरंद अनासपुरे यांना तर अभिनय वगळता सर्वच विषयावर बोलण्याची संधी निर्माण झाली आहे. फक्त ज्या शेतकऱ्यांच्या जगण्याशी आणि मरणाशी शेतीचा प्रश्न निगडीत आहे, त्या शेतकऱ्याला समग्र शेती समस्येचे सर्वांगाने आकलन करून घेण्यासाठी उसंत मात्र नाही. हे वास्तव कुणी समजून घ्यायला तयार नाही आणि समजावून सांगायलाही कुणी तयार नाही, याचे दुःख होते.

सध्याचे दिवस व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटीचे म्हणजे आभासी वास्तवाचे आहेत, पण आभास आणि वास्तव हे वेगवेगळे असते. टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईल यांच्या माध्यमांतून भाजपचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार सर्वसामान्य लोकांसमोर ‘उज्ज्वल भविष्याचे’ जे चित्र रंगवत आहेत, ते आभासी आणि अतिरंजित आहे. याची लोकांना जाणीव व्हायला लागली म्हणून खेड्यापाड्यातील  लोक रस्त्यावर येत आहेत का ?, हा सध्याचा कळीचा मुद्दा आहे. ज्या अभिजन, मध्यमवर्गीय आणि शहरी मतदारांच्या पाठबळावर भाजप सारखा पक्ष भारतात रुजला आणि वाढला तो पांढरपेशा वर्ग आपल्या पुढे जात आहे ही भावना  ग्रामीण भागातील लोकांच्या मनात निर्माण झाली आहे का, आजवर जो इंडिया विरुद्ध भारत, शहरी मानसिकता विरुद्ध ग्रामीण जनजीवन हा वादाचा मुद्दा शेतकरी नेते शरद जोशी यांच्यापासून तमाम शेतीतज्ज्ञांनी मांडला होता, तो संघर्ष खरंच रस्त्यावर आलाय का ? आधी मराठा मोर्च्याच्या मालिकेने या शेतीसमस्येला वाचा फुटली आणि आता शेतकरी संपाने हा प्रश्न खऱ्या अर्थाने ऐरणीवर आलाय... पण त्याच्या आभासी आणि वास्तवातील फरकाचे काय ?

जगात जसजसे नवे शोध लागत जातात, तसतसे नवे शब्द, परिभाषा आणि संकल्पना जन्माला येतात, रूढ होतात. ‘व्हॅच्र्युअल रिअ‍ॅलिटी’ हा तसाच संगणक क्रांतीतून प्रचलित झालेला शब्द. मराठीत ज्याला आपण ‘आभासी वास्तव’ म्हणजे ‘खऱ्याचा आभास निर्माण करणारा, पण प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेला दृक्-श्राव्य अनुभव म्हणू शकतो. सत्तरच्या दशकामध्ये जेव्हा संगणकाचा प्रथम वापर सुरू झाला, त्या वेळी ‘व्हच्र्युअल मेमरी’ हा शब्द वापरात आला. त्यानंतर संगणक, इंटरनेट आणि आता सोशल नेटवर्किंग साइट्सच्या युगात ‘आभासी वास्तव’ अनुभवण्याची प्रक्रिया विकसित झाली.

जे नाही, त्याचा आपल्या पंचेंद्रियांपैकी डोळे आणि कान या दोन इंद्रियांच्या माध्यमातून संगणकाच्या साहाय्याने अनुभव घेणे, त्यात रमणे आणि खऱ्या जगाचा विसर पडणे कसे शक्य आहे, हे व्हिडिओ गेम्स खेळणाऱ्या मुलांकडे पाहिल्यावर पटते. तुम्ही समजा, त्या मुलांचा संगणक वा अन्य तत्सम उपकरण बंद केले, तर आभासी विश्वाला ‘आपलं’ मानणारी ही मुले हिंसक बनतात. काही वेळा त्यांना वैफल्य येतं. अगदी तसंच काहीसं मागील लोकसभा- विधानसभा निवडणूक प्रचारात झाले. आजही तीन वर्षानंतर त्या प्रचाराचा भर ओसरलेला दिसत नाही.

परिणामी आभासी विश्वातून इंटरनेट, मोबाईलच्या माध्यमातून मिळणाऱ्या एकतर्फी माहितीवर मग भलेही ती अतिरंजित किंवा चुकीची असेल, आपल्या तरुण पिढीचे ‘मत’ बनत आहे.   माहितीच्या क्रांतीने सगळ्या बाजूने तरतर्हेची माहिती आपल्या समोर येत असते. त्या माहितीचा  माणसांच्या मनोव्यापारांवर, स्वप्नांवर आणि एकूण जगण्यावर वेगळा परिणाम होत असतो. याची आपल्याकडे कुणीच दखल घ्यायला तयार नाही. नव्याने हाती आलेल्या अभ्यासानुसार सध्या देशातील साडे चव्वेचाळीस कोटी शहरी लोकांपैकी जवळपास ३० कोटी लोक मोबाईल आणि इंटरनेट ने जोडलेले आहेत. खेड्यातील ७५ कोटी लोकांकडे हे तंत्रज्ञान क्रांतीचे वारे वेगाने वाहत आहे.

भारताच्या २०११ च्या   जनगणने मध्ये ९० कोटी लोकांपैकी फक्त १७ टक्के लोक इंटरनेटने जोडलेले होते. यंदा ते प्रमाण ३१ टक्क्यांवर गेलंय आणि पुढील पाच वर्षात ते दुपटीहून अधिक होईल अशी आशा आहे. मुळात इंटरनेट किंवा ऑनलाईन माध्यमाने भारतीय लोकांना  खूपच भुरळ घातलीय , एका ताज्या अहवालानुसार भारतीय लोक दर आठवड्याला वाचनासाठी २ तास, टिव्ही पाहण्यासाठी ४ तास तर मोबाईल-इंटरनेट साठी २८ तास खर्च करतात. हा सामाजिक बदलाचा ट्रेंड खूप महत्वाचा आहे.  खरे सांगायचे तर कोणत्याच सामाजिक बदलाचा समाजशास्त्रीय अंगाने अभ्यास करण्याची पद्धत आपल्या देशात रूढ नाही, त्यामुळे या मोबाईल आणि इंटरनेट च्या माध्यमातून सुरु झालेल्या  प्रचारतंत्राने केलेल्या मानसिक, भावनिक परिणामांचा अभ्यास होणे सध्या तरी शक्य नाही.

सध्या मराठी समाज कधी नव्हता एवढय़ा मोठय़ा संक्रमणावस्थेतून चाललेला दिसतोय. शेतीचा वर्षभर, खरे सांगायचे तर आयुष्यभर गुंतवून ठेवणारा जोखडबाज आणि जोखमीचा धंदा सोडून शेतकऱ्यांची नवी पिढी गावखेडय़ातून कधीच बाहेर पडली आहे. जे खेडय़ात उरलेत, त्या तरुणांना राजकारणाच्या व्यसनांनी आणि व्यसनांच्या विविध कारणांनी पार पोखरून टाकलेले दिसते.

आर्थिक उदारीकरणामुळे, जागतिकीकरणाच्या ‘खुल्या’ (खरं तर खुळय़ा) निमंत्रणामुळे आपल्या नव्या पिढीच्या डोक्यात घुसलेल्या प्रगतीच्या तथाकथित कल्पनांनी कुटुंबसंस्थानामक प्रकाराचा पार चुथडा करून टाकलाय.. कृषी संस्कृतीच्या प्रभावामुळे पूर्वी ‘समाजाभिमुख’ असलेला आपला समाज आता नव्या स्वकेंद्रित जाणिवांना कुरवाळत बसलेला दिसतोय. त्याला सुखलोलुप आकांक्षांचा तेवढा ध्यास आहे, बाकीच्या इतर कशात त्याला रस नाही.

त्यामुळे त्याच्याकडे एखाद्या विषयावर समतोल विचार करण्याची शक्तीच उरलेली नाही. खेदाची गोष्ट म्हणजे, विवेकशून्य अविचाराची ही लागण फक्त तरुणांमध्येच नाही, तर स्वाध्याय विसरलेल्या सगळ्याच लब्धप्रतिष्ठित वर्गात पाहायला मिळते. त्यामुळे हल्लीचे विचारवंत ‘टाळीबाज’ झालेले आहेत. साहित्यिक, कवी, लेखक हा वर्ग तर फार आधीपासूनच ‘टोळीबाज’ झालेलाच आहे. त्यामुळे मोबाईल आणि इंटरनेटने केलेल्या सामाजिक आणि भावनिक क्रांतीकडे लक्ष देण्यासाठी ना त्यांच्याकडे वेळ आहे, ना पुरेशी अक्कल. ते त्यांच्या जुन्या तत्त्वज्ञानात किंवा कल्पनांमध्ये मश्गुल असलेले दिसतात आणि म्हणूनच असेल कदाचित आमच्या जातीपातीच्या भेदापासून, शहरी-ग्रामीण संघर्षापर्यंतच्या सगळ्याच वादाना वेगळीच वळणे लागताना दिसताहेत. सगळ्याच प्रगतिशील, पुढारलेल्या, पुढे जाण्यास अधीर असलेल्या देशांमध्ये तरुणाई प्रगतीच्या नवनव्या वाटा धुंडाळताना दिसते, आपल्याकडे मात्र त्यांना तशा दिशा दाखवणारे कमी आहेत. संधीचे सोने करण्याची धमक असलेल्या आमच्या तरुणाईला चमक दाखवण्याची संधी मिळावी एवढीच अपेक्षा.

First published: June 7, 2017, 9:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading